"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!"
पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला. त्याला कारणही तसंच होतं. मागल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतातल्या पराभवाचे उट्टे काढायला चवताळलेला ऑस्ट्रेलियन संघ! त्यात स्टीव वॉची अखेरची मालिका. त्यामुळे सर्वच ऑस्ट्रेलियन्स त्याला मालिकाविजयाने निरोप देण्यास आतुर! एकूण अतिशय रंजक मालिका होणार यात शंकाच नव्हती. एकेक क्षण महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे जो प्रतिस्पर्ध्याच्या एका चुकीवर आक्रमण करून नॉकआऊट पंच देऊ शकतो हे आपले महारथी जाणत होतेच. म्हणूनच संघाच्या अपेक्षेइतक्या धावा झाल्या नसताना आपण एक सामान्य फटका खेळून बाद झालो याचं वीरूला जास्त वाईट वाटलं होतं.
पहिली ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. गांगुलीने त्या सामन्यात १४४ धावांची एक अत्यंत उत्कृष्ट दर्जाची खेळी केली होती. (गांगुलीच्या कारकीर्दीतील तीन सर्वोत्तम खेळ्यांमधली एक, अर्थात माझ्या मते!) दुसर्या कसोटीत द्रवीडने अॅडलेड आपलं दुसरं घर असल्याच्या थाटात एक अतिशय संयमी खेळीचा नमुना पेश करत पहिल्या डावात २३३ धावा कुटल्या आणि दुसर्या डावात नाबाद ७२ धावा काढून भारताला सामना जिंकून दिला. भारताचा हा कसोटी विजय इतका गाजला की अॅडलेड कसोटी म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त द्रवीडच दिसतो! पण त्याच सामन्यात "द्रवीड चिकटला की मीही चिकटणारच" अशी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे लक्ष्मणनेही खास त्याची अदाकरी पेश करत १४८ धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना, भारत कठीण परिस्थितीत आणि लक्ष्मण आपला पेंटब्रश घेऊन मैदान रंगवायला धावून आला नाही असं झालंय का? तिसर्या मेलबर्न कसोटीत एक सेहवाग आणि थोडाफार द्रवीड (४९) चा अपवाद वगळता कुणीही तग धरू शकला नाही. आपले साहेब तर त्या सामन्यात 'गोल्डन डक' चे मानकरी ठरले होते! (कदाचित कारकीर्दितील एकमेव गोल्डन डक.. जाणकारांनी प्रकाश टाकावा!) सचिन तेव्हा बॅडपॅच मध्येच होता म्हणा. तो त्यातून कसा बाहेर निघाला याची कथा, अर्थात 'सिडनीपुराण' पुन्हा केव्हातरी! (२४१* आठवतात ना? हो हो बरोबर, याच दौर्यावरील शेवटची कसोटी.. तीच ती, पार्थिव पटेलने गाजवलेली...!!) संघाची धावसंख्या ३११ असताना त्यातल्या १९५ धावा काढून सेहवाग बाद झाला होता. नंतर बाकीचे "हरे राम हरे कृष्ण" करत हजेरी लावत तंबूत परतले! भारत १ बाद २७८ वरून सर्वबाद ३६६!! आपले पाच महारथी शून्यावर बाद! आणि अर्थात त्यातला एक होता आपला अजित आगरकर!! त्या धक्क्यातून आपला संघ सावरलाच नाही आणि त्यात रिकी पॉण्टिंगने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी (२५७) केली आणि आपण ती कसोटी गमावली. (तब्बल १० विकेट्सनी हरलो होतो आपण!!) पुढे सिडनी कसोटीत पार्थिव पटेलने केलेली हाराकिरी सर्वज्ञातच आहे. स्टीव वॉची शेवटची कसोटी ती. ८० धावांची खेळी करत पठ्ठ्यानं सामना आणि मालिकाही वाचवली आणि आपल्य १९ वर्षांच्या दैदिप्यमान कारकीर्दीला यथोचित सन्मानाने पूर्णविराम दिला.
असो. अवांतर बरंच झालं. तर ती सेहवागची १९५ धावांची खेळी म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच होती! ५ खणखणीत (सणसणीत, धडाकेबाज, उत्तुंग, जब्बरदस्त, रापचिक, तोफचिक, राव्वस, खत्रुड, राम्पाट, फटँग, चाबूक, शॉल्लिट .. हवी ती विशेषणं लावा..!!) षटकार हाणले होते त्यानं. एमसीजी म्हणजे काही लहान ग्राऊंड नाही पण तिथंही साहेबांच टार्गेट षटकारच!! त्या पाचातले दोन त्याने स्टुअर्ट मॅकगिल या अतिशय गुणी, दर्जेदार लेगस्पिनरच्या क्लासिक लेगस्पिनला मिडविकेटच्या वरून फेकत हाणले होते! स्टुअर्ट मॅकगिल हा एक उत्कृष्ट लेगस्पिनर होता. हाताहाताएवढे चेंडू वळवायचा. त्याच्या दुर्देवाने त्याच्या ऐन उमेदीच्या काळात शेन वॉर्न द. आफ्रिका आणि इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवत होता. अवांतरः इंग्लंडच्या त्या वाकड्या खेळाडूंना 'फलंदाज' म्हणताना कसंसंच होतंय.. कसले ते त्यांचे स्टान्स.. शी.. कुले वाकडे करत कंबरडं मोडत अवघडल्यासारखे कसेतरी खेळतात! आणि म्हणे ती क्रिकेटची जन्मभूमी!! असो. तर योग्य संधी मिळाली असती तर आज वॉर्न आणि मुरली यांच्यासोबत नाव घेण्याची लायकी होती त्या मॅकगिलची. त्याच्या त्या दर्जेदार, मागल्या दारातून आत येणार्या लेगस्पिनला 'अगेन्स्ट द स्पिन' जाऊन मिडविकेटवरून फेकून देणं म्हणजे काय खाऊ नाही! पण सेहवागला कधी कुणाच बॉलरची फिकीर नव्हती. इतक्या सहज सुंदर त्यानं ते दोन षटकार हाणले की मॅकगिलसुद्धा म्हणाला असेल, "बाबारे, मी इतके कष्ट करतच नाही ना.. बॉल इंचभर वळला काय आणि हातभर वळला काय.. तू मारणारच!! मग कशाला तो बॉल वळवा इतका.."
तर असा हा आमचा सेहवाग. याच्यावर आमचा भारी जीव!! समोरचा बॉलर कोण आहे याची जराही तमा न बाळगता 'कुटण्यासाठी जन्म आपुला' म्हणत नुसती हाणामारी करणं याचं आवडतं काम!! आपल्या हातात ही बॅट दिली गेली आहे, तिचा वापर हा हाणण्यासाठीच आहे. चेंडू तटवला जात नाही. तेवढी त्याची लायकी नाही. समोर कुणीही असो. मॅक्ग्रा असो, अख्तर असो, ली असो, बॉण्ड असो, वॉर्न असो वा मुरली असो, "आम्हा काय त्याचे"* हेच भाव महाराजांच्या तोंडावर! (*संदर्भ: हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जेपी मॉर्गन) आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पोलॉक, हेवर्ड, एन्टिनी, कॅलिस, क्लूजनर अशा दर्जेदार द. आफ्रिकन गोलंदाजीसमोर शतक झळकावत त्यानं चुणूक दाखवून दिलीच होती. त्यावेळी, बॉयकॉट, बेनॉ, बॅरी रिचर्ड्स सगळ्या सगळ्यांनी " याचं फुटवर्क फार वीक आहे" वगैरे टीकेची झोड उठवली होती आमच्या वीरूभायवर.. पण या सगळ्याचा आपल्या खेळावर परिणाम होऊ देईल तर तो वीरू कसला.. त्यानं सचिनला नुसतं खेळाच्या बाबतीतच नाही तर एकूणच आपला आदर्श मानलं. आपल्यावर होणार्या टीकेला तो, सचिनप्रमाणंच, आपल्या बॅटनं वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत राहिला. तो आला तेव्हा त्याच्याकडे प्रतिसचिन म्हणून पाहिलं गेलं. त्याचा स्टान्स, स्टाईल, ऑन फील्ड अपीअरन्स सर्व काही सचिनची कॉपी असल्या सारखं वाटे! कित्येकांनी तर "असे किती येतात आणि किती जातात, सचिन सचिन आहे. कोण हा सेहवाग" अशा शब्दांत त्याची हेटाळणीही केली. पण आपल्या मेहनतीच्या आणि परफॉर्मन्सच्या बळावर त्यानं 'वीरेंदर सेहवाग' हा एक ब्रॅण्ड बनवला. आज सेहवाग हा जागतिक क्रिकेटमधला एक मापदंड बनलाय. सचिनच्या उपस्थितीत, त्याचीच कॉपी म्हणून सुरूवात करून स्वतःच्या नावाचा दबदबा वीरू निर्माण करू शकला यातच त्याचं यश सामावलेलं आहे.
एकतर "पाय हलवण्याचे कष्ट कोण घेईल ते.. जाऊ दे!" असा नवाबी थाट! त्यात 'आला चेंडू की हाण' ही प्रवृत्ती.. बरं कसोटी क्रिकेट खेळताना थोडा संयम दाखवावा.. तेही नाही.. 'अटॅक इज द बेस्ट डिफेन्स' हे याच्या खेळाचं सूत्र! सेहवाग जागतिक क्रिकेटमध्ये आला तेव्हा नुस्ता आक्रमकच खेळायचा. याचा आफ्रिदी होऊ नये असं सारखं वाटायचं तेव्हा. पण सचिन, द्रवीड, गांगुली अशा दिग्गजांसोबत राहून त्यानं आपला खेळ व्यवस्थित पॉलिश केला. सेहवाग स्वतः सांगतो, "सचिननं मला शिकवलं की आक्रमण हा एकच पैलू नाहीये फलंदाजीचा. प्रसंगी डोकं शांत ठेवून आपली तलवार म्यान करावी लागते. मी त्याच्याकडूनच शिकलोय प्रसंगानुरूप आपला खेळ कसा बदलावा." सचिननं त्याला वेळोवेळी योग्य सल्ले देत मार्गदर्शन केलंय आणि त्याची सेहवागला जाणीव आहे. सचिनला त्यानं नेहमीच आदर्श मानलंय आणि आज आपण जे काही आहोत ते सचिनमुळेच असं तो अतिशय विनम्रतेने मान्य करतोही. वीरू एक अतिशय रंजक आठवण सांगतो, पाकिस्तान विरूद्ध मुलतानाच्या त्याच्या त्रिशतकी खेळी दरम्यान (हो हो. तोच सामना, ज्यात गांगुलीने पडद्यामागून सूत्रं हलवत सचिन १९४ वर खेळत असताना डाव घोषित केला होता. सर्व करतूद गांगुली आणि चॅपलची आणि नाव मात्र आलं आमच्या राहुल्याचं. चॅपल कधीच आपला वाटला नाही हरामखोर साला.. पण निदान गांगुलीकडून ही अपेक्षा नव्हती. असो.) त्यानं आपलं पहिलं शतक शोएब अख्तर ला षटकार मारून पूर्ण केलं. त्यावेळेला त्याला सचिननं सांगितलं, तुझी विकेट महत्त्वाची आहे, ती असा काही आततायीपणा करून फेकू नकोस. मेलबर्न आठवतंय ना?? आपल्याला बराच मोठा स्कोर करायचा आहे. आता त्यासाठी तू जास्तीत जास्त वेळ राहायला हवास. तेव्हा पठ्ठ्यानं २९५ वर जाईपर्यंत फक्त एकच षटकार मारला. तोही १२० च्या आसपास असताना!! २९५ वर पोहोचल्यावर मात्र न राहवून त्यानं सचिनला सांगितलं आता मात्र मी षटकारच मारणार, आणि २९५ वरून सकलेनला खणखणीत षटकार हाणत साहेबांनी त्रिशतक साजरं केलं!!
इतर कुणी असता तर सावकाश आपला वेळ घेत त्रिशतक आधी पूर्ण केलं असतं. पण अशी फिकीर वीरूने कधीच केली नाही. म्हणूनच यंदा ब्रेबॉर्नवर तो श्रीलंकेविरुद्ध २९३ वर बाद झाला आणि क्रिकेट्च्या इतिहासातील तीन त्रिशतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू होता होता राहिला तेव्हाही त्याच्या चेहर्यावर जराही खंत नव्हती. "व्हायचंच आहे तर होईल अजून एक त्रिशतक माझं" हसत हसत वीरू म्हणत होता. त्याच्या याच अॅटिट्युडमुळे तो बिनधास्त, आत्मविश्वासाने खेळू शकतो. त्यानं अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावे आणि आम्हां क्रिकेटरसिकांस मेजवानी देत राहावे हीच 'ईश्वर'चरणी प्रार्थना!!
(जाता जाता: किती किती मुद्दे लिहायचे राहिले असं वाटतंय.. पण लेख लांबला असं वाटल्यानं हात आवरता घेतोय. )