Saturday 11 September 2010

द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..

"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली,

"श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!"

"माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले.

"आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको."

"आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. सतत परोपकारासाठी झटत राहिलास. असा कसा रे तू निर्लोभी? सांग, तुझी एखादी इच्छा सांग पुत्रा."

"जीवनातलं सारं सुख तुझ्या कृपेने मला लाभलंय माऊली. मला आणखी काही नको. पण आज वर मागतोच. आज माझी माऊली माझ्यावर प्रसन्न झालीच आहे तर आज मागूनच घेतो! माते, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तुझी जात्रा भरते आहे. होतील पाचपन्नास डोकी गोळा. दोन तीन दिवस येतील एकत्र आणि जातील पुन्हा आपापल्या मार्गी परत! पोटापाण्यासाठी दूरदेशी गेलेली तुझीलेकरं अजूनही तुला विसरलेली नाहीत आणि मनोभावे एकत्र येऊन तुझी सेवा करीत आहेत हे पाहून ऊर दाटून येतो. पण पूर्वीसारखी जात्रा रंगत मात्र नाही. कुठेतरी काहीतरी उरतंय खरं. आजही पटांगणात माटव उभा राहतो पण तो उभारायला तिसरेच कामगार असतात. एखादा बाबलो गावकार वगैरे तंबाकू मळत लक्ष ठेवून असतो त्यांच्यावर. पण या माझ्या गावची पोरं पुन्हा एकदा या समोरच्या पटांगणात साफसफाई करत अंग धुळीने माखून घेताना पाह्यचं आहे गं मला. माझी ही लाल माती त्यांना बिलगू पाहतेय! तिला आहे अगं ओढ माणसांची. पण मोजक्याच काही पायांचा स्पर्श होतो हल्ली तिला. माझ्या पोरांनीच, सर्व गावकर्‍यांनीच एकत्र येऊन तुझ्या पटांगणात माटव उभारलेला पाह्यचाय मला आणि त्या माटवाला श्रीफळ बांधून सर्वांसाठी गार्‍हाणं करून आशीर्वाद मागताना, सर्वांच्या "व्हय म्हाराजा"च्या गजरात मलाही हळूच माझा आवाज मिसळायचाय. द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे गं आई..

माऊली, आज तू या महागड्या साड्यांनी दागिन्यांनी नटतेस, बघून फार बरं वाटतं मनाला. पण या चार महागड्या साड्या नि दागिन्यांपेक्षा, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार दिलेल्या साडीखणांनी तुला नटवायचा आनंद कैकपटीने श्रेष्ठ होता. देवळातली ही दानपेटी आज व्यवस्थित भरते खरी पण या पैशाच्या राशीपेक्षा तुझ्यासमोर पडणार्‍या त्या खणानारळातांदळाची रासच अधिक जवळची वाटायची. गावातल्या प्रत्येक घरातल्या लेकीसुना येऊन तुझी ओटी भरताना पाहून तुला 'माऊली' का म्हटलं जातं याचा प्रत्यय येत असे. गजरे, फळे, उदबत्त्या यांचा तर खच पडलेला असे पण हल्ली का कोण जाणे निस्तेच त्या पेटीत पैसे टाकून जातात गं लोक आणि पदरी दानाचं पुण्य पाडून घेतल्याचं मनाचं समाधान करून घेतात. पूर्वी दिवसभर लोक येत नि तुझं दर्शन घेऊन जात. तेही कसं सहकुटुंब सहपरिवार. त्या सगळ्या लोकांचे नवस सांगता सांगता मानकरी थकून जात असत दिवसभर. पण दिवसभराचा तो थकवा त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी करत नसे! सगळे रात्री दशावताराची वेळ झाली परत त्याच उत्साहाने गोळा होत अंगणात! या उत्साहाला सांप्रत ओहोटी लागली आहे गं. आधीसारखे जात्रा म्हणजे घरातलंच एखादं कार्य असल्यासारखे हल्ली लोक गोळा होत नाहीत. पाचपन्नास डोकी येतात, रीतीप्रमाणे तुझी पूजा करतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्या पूजेला आता केवळ रिवाजाचा चेहरा उरलाय असं सारखं वाटत राहतं. पण या गावातल्या प्रत्येकाने स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं येऊन उत्साहाने जात्रेत सामील झालेलं पाहायचंय. गावातल्या प्रत्येक सौभाग्यवतीने आपणहून येऊन तुझी खणानारळाने ओटी भरलेली पाहायचीय गं! असा एखादा वर देशील का गं माते?

अजूनही प्रथेप्रमाणे पालखी निघते पण चार गल्ल्यांतून फिरून सावकाश, शांतपणे परत येते. न्हावण घेऊन सगळे आपापल्या कामी जायला होतात रवाना पण त्या ताम्हनातला तो शाळिग्रामसुद्धा निरुत्साही भासतो अगं हल्ली. पुन्हा पूर्वीसारखाच गाजावाजा करत, आरोळ्या ठोकत तुझी पालखी तासनतास गावात मिरवायचीय आणि न्हावणासाठी पुढे पुढे करणार्‍या पोराटोरांना दामटवायचंय! भजनीमेळेसुद्धा हल्ली असेच अधूनमधून दिसतात कधीतरी. बाजापेटी आणि टाळमृदुंगाच्या तालावर आमचे कदमबुवा नि मिराशीबुवा रंगवायचे तशा भजनांच्या डब्बलबारी रंगत नाहीत हल्ली! रात्ररात्र भजनांत न्हाऊन निघायची. हल्ली लोक ऐकतात भजनं पण ते घरात शीडी नि क्यासेटी लावून. अन देवळाकडेही माटवात ते 'पीकर' मात्र हमखास लागतात. ते लागले जाल्या कळतं गावात जात्रा भरली आहे म्हणून. देवळाकडून थेट खालच्या आळीतल्या घरांकडे ऐकू येणारे भजनांचे स्वर पुन्हा एकदा कानांत भरून घ्यायचे आहेत माते. आमच्या कदम, मिराशी, जोशीबुवांच्या बाजापेटीतलं अन् त्यांच्या त्या टाळमृदुंगाच्या गजरातलं माधुर्य या 'पीकरा'वर वाजणार्‍या क्यासेटीतल्या न शीडीतल्या गाण्यांत शोधून सापडत नाही अगं. पुन्हा त्या मधुर भजनांच्या माध्यमातून तुझी स्तवनं गायची आहेत, पुन्हा रात्रभर भजनं गात या सभामंडपात सार्‍या गावकर्‍यांसोबत जागरणं करायची आहेत. असा एखादा वर देशील का गं माऊली?

नाही म्हणायला दशावतार तेवढे होतात अजूनही जोमाने! पण जमलेली डोकी खेळ संपल्यावर मुकाटपणे निघून जातात. खेळाला मनमुराद दाद देतात, टाळ्या पिटतात, मनसोक्त हसतातही पण पूर्वीसारखा गोंधळ मात्र होत नाही. खरंच तो गोंधळच जास्त प्रिय होता. संकासुराला टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेणार्‍या त्या जनसागरात, राजा यायचा झाला की सुन्न शांतता पसरत असे! तिकडे नाटकात देवांचं नि राक्षसांचं युद्ध झालं की इकडे प्रेक्षकांतही पोरंटोरं आपल्या खेळण्यातल्या तलवारी घेऊन युद्ध सुरू करीत! मग त्यांच्या आईबापाची त्यांना आवरताना होणारी धांदल, त्यांची ती कसरत पाहून आणखी टाळ्या, आणखी हशा! या सगळ्याने दशावताराची रंगत आणखी वाढायची! या दशावतारांतल्या हनुमानास पाहूनसुद्धा आदराने वंदन करणारा आणि पार्वतीला मंचाच्या मागं विडी ओढताना पाहून अचंबित होऊन आरडाओरडा करणारा तो लहानगा श्रीपाद आता तुझ्याकडे त्या दिवसांतली तीच जात्रा मागतोय गं माऊली. हे सगळं हल्ली कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय! जात्रा भरते, पण एखाद्या न रंगवलेल्या चित्राप्रमाणे अपुरी भासते! तीत तेच पूर्वीचे जुने हसरे, उत्साहाचे, मौजमजेचे रंग भरून देशील का गं? द्यायचाच असला तर असा एखादा वर दे माऊली!

पूर्वीच्या जात्रेला केवळ आनंदाचा उत्सव इतकंच स्वरूप होतं. आज या जात्रेचा बाजार केलाय गं. कुणीतरी सरपंच किंवा इतर कुणी राजकारणी वगैरे येतो. तुझ्यासमोर उभा राहून पूजा करतो. नतमस्तक होऊन तुझ्याकडे काय मागतो ते तूच जाणसी. मग तो जमलेल्या गावकर्‍यांसमोर भाषणं करतो, त्यांना आपल्या मधाळ वाणीने, आश्वासनांनी भुलवतो. आपल्या वाटेला लागतो. निवडणुकांत भरभरून मतं घेतो! आणि गायब होतो. असे कित्येक सरपंच आले आणि गेले पण गावातला रस्ता दर पावसाळ्यात खचतोच. या माझ्या भाबड्या गावकर्‍यांची तुझ्याएवढीच त्या राजकारण्यांवरदेखील श्रद्धा आहे आणि अजूनही ती अढळ आहे. एकोप्याच्या या आनंदोत्सवाचं बाजारात कधी परिवर्तन झालं ते आठवत नाही. जात्रेला या विदुषकांनी असं बाजाराचं स्वरूप दिलेलं पाहवत नाही गं आई. यांच्या ढोल ताशांच्या कर्णकर्कश गदारोळापेक्षा आमच्या पिपाणीचे नि पळसाच्या शिट्ट्यांचे स्वर किती गोड होते! ते ऐकायला कान आतुर झालेत. द्यायचा तर असा एखादा वर दे गं माऊली! द्यायचा तर असा एखादा वर दे!"

श्रीपादपंतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. सदर्‍याच्या बाहीने डोळे टिपून त्यांनी वर पाहिलं तो उजाडू लागलं होतं. सुभद्राकाकू, श्रीपादरावांच्या सौभाग्यवती, दाराकडे उभ्या होत्या नि कुणाला तरी निरोप देत होत्या. आत येऊन त्या म्हणाल्या,

"चला आता, आटपा भराभर. बाबी आला होता सरपंचांचा निरोप घेऊन. आज जात्रेचा माटव उभा करायचा मुहूर्त काढून हवाय त्यांना, कामगारांना काण्ट्रॅक द्यायचंय म्हणे नि देवळात आज सरपंचांची पूजाही आहे. आवरा बघू भराभर.."

"हो. आवरतो गं माऊली" म्हणत त्यांनी सुभद्राकाकूंनाच एक नमस्कार केला. आणि न्हाणीकडे निघाले. सुभद्राकाकू अचंबित होऊन स्वतःशीच पुटपुटल्या "काय हे सुचतंय यांना भल्या पहाटे? बायकोला नमस्कार करताहेत. लेकराला सांभाळून घे गं माऊली!" म्हणत त्यांनी श्री देवी माऊलीस नमस्कार केला!

***** हे लिखाण प्रातिनिधिक नसून संपूर्ण काल्पनिक लिखाण आहे. आजही कोकणातल्या बर्‍याच गावांतील जात्रांमध्ये पूर्वीसारखंच अखंड उत्साहाचं वातावरण असतं. मात्र काही ठिकाणी वर नमूद केल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तेव्हा सगळ्याच गावच्या जात्रांचे आनंदोत्सवाचे स्वरूप टिकान उरो दे रे म्हाराजा! (म्हणा - व्हंय म्हाराजा!) *****

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

अन्योक्ति मराठीतही वापरली जाते. संस्कृत काव्यशास्त्रविनोदात असलेली अन्योक्तिची उदाहरणे एक निराळाच आनंद देऊन जातात. मूळ तत्व तेच. 'अन्य' वस्तू/गोष्टीच्या उक्तीने आपल्याला केलेला उपदेश किंवा 'लेकी बोले सुने लागे' असं वर्णन. प्रत्यक्ष मनुष्याचा उल्लेखही न करता, मनुष्यस्वभावाचे समर्पक विवचन करणार्‍या सुभाषितांचा रसास्वाद लुटणे किती आनंददायी आहे. काही सुभाषितांत तर केवळ चार चरणात आयुष्याचे तत्वज्ञान सामावलेले असते. खरंच हा सुभाषितांचा साठा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. चला तर अशा काही 'अन्योक्ति' पाहूया.

अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम्॥

येथे भुंगा आणि केतकीच्या फुलाच्या उदाहरणातून मनुष्यस्वभावाचं चित्रण केलेलं आहे. आधी सुभाषिताची समजण्यास सोपी अशी सुटसुटीत मांडणी करून भाषांतर करून घेऊ. 'मधुकर, दूरं अपसर, परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे' - हे भुंग्या, पुष्कळ सुगंध असणार्‍या केतकीच्या फुलापासून दूर जा. (केतकीच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी त्यापासून दूर जा) का? तर 'इह न हि मधुलवलाभः' - खरोखर इथे मध मिळायचा नाही, 'भवति परं धूलिधूसरं वदनम्' - पण (तुझे) तोंड मात्र धुळीने माखून जाईल.
अर्थात केतकी इतकी सुगंधी की एखाद्याला भुरळ पडावी, पण मधाचा मागमूसही नाही तिच्यात. उलट जी पांढरट भुकटी* केवड्यावर असते त्याला कवि धुळीची उपमा देतो. आणि भुंग्याला उपदेश करतो की, 'हे भुंग्या तू या केतकीच्या सुगंधाला भुलू नकोस. इथे तुझा कार्यभाग तर साधला जाणार नाहीच, उलट तुझं तोंडच धुलिमय होईल!' या ठिकाणी केतकीच्या रूपकातून गुणी पण गर्विष्ठ, कद्रू स्वभावाच्या मनुष्याचे चित्रण केले आहे. ज्याप्रमाणे केतकीकडे सुगंध मुबलक आहे त्याचप्रमाणे एखाद्याकडे एखादा गुण जरी मुबलक असला, तरी त्याच्याकडे औदार्य असल्याशिवाय त्या गुणांना शोभा येत नाही. अमक्याकडे मुबलक धन आहे पण त्या धनाचा त्याला गर्व झाला आहे, अशा माणसाकडे मदत मागण्यास आलेल्या गरजूंना त्याच्याकडून काही मिळणार नाहीच उलट त्यांचा अपमान होऊ शकतो. तर अशा मनुष्याच्या श्रीमंतीची महती का बरं वर्णावी? तसेच एखादा मनुष्य विद्वान आहे पण त्याने त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने काही शिकण्यासाठी आलेल्याला आपले ज्ञान दिलेच नाही तर अशा ज्ञानाचा तरी काय उपयोग? तर नुसते गुण असून भागत नाही तर गरजूंना त्या गुणांचा फायदा होत नसेल तर त्या गुणांना शोभा येत नाही. तेव्हा सामान्य मनुष्याला भुंग्याची उपमा देऊन कवि म्हणतो, "अरे भाबड्या, अशा गुणी पण गर्विष्ठ, कद्रू मनुष्यांपासून दूर राहा रे बाबा. तू ज्या इच्छेने त्याच्याकडे चालला आहेस ती पुरी व्हायची नाहीच, पण तूच पोळून निघशील."
खरंच 'औदार्याशिवाय गुणांना शोभा नाही' हे किती समर्पकपणे भुंगा आणि केवड्याच्या उदाहरणातून सांगितले आहे.

*त्या पांढरट भुकटीला काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा॥

या सुभाषितात फुलांचं अतिशय सुरेख उदाहरण देवून संतांच्या 'सर्वे मानवा: समा:' या भावाचं चित्रण केलं आहे. पुन्हा, आधी सुलभ भाषांतर करून घेऊ. 'अञ्जलिस्थानि पुष्पाणि' - ओंजळीत असलेली फुले, 'वासयन्ति करद्वयम्' - दोन्ही हातांना सुगंधित करतात. 'अहो सुमनसां प्रीति:' - फुलांचं प्रेम, 'वामदक्षिणयो: समा' - डाव्या आणि उजव्या, दोन्ही हातांवर सारखंच असतं. किती सुरेख उदाहरण आहे. ओंजळीत फुलं धरली तर त्यांचा गंध दोन्ही हातांना लाभतो. फुले काही 'डावा-उजवा' असा भेद करत नाहीत, ती दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात. येथे 'सुमनसां' या शब्दावर श्लेष आहे. सुमन म्हणजे अर्थात फूल तर 'सुमनसां' म्हणजे षष्ठी बहुवचन - फुलांचे/च्या/ची. तर दुसरा अर्थ आहे 'सु-मनसां' म्हणजेच चांगल्या मनाच्या माणसांचे/च्या/ची, अर्थात संतसज्जनांचे. अशाप्रकारे संतांना फुलांची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेल्या 'सर्वजण सारखेच' या भावाचे येथे चित्रण केले आहे. येथे 'वाम' हे दुर्जनांचे तर 'दक्षिण' हे सुजनांचे रूपक आहे. संतजन डावा-उजवा असा भेदभाव करत नाहीत तर त्यांचे सज्जनांवर आणि दुर्जनांवरदेखील सारखेच प्रेम असते.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

चातकाला केलेला हा उपदेश माणसांनाही तंतोतंत लागू होतो. आधी भाषांतर करू. 'रे रे मित्र चातक, क्षणं सावधानमनसा श्रूयतां' - अरे मित्रा चातका, क्षणभर सावधपणे ऐक. 'अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने' - आकाशात ढग बरेच आहेत. 'सर्वेऽपि नैतादृशा' - पण सगळेच काही सारखे नाहीत. 'केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं' - त्यातील काहीच ढग पावसाने जमीन भिजवतात, 'गर्जन्ति केचिद् वृथा' - तर काही उगीच गर्जना करतात. 'यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो' - ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या पुढ्यात, 'मा ब्रूहि दीनं वचः' - दीनस्वरात याचना करू नकोस. इथं कवी चातकाला उपदेश करत आहे की प्रत्येक ढगासमोर पाण्यासाठी याचना करू नकोस सगळेच काही खरेच बरसणारे नाहीत. येथे मनुष्याला चातकाचे रूपक योजून कवि उपदेश करत आहे, की 'अरे मित्रा, या समाजात तुला मदत करणारी माणसं कोण आणि उगीच वल्गना करणारी माणसं कोण ते नीट ओळख. उगाच ज्याच्या त्याच्या समोर दीनवाणा होऊन हात पसरू नकोस.'

विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:।
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन॥

कावळा आणि कोकिळपक्ष्याच्या उदाहरणातून मनुष्याला उपदेश. कावळ्या, सुरेल आवाजाच्या कोकिळपक्ष्याबरोबर तू आंब्याच्या झाडावर सहवास केलेला आहेस, (तरी) तू (वाईट आवाजातच) ओरड (रेक), (यात) तुझा अपराध काय? 'विधि: एव विशेष गर्हणीयः' - याला नियतीच पूर्णपणे कारणीभूत आहे. हे कावळ्याला उद्देशून केलेलं थोडंसं उपहासात्मक वचन असलं तरी मनुष्याला केलेला हा उपदेश आहे की जर एखादा गुण किंवा कला मुळातच तुमच्या अंगी नसेल तर ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्या केवळ सहवासाने काही ती कला साध्य होत नाही.

आता आपण पाहू 'प्रहेलिका' हा काव्यप्रकार, अर्थात पहेली किंवा कोडी. कधीकधी साधी कोडी असतात, ज्यात प्रस्तुत स्वभाव अथवा गुणधर्मावरून ती गोष्ट कोणती हे ओळखायचे असते किंवा कधी कधी प्रहेलिकेतच उत्तर दडलेले असते. काही काही प्रहेलिका फसव्या असतात. वरकरणी दिसणार्‍या अर्थातून काहीच निष्पन्न होत नाही मात्र एक गूढ अर्थ त्यात दडलेला असतो जो उत्तराकडे निर्देश करतो. एक अत्यंत उत्कृष्ट प्रहेलिका पुढीलप्रमाणे :

य एवादि: स एवान्तः मध्ये भवतिमध्यमा।
य एतन्नाभिजानाति तृणमात्रं न वेत्ति सः॥

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुलभ भाषांतर करू. 'य एव आदि: स एव अन्तः' - जो प्रारंभ आहे तोच अंतदेखील आहे, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये मध्यम आहे. 'य एतद् न अभिजानाति' - जो हेदेखील जाणत नाही, 'तृणमात्रं न वेत्ति सः' - त्याला काडीचीही जाण नाही. या भाषांतराप्रमाणे या कोड्याचं उत्तर एखादा 'देव' असं देईल. वरकरणी तसंच वाटतं देखील. पण हे अत्यंत फसवं भाषांतर आहे. वास्तविक या कोड्याचं उत्तर कोड्यातच दडलेलं आहे. पहिल्या ओळीचं नीट विचार करून भाषांतर केल्यास उत्तर पटकन कळून येईल. 'य एव आदि: - सुरूवात 'य' ने होते, 'स एव अन्तः' - आणि शेवट 'स' ने होतो, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये 'भवति'ची मध्यमा - अर्थात 'व' आहे. आता कळलं उत्तर? 'यवस' अर्थात गवत! पुढल्या ओळीत उत्तर दिलेलं आहे हे लक्षात आलं असेलच!

हे होतं प्रहेलिकेचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण! आता कोडी म्हटल्यावर कोडी घालणार्‍यानेच उत्तर दिलं तर कसं चालेल. थोडा तुम्हीही आस्वाद घ्या प्रहेलिकांचा. तेव्हा प्रस्तुत आहे एक प्रहेलिका..

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः।
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः॥

प्रहेलिका अशी आहे - 'अपदो दूरगामी च' - पाय नाहीत पण दूरपर्यंत जाणारा आहे, 'साक्षरो न च पण्डितः' - साक्षर आहे पण पंडित नाही, 'अमुखः स्फुटवक्ता च' - तोंड नाही पण स्फुटवक्ता आहे, 'यो जानाति स पण्डितः' - जो हे जाणतो तो विद्वान!

याचं उत्तर देता येईल? माझ्या मते फारच प्रसिद्ध प्रहेलिका असल्याने फार जड जाऊ नये.
तरीसुद्धा एक सल्ला : इथे 'साक्षर' हा शब्द येथे 'अक्षरासह' असा अभिप्रेत असू शकतो. Smile

उत्तर : पत्र/खलिता/व्यनि. बरोबर उत्तर देणार्‍या श्री. नंदन यांस 'पण्डित' किताब जाहीर! Wink

(मिपा/मीम वर पूर्वप्रकाशित)

Saturday 19 June 2010

॥काव्यशास्त्रविनोदा: - २॥

मागील भागात कालिदासाच्या समस्यापूर्तीचं उदाहरण आपण पाहिलं. आता या भागाची सुरूवातही त्याच महान कविच्या आणखी एका रचनेनं करू.

भोज राजा हा अतिशय रसिक होता. अनेक कविंना त्याच्या दरबारी त्यांच्या रचनांसाठी इनाम मिळत असे. असाच एक कवी बक्षिसाच्या इच्छेने भोजाच्या दरबारी आपली एक रचना घेऊन आला. ती अशी,

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या: च खादन्ति, जलमध्ये डुबुक डुबुक॥

पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात आणि मासे ती फळे खातात, त्याने पाण्यात 'डुबुक डुबुक' असा आवाज होतो! असा सरळसोपा अर्थ. कवी आपल्या रचनेवर खूष होता. पण काही केल्या भोजास मात्र ती आवडेना. शेवट तो कवी कालिदासास शरण गेला. कालिदासाने त्या रचनेत थोडासा बदल केला.

जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या: खादन्ति, जालगोलकशंकया

पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात, परंतु मासे ती फळे खात नाहीत. कशाला? तर आपल्याला पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्याचे ते गोळे असावेत या शंकेने!

कालिदासाने बदललेली आपली रचना घेऊन तो कवि पुन्हा भोजाच्या दरबारी आला आणि या रचनेवर खूष होऊन भोजाने त्या कवीला इनाम दिले!!

मागल्या भागात आपण 'ठंठंठठंठंठठठंठठंठः' ही समस्यापूर्ती पाहिली. आता कालिदासाची* आणखी एक समस्यापूर्ति पाहू. यावेळी समस्येचा चरण होता - "मृगात सिंहः पलायते।" शब्दशः मराठीत भाषांतर केल्यास, "हरिणापासून सिंह पळतो." आता हे काही शक्य नाही. आणि म्हणूनच असा चरण मिळाल्यावर भल्याभल्या कवींची भंबेरी उडाली असणार. मात्र कविश्रेष्ठ कालिदासाने* त्यावरही काव्य रचलं ते असं:

कस्तूरि जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम्।
भीरू: कुर्वीत किं युद्धे, मृगात् सिंहः पलायते॥

यात पहिल्या तीन चरणात असे प्रश्न रचलेले आहेत, ज्यांची उत्तरे शेवटच्या चरणात एकेक शब्दाद्वारे अनुक्रमे मिळतात!
कस्तूरि जायते कस्मात् - कस्तुरी कोणापासून मिळते - हरिणापासून
को हन्ति करिणां शतम् - शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह
आणि
भीरू: कुर्वीत किं युद्धे - भित्रा मनुष्य युद्धात काय करतो? - पळतो.

अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत. त्या प्रतिभावंत कविवर्यास त्रिवार वंदन!!

(*वरील रचना कुणाची आहे हे मला ठाऊक नाही. माझ्या मते कालिदासाचीच असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.)

समस्यापूर्तींवरून आणखी एक रचना आठवली, कवि भुक्त याची. भूरिवित्त नामक एका राजाने आपल्या दरबारी कविंना आमंत्रण दिले, स्वतःबद्दल स्तुतिपाठ रचण्यासाठी! अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांच्या रचना भूरिवित्तास न आवडल्याने त्याने त्या कविंना यमसदनी पाठवले. यमसदनी गेलेल्या कवींमध्ये भत्ति, भारवि, भिक्षु, भीमसेन यांचा समावेश होता. त्यांचप्रमाणे भुक्तानेही आपली रचना ऐकवली. भूरिवित्तास तीही पसंत पडली नाही म्हणून त्याने भुक्तासही यमसदनी धाडण्याची आज्ञा दिली. मात्र भुक्ताने त्यावेळी भूरिवित्तास जे सांगितले त्याने त्याचे प्राण वाचले! भुक्त म्हणाला,

भत्तिर्नष्टो भारविश्चाऽपि नष्टः
भिक्षुर्नष्टो भीमसेनोऽपि नष्ष्टः।
भुक्तश्चाऽहं भूरिवित्तस्तथा त्वम्
भादौ पन्क्तावन्तकः सनिविष्टः॥

तो म्हणाला, हे राजा, भत्ति नष्ट झाला आहे, भारविही नष्ट झाला आहे. भिक्षु नष्ट झाला आहे, भीमसेनही नष्ट झाला आहे. मी भुक्त आहे आणि तुम्ही भूरिवित्त आहात, 'भ' च्या बाराखडीत यम प्रवेश करता झाला आहे! (भादौ पन्क्तौ अन्तक: सन्निविष्टः।)

हे ऐकून भूरिवित्ताने त्याची शिक्षा रद्द केली आणि त्या चतुर कवीचे प्राण वाचले!

पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता।
पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदायिनी॥

येथे सुभाषितकाराने एक वेगळ्याच प्रकारे शंकराची स्तुती केली आहे.
पहिल्या ओळीचा अर्थ आहे:

पिनाक म्हणजे धनुष्य, फणि म्हणजे फणा काढलेला नाग, बालेन्दु म्हणजे चंद्राची कोर, भस्म, मन्दाकिनी म्हणजे अर्थात गंगा नदी यांनी युक्त अशी, 'प' वर्गाने रचलेली मूर्ति (शंकर) 'अपवर्ग' म्हणजे मोक्ष देणारी आहे!

पिनाक, फणि, बालेन्दु, भस्म आणि मन्दाकिनी या पाच गोष्टींचा क्रम लक्षात घेतल्यास असे लक्षात येते की या पाचही गोष्टी या 'प' वर्गातील आहेत, प-फ-ब-भ-म! हा 'प'वर्ग ज्याचं लक्षण आहे, तो शंभूमहादेव अपवर्ग देणारा आहे! अहाहा, सुंदर!!

रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहार॥

समजण्यास सोपी अशी ही रचना आहे. एक भुंगा मधुरसपान करण्याच्या हेतूने कमळात शिरतो. मात्र रात्रीची वेळ झाल्याने कमळाच्या पाकळ्या मिटतात, तेव्हा रात्रि: गमिष्यति - रात्र जाईल (संपेल), भविष्यति सुप्रभातं - पहाट होईल, भासु अनुदेष्यति - सूर्य वर येईल (उगवेल), हसिष्यति पंकजश्रि: - कमळ हसू लागेल (फुलेल), इत्थं विचिन्तयति - असा विचार करीत आहे. कोण? तर - कोषगते द्विरेफे - कोषात गेलेला भुंगा(द्विरेफ) म्हणजेच रात्री पाकळ्या मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा. पण इतक्यात - हा हन्त हन्त - अरेरे! काय हे दुर्दैव, नलिनिं गज उज्जहार - हत्तीने कमळाला तुडवले!

उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: मंत्रपाठका:।
परस्परं प्रशसन्ति अहोरूपमहोध्वनि:॥

हा काव्यशास्त्रविनोदाचा एक दर्जेदार नमुना आहे. खरंच विनोदी रचना आहे! एखाद्या गोष्टीचं काडीचंही ज्ञान नसलेल्या माणसांनी जर त्यावर चर्चा करण्यास सुरूवात केली तर त्या चर्चेचं स्वरूप असं असेल याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. या रचनेचा अर्थ असा:

'उष्ट्रांच्या' म्हणजे उंटांच्या घरी लग्नकार्य आहे. तिथं मंत्रांचं पठण करायला 'गर्दभ' म्हणजे गाढवं आहेत! ते काय करतात? तर नुसती एकमेकांची स्तुती करतात. कशी? तर "वा वा, काय तुमचं रूप" (अहो रूपम्) आणि "वा वा, काय तुमचा आवाज!!" (अहो ध्वनि:)
उंटांच्या लग्नात गाढवं मंत्रपठणाला आहेत म्हणजे सगळा आनंदी आनंदच!! सुज्ञास अधिक सांगणे न लगे!!

केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥

हाही एक उत्तम काव्यशास्त्रविनोद आहे. शब्दशः केलेलं भाषांतर आणि थोडे संधीविग्रह , शब्दांची वेगळ्या प्रकारे फोड करून मिळणारा अर्थ हे सर्वस्वी भिन्न आहेत! शब्दशः भाषांतर केल्यास एक फसवी अर्थछटा दिसते:- केशवाला (कृष्णाला) पडलेला पाहून पांडव आनंदित झाले. (तर) सगळे कौरव "हे केशवा, हे केशवा" म्हणून आक्रोश करू लागले, रडू लागले.

विनोदी अर्थ निघतो नाही का? मात्र हा फसवा अर्थ आहे. रचनेत मूलतः अभिप्रेत असलेला अर्थ वेगळाच आहे. प्रथम संधीविग्रह आणि शब्दांची फोड जाणून घेऊ.
केशव = के शव, कुठलंतरी एक शव (प्रेत)
पांडव = पांढरे पक्षी, अर्थात बगळे.
कौरव = "कौ" असा रव करणारे, अर्थात कावळे.

आता वेगळीच अर्थछटा दिसू लागते. कुठलंतरी (प्राण्याचं) शव (पाण्यात) पडलेलं पाहून बगळे हर्षित झाले. (तर) कावळे मात्र दु:खाने 'अरेरे शव पडले' म्हणून आक्रोश करू लागले!

पुढल्या भागात आपण पाहू 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार!

(क्रमशः)

-- मेघवेडा.

Saturday 12 June 2010

विश्वचषकाचे प्रबळ दावेदार - Die Mannschaft! अर्थात जर्मन फुटबॉल टीम!

Auf jeden Regen folgt auch Sonnenschein.

थोड्याफार फरकाने 'रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उषःकाल' या अर्थाचं हे वाक्य! मागल्या खेपेस आपल्याच घरात इटालियन प्रसाद खाऊन, नंतर पोर्तुगालला हरवत तिसर्‍या क्रमांकावर समाधान मानणार्‍या जर्मन संघातील प्रत्येक खेळाडू, नव्हे प्रत्येक जर्मन नागरीक हेच म्हणत असावा. २००६ सालच्या विश्वचषकात जर्मनीकडे अर्गन क्लिन्समन सारखा धूर्त व चाणाक्ष सेनापती, मिरोस्लाव क्लोज व ल्युकास पोडोल्स्की सारख्या आग ओकणार्‍या तोफा आणि मायकल बलॅक, फिलीप लाह्म, बॅस्टियन श्वाईन्श्टायगर, आर्ने फ्रीडरीक असली भरभक्कम तटबंदी असतानाही इटलीकडून उपांत्य फेरीत मात खाऊन विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी जर्मन संघ गमावून बसला. 'सुवर्णसंधी' इतक्याचसाठी म्हटलं की तर घरचा सपोर्ट होताच त्यात ते उपांत्य फेरीपर्यंत अजिंक्य होते. एकही सामना त्यांनी गमावलेला नव्हता. ग्रुप स्टेज टॉप करून पुढे जर्मनीने स्वीडन (२-०) आणि अर्जेंटीना (४-२, पे.) सारख्या कडव्या प्रतिस्पर्ध्यांचा अक्षरशः संहार केला होता. त्यात क्लोज (४ गोल्स) आणि पोडोल्स्की (३ गोल्स) दोघेही भयानक फॉर्मात होते. जर्मन अश्वमेधाचा वारू चौखूर उधळलेला असताना इटलीने त्याला लगाम लावला. विश्वचषकाकडे लाखो जर्मन डोळे पुन्हा एकदा गदगदून पाहत होते.

त्यांचा विश्वचषकातील इतिहास फार विलक्षण आहे. बेकेनबाऊरने सत्तरीच्या दशकात खेळाडू म्हणून तर ऐंशीच्या दशकात प्रशिक्षक म्हणून जर्मन फुटबॉलला कुठच्या कुठे नेऊन ठेवलं. पुढे १९९० साली त्यांनी विश्वचषक जिंकला तेव्हापासून जवळजवळ प्रत्येक विश्वचषकात ते प्रबळ दावेदार मानले गेलेत. आणि गेल्या दशकातील दोन्ही विश्वचषकांत उत्तम कामगिरी करत अनुक्रमे दुसरा (२००२) आणि तिसरा (२००६) क्रमांक पटकावला. अशात यंदाच्या खेपेला अर्थात पुन्हा तोच जर्मन संघ, सर्वोच्च यशाला गवसणी घालण्याच्या ईर्ष्येने नव्या सेनापतीसह, त्याच आग ओकणार्‍या तोफा आणि तीच भरभक्कम तटबंदी घेऊन पुन्हा कुरुक्षेत्रावर उभा ठाकलाय. यंदाही ते फेव्हरिट्स मानले जात आहेतच. यंदा जर्मनीचा समावेश आहे 'ग्रुप डी' मध्ये जिथं ते भिडणार आहेत सर्बिया, घाना आणि ऑस्ट्रेलियाशी. सर्बिया आणि घाना कडवट प्रतिकार करण्यासाठी मशहूर असले तरी ग्रुप स्टेज मधून सहीसलामत बाहेर येण्यास जर्मनीला फारसे कष्ट पडतील असं वाटत नाही.

क्लिन्समनकडून जोआकिम लोव यांनी प्रशिक्षकपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून जर्मन संघ यशाच्या पायर्‍या चढतोच आहे. २००६ विश्वचषकात तिसरा क्रमांक (तेव्हा लोव सहाय्यक प्रशिक्षक होतेच), २००८ युरो मध्ये उपविजेते ठरल्यानंतर आता फुटबॉल विश्वातील सर्वोच्च सन्मान प्राप्त करण्याच्या दुर्दम्य महत्वाकांक्षेने जर्मन योद्धे रणांगणात उतरत आहेत. मोक्याच्या क्षणी आपल्या सर्वोत्तम खेळाचं प्रदर्शन करण्यासाठी जर्मन संघ प्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर अनुभवसंपन्न लढवय्ये खेळाडू, योग्य त्या वेळी प्रसंगावधान राखून योग्य त्या चाली खेळण्याचं त्यांचं कसब अजब आहे. उगाच नाही 'फुल बॅक' ला खेळणारा फिलिप लाह्म टर्कीच्या पेनल्टी एरियात येऊन गोल करून जात!

The Germans' consistent success is based on deep reserves of experience, finely-honed tactical know-how, and the ability to rise to the occasion when the chips are down. Their qualifying campaign merely served to emphasise the enduring nature of those attributes.

या शब्दांत त्यांच्या ताकदीचं वर्णन फिफाने केलंय.

संघ

गोलरक्षक : मॅन्यूल न्यूर, हान्स-यॉर्ग बट्ट, टिम वीज.

बचावफळी : डेनिस ऑगो, हॉल्गर बॅडस्टयूबर, येरोम बोटेंग, आर्ने फ्रीडरीक, मार्सेल येन्सन, फिलिप लाह्म, पर मर्टसॅक, सर्दर ताची

मिडफील्डर्स : सॅमी खेदिरा, टोनी क्रूस, मार्को मारीन, मेसुत ओझिल, बॅस्टियन श्वाईन्श्टायगर, पीऑतर ट्रोचोव्स्की

फॉरवर्डस : मारिओ गोमेझ, स्टेफान कीब्लिंग, थॉमस म्युलर, ल्युकास पोडोल्स्की आणि मिरोस्लाव क्लोस्जे.

प्रशिक्षक : जोआकिम लोव (जर्मनी)

यावेळच्या जर्मन संघावर तरूणाईचं वर्चस्व आहे. लोव यांनि संघनिवड करताना अनुभव आणि तरूण रक्ताचा जोश याचा सुरेख ताळमेळ साधला आहे. केवळ मिरोस्लाव क्लोज, आर्ने फ्रीडरीक आणि हान्स-योर्ग बट हे तीनच तिशी ओलांडलेले खेळाडू या संघात आहेत. असे असले तरी युवा पण अनुभवी खेळाडूंची कमतरता नाही. तर आता बघूया या जर्मन संघाचे प्रमुख आधारस्तंभ :

फोटोंचा क्रम : फिलिप लाह्म , मिरोस्लाव क्लोस्जे , बॅस्टियन श्वाईन्श्टायगर आणि ल्युकास पोडोल्स्की!

यंदाच्या खेपेला जर्मन संघाला हरहुन्नरी मायकल बलॅकची उणीव जाणवणार आहे खरी. ती पोकळी भरून काढणे अशक्य गोष्ट आहे. त्याच्या अनुपस्थितीत जर्मन संघाचा प्रमुख आधारस्तंभ कोण असेल यात वादच उद्भवत नाही. जर्सी क्रमांक १६. बायर्न म्युनिकचा खंदा 'फुल बॅक' डिफेण्डर, काटकुळी शरीरयष्टी, पायात चित्त्याचा वेग. तरूण रक्त पण जोडीला अनुभवाची शिदोरीही! बलॅकच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करण्यास समर्थ असं एकच नाव होतं - फिलिप लाह्म. मागल्या खेपेस आपल्या नावाचा दबदबा निर्माण करत त्या वर्षी युएफा 'टीम ऑफ द ईयर' मध्ये 'लेफ्ट बॅक' म्हणून समावेश. कुणी म्हणेल पॅट्रिक एव्हरा, कुणी म्हणेल अ‍ॅशली कोल पण आमच्या मते आजच्या घडीला 'बेस्ट फुल बॅक इन द वर्ल्ड' इज नन अदर दॅन फिलिप लाह्म! माझ्यामते खुद्द एव्हरा आणि डॉनराव सुद्धा हे मान्य करतील Wink बेस्ट म्हणण्याचं कारण हेच की बचावाचे कार्य यशस्वीरित्या सांभाळत, वेळप्रसंगी आक्रमकता दाखवत, चपळाईने प्रतिस्पर्ध्याच्या पेनल्टी क्षेत्रात शिरून गोल मारण्यात लाह्मचा हातखंडा आहे. मागल्या विश्वचषकातील पहिला गोल लेफ्ट बॅकहून फॉरवर्डला येत फिलिप लाह्मनेच मारला होता.

लाह्म मागल्या विश्वचषकातील कदाचित सर्वोत्तम खेळाडू ठरावा कारण त्याने निर्माण केलेल्या गोल्सच्या संधी! पण त्या संधी पूर्णत्वास नेण्याचं कठीण काम आणखी एक कणखर योद्धा जर्मनीसाठी वर्षानुवर्षे पार पाडत आलेला आहे आणि याखेपेसही 'प्लेमेकर्स'नी निर्माण केलेल्या गोलच्या संधींना तडीस नेण्यासाठी जर्मनीची भिस्त असेल ती आतापर्यंत जर्मनीसाठी ४९ गोल नोंदवणारा, २००६ च्या विश्वचषकात 'गोल्डन बूट' चा मानकरी ठरलेला मिरोस्लाव क्लोज याच्यावर! (याच्या नावाचा उच्चार 'क्लोस्जा' का 'क्लोस्जे' असा होतो म्हणे Wink पण आम्ही 'क्लोज'च करणार!) विश्वचषक, युरो अशा मानाच्या स्पर्धांमध्ये गड्याच्या पायाला जणू वायुवेग लाभतो आणि डोकं तर ध्वनिवेगात काम करत असतं! रायझिंग टू द ओकेजन = मिरोस्लाव क्लोज! मागल्या दशकातील दोन्ही विश्वचषकात पठ्ठ्याने ५-५ गोल्स मारून जर्मनीच्या घोडदौडीत सिंहाचा वाटा उचलला! त्याचं आता वय झालं, तेवढा वेग आता त्याच्या खेळात उरला नाही अशी टीका त्याच्यावर होऊ शकते मात्र विश्वचषकात क्लोजचा खेळ उंचावला नाही असं झालेलं नाही! माझं मत : गोल्डन बूटचा एक प्रबळ दावेदार!

२००६ च्या विश्वचषकात जर्मन संघात अनेक तरूण आणि अनोळखी खेळाडूंचा भरणा होता. त्यात एक नाव होतं बॅस्टियन श्वाईन्श्टायगर! नाव कसं भारी आहे की नै? खेळही तितकाच भारी आहे हं.. एक अत्त्युच्च दर्जाचा अटॅकिंग मिडफील्डर. २००६ विश्वचषकापासून फिलिप लाह्मच्या सोबतीनेच नावारूपास आला! त्याच्याकडे जर्मन फुटबॉलचं भविष्य म्हणून पाहिलं जातं. यंदाच्या खेपेस बलॅकच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची संपूर्ण मदार बॅस्टियनच्या खांद्यावर आहे आणि ती पेलण्यास आपण समर्थ आहोत हे त्याने वेळोवेळी दाखवूनही दिलं आहे. जर्मनीचा 'प्लेमेकर' म्हणून श्वाईन्श्टायगरचं नाव घेतलं जातंय! एका अर्थी श्वाईनश्टायगर हा जर्मनीच्या कामगिरीचा 'बॅरोमीटर' ठरावा! श्वाईन्श्टायगर, क्लोज आणि लाह्म एकाच क्लबसाठी - बायर्न म्युनिक - खेळत असल्याने एकत्र खेळण्याचा सराव आणि ताळमेळ आहेच!

याशिवाय या संघाचा चौथा आधारस्तंभ आहे - २००६ च्या स्पर्धेत सर्वोत्तम युवा खेळाडू ठरलेला, लाखो जवान जर्मन दिलों की धडकन असणारा ल्युकास पोडोल्स्की! २००६ च्या स्पर्धेत ख्रिस्तियानो रोनाल्डो, लायनल मेसी सारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यांना मागं टाकत पोडोल्स्की सर्वोत्तम युवा खेळाडु किताबाचा मानकरी ठरला. त्याचे क्लबसाठीचे (कोल्न) प्रदर्शन तितकेसे उत्कृष्ट नसले तरी जर्मनीसाठी खेळताना मात्र तो नेहमीच भरीव योगदान देत आला आहे. मागल्या खेपेस स्वीडन विरुद्ध पठ्ठ्याने पहिल्या १२ मिनिटातच २ गोल केले. त्या धक्क्यातून स्वीडिश संघ सावरलाच नाही आणि जर्मनीने सामना २-० असा जिंकला. सुरुवातीच्या काही मिनिटांत अतिआक्रमक खेळ करण्यासाठी प्रसिद्ध. पोडोल्स्की, श्वाईन्श्टायगर, क्लोज यातले कुणीही दोघे क्लिक झाले तरी प्रतिस्पर्ध्याच्या दृष्टीने काळजीची गोष्ट ठरू शकते.

शिवाय मेसुत ओझिल हा तरूण नवखा खेळाडू जर्मनीच्या संघात आहे. बॅस्टियनप्रमाणेच एक अ‍ॅटॅकिंग मिडफील्डर. त्याच्या नावाचा बराच गाजावाजा झाला असल्याने विश्वचषकाचं प्रेशर तो हॅण्डल करू शकेल का हा एक प्रश्न आहे!

जोआकिम लोव यांचा भर शक्यतो ४-४-२ अशा आक्रमक रचनेवर असतो, पण जरी कधी त्यांनी ४-३-२-१ अशी रचना वापरली तरी गोल स्कोअरिंग हा जर्मनीसाठी प्रॉब्लेम ठरेल असं वाटत नाही. पोडोल्स्कीला क्लिन्समननी सुरुवातीच्या काही मिनिटांत आक्रमक खेळवले होते. लोवसुद्धा तीच स्ट्रॅटेजी वापरतील असे वाटतं. बलॅकची पोकळी भरून काढणं अशक्य आहे. त्याच्या शारिरिक क्षमतेस रिप्लेस करू शकेल अशी युवाफळी जर्मनी कडे आहे पण त्याची कणखर मानसिकता हे युवा खेळाडू आत्मसात करू शकतील काय? ब्राझील हा विश्वकप इतिहासातील सर्वात यशस्वी संघ असला तरी जर्मन सर्वात कन्सिस्टंट आहेत. त्यांनी १७ वेळा फायनल्सला क्वालिफाय केलंय आणि त्यात फक्त एकदाच ग्रुप स्टेज मध्ये बाहेर पडले आहेत! यंदाच्या खेपेसही ग्रुपमध्ये अजिंक्य राहून सेमी फायनलपर्यंत ते आरामात जाऊ शकतात. पण सातत्य हा एक कळीचा मुद्दा ठरू शकतो, कारण बर्‍याच तरूण खेळाडूंना महत्त्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतील आणि या कसोटीस ते कितपत उतरतात यावर जर्मन संघाचं यश अवलंबून राहिल! अशा या आक्रमकतेवर भर देणार्‍या जर्मन संघास यंदा फेव्हरीट्स मानण्यास हरकत नसावी.

आमचं प्रेडिक्शन : सेमीफायनल नक्की. तिथं स्पेनशी लढत झाल्यास सांगणं कठीण आहे!

Friday 14 May 2010

॥ काव्यशास्त्रविनोदा: - १ ॥

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
ततोऽपि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम्॥

भाषांमध्ये सर्वप्रमुख, सर्वात मधुर आणि दिव्य अशी भाषा म्हणजे संस्कृतभाषा (गीर्वाणभारती) अशा अर्थाचे हे सुभाषित आहे. जगातील सर्वात प्राचीन भाषा आणि अर्थात बर्‍याच भाषांची जननी म्हणजे संस्कृतभाषा. म्हणूनच तिला देववाणी, गीर्वाणवाणी असेही म्हटले जाते. संस्कृत भाषेतील साहित्यरचनांचे मूळ शोधणे हे ऋषींचं कुळ शोधण्याइतकंच महाकठीण काम आहे. जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ अर्थात 'ऋग्वेद' संस्कृत भाषेत रचला गेला हे सर्वज्ञातच आहे. अशा या संपन्न भाषेत साहित्याची कमी नाही. सुभाषितेच इतकी आहेत की वाचता वाचता आणि ती समजता समजता जन्म सरावा. 'पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्। मूढै: पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा प्रदीयते॥' असं सुभाषितांच्या बाबतीतच एक सुभाषित आहे! "या पृथ्वीवर तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक (मात्र) दगडाच्या तुकड्यांना 'रत्न' असे नाव देतात" असा याचा भावार्थ. आणि खरंच सुभाषिते ही रत्नेच आहेत, संस्कृतभाषेची भूषणे आहेत. ही सुभाषिते कधी साधी शिकवण देतात, कधी सखोल व्यावहारिक ज्ञान देतात. काही काही रचना तर अशा गूढ असतात की एकदा वाचून अर्थ लागला असे वाटले तरी पुन्हा वाचल्यावर एक वेगळाच अर्थ निघतो त्यांतून. पुन्हा पुन्हा वाचताना आपण नवनव्या गोष्टी शिकू लागतो आणि प्रत्येक सुभाषितातला गोडवा प्रत्येक वेळेस वाढतच जातो. तर अशा या सुभाषितांमध्ये 'काव्यशास्त्रविनोद' हा एक प्रकार आहे. काव्यशास्त्राच्या मदतीने विनोदनिर्मिती असा सरळसोपा अर्थ. पण हे केवळ विनोद नाहीत. काही उपदेशपर रचनाही काव्यशास्त्रविनोदात मोडतात. खरं सांगायचं तर काव्यशास्त्राचा अभ्यास या सरळसोप्या अर्थानेही काव्यशास्त्रविनोद हा शब्द वापरला जातो. काव्यशास्त्रविनोदात प्रहेलिका, अंतरालाप, अन्योक्ति, समस्यापूर्ति असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे हे निव्वळ काव्यशास्त्राच्या आधारे निर्माण केलेले विनोद नसून काही रचना या कोड्यांच्या स्वरूपात आहेत तर काही लेकी बोले सुने लागे या उक्तीनुसार वरकरणी एक अर्थ दाखवणार्‍या पण गर्भितार्थ वेगळाच असणार्‍या रचना आहेत. काही रचना वरकरणी नुसता शब्दांचा खेळ वाटत असल्या तरीही त्यांतील गर्भितार्थ बरंच काही सांगून जाणारा असतो. काही रचनांत एकाच वाक्यातील शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे संधीविग्रह अथवा फोड करून दोन भिन्न अर्थ सूचित केलेले आहेत. तर चला दोस्तहो, अशा या रचनांचा रसास्वाद घेऊ:

पहिली रचना आहे:

यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती।
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती॥
काव्यशास्त्रविनोद म्हटल्यावर आठवलेली पहिली रचना. ज्याप्रकारे गानसरस्वती (संगीतविद्या) कैलास पर्वतावर (कैलासं नगं) नेते त्याप्रकारे कैलासावर ना गंगा नेते ना सरस्वती! असा याचा भावार्थ. एका ओळीतील शब्दांची दोन वेगळ्या प्रकारे फोड करून वेगळे अर्थ सूचित केले आहेत. येथे कैलास पर्वत परमोच्च आनंद या अर्थाने अभिप्रेत आहे. गंगा, सरस्वती या नद्या पवित्र मानल्या गेलेल्या नद्या आहेत. तर या नद्यांचं तीर्थप्राशन करणं म्हणजे परमोच्च आनंद म्हणजेच मोक्ष (कैलास) तर या नद्यांच्या तीर्थप्राशनापेक्षाही कैलासापर्यंत पोचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे गानसरस्वतीची आराधना! संगीतविद्या हीच परमोच्च आनंद अर्थात मोक्षापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असा अर्थ सूचित केला आहे.

अशीच आणखीही एक रचना आहे - पुढीलप्रमाणे:

तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम्।
तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम्।।
वरकरणी दोन्ही ओळी सारख्याच वाटत असल्या तरी दोन्ही ओळींमध्ये संधीविग्रह/ शब्दांची फोड वेगळ्या प्रकारे केला/केली असता परस्परविरोधी अर्थ निर्माण होतात. कसे ते पहा.

पहिल्या ओळीत संधी सोडवल्यास 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्' अशी शब्दरचना होते. अर्थबोध होण्याकरता शब्दांची योग्य मांडणी केल्यावर 'राजेन्द्र, अज्ञानदायकं तमाखुपत्रं भज मा.' म्हणजेच 'हे राजेन्द्रा, अज्ञान(दुर्बुद्धी) देणार्‍या तंबाखुच्या पानाचे सेवन करू नकोस' असा अर्थ होतो.
याच ओळीचा दुसरा अर्थ अगदी विलक्षण आहे! येथे 'तमाखुपत्रम्' या शब्दाची फोड 'तं आखुपत्रं' म्हणजे 'त्या आखुपत्राला' अशी आहे. 'आखुपत्र' हा 'आखु:(उंदीर) इति पत्रं(वाहन) यस्य सः' असा बहुव्रीही समास आहे. (उंदीर आहे वाहन ज्याचे असा तो, अर्थात गजानन!) तसेच 'माज्ञानदायकम्' या शब्दाची फोड 'मा (म्हणजे लक्ष्मी/धन/संपत्ती) आणि ज्ञान देणार्‍या त्याला' अशी आहे. भज या शब्दाचा अर्थ आहे - पूजन्/भक्ती कर. तर या श्लोकाचा/रचनेचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो:

हे राजेन्द्रा, अज्ञान(दुर्बुद्धी) देणार्‍या तंबाखुच्या पानाचे सेवन करू नकोस. (तर) संपत्ती आणि ज्ञान देणार्‍या त्या गजाननाचे पूजन/भक्ती कर!

एकाच वाक्यातून दोन निरनिराळे अर्थ! हीच तर काव्यशास्त्रविनोदातली खरी मजा!!


आता आपण पाहणार आहोत 'अंतरालाप'. हा एक काव्यप्रकार असून काव्यशास्त्रविनोदात त्याची गणना होते. येथे एकेका खंडात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तरही त्याच खंडात दडलेले आहे. अतिशय रोचक प्रकार आहे आहे. कसे ते पहा:

कं संजघान कृष्णः, का शीतलवाहिनी गङ्गा।
के दारपोषणरता:, कम् बलवन्तं न बाधते शीतम्॥
या रचनेच्या चार खंडांमध्ये चार प्रश्न विचारलेले आहेत.

कं संजघान कृष्णः? - कृष्ण कोणाला मारता झाला? ('संजघान' हे परोक्ष भूतकाळी रूप आहे (आपल्या परोक्ष घडलेल्या गोष्टी) - याचा अर्थ होतो 'मारता झाला.')
का शीतलवाहिनी गङ्गा? - संथपणे वाहणारी नदी कोणती? (गङ्गा हा शब्द नदी या अर्थी वापरलेला आहे.)
के दारपोषणरता:? - बायकापोरांच्या पोषणास पात्र कोण? (रत हा शब्द सामान्यपणे मग्न, व्यग्र अशा अर्थी वापरला जातो, येथे तोच शब्द पात्र, योग्य या अर्थी वापरला आहे)
कं बलवन्तं न बाधते शीतम्? - कोणत्या बलवानास थंडी बाधत नाही?

आता त्या त्या खंडांमध्ये त्या त्या प्रश्नांची उत्तरेही दडलेली आहेत. कशी ती पहा:

कंसं जघान कृष्णः - कृष्ण कंसाला मारता झाला. ('जघान' हेही परोक्ष भूतकाळी रूप आहे. याचाही अर्थ 'मारता झाला' असाच होतो.)
काशीतलवाहिनी गङ्गा - काशीस्थळी वाहणारी गंगा
केदारपोषणरता: - शेताची मशागत करण्यात गुंतलेले (केदार म्हणजे शेत)
कम्बलवन्तं न बाधते शीतम् - पांघरूणात असलेल्यास थंडी बाधत नाही (कम्बल = पांघरूण)

अशा एकेक रचनांचा आस्वाद लुटताना कल्पना येते आपली संस्कृतभाषा किती समृद्ध आहे याची.


साक्षरा: विपरीताश्चेद्राक्षसा: एव केवलम्।
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति॥
हे सुभाषित म्हणजे शब्दांचा सुरेख खेळ आहे अगदी. सर्वप्रथम संधीविग्रह जाणून घेऊ.

विपरीताशेद्राक्षसा: = विपरीता: + चेत् + राक्षसा:। (विपरीत या शब्दाचा 'उलट' असा तर चेत् या शब्दाचा 'केल्यास' किंवा 'झाल्यास' असा अर्थ अभिप्रेत आहे इथे)
विपरीतश्चेत्सरसत्वं = विपरीतः + चेत् + सरसत्वम्। (पुन्हा विपरीत = उलट आणि सरस हा शब्द 'सज्जन' या अर्थाने आहे इथे)

शब्दशः भाषांतर केल्यास - 'साक्षरा: हा शब्द उलटा लिहिल्यास राक्षसा: असा शब्द होतो, तर सरसः हा शब्द उलटा लिहिला तरीही तो सरसः असाच राहतो!' असं होतं. मात्र खोलवर विचार केल्यास वेगळाच अर्थ सूचित होतो. माणसं साक्षर झाली तरीही विपरीत परिस्थितीत राक्षसासारखी वागू शकतात. तर सज्जन मनुष्य विपरीत परिस्थितीतही आपला सज्जनपणा/ वागणूक सोडत नाही. (त्याचा सज्जनपणा सुटत नाही) असा अर्थ सुभाषितकाराला अभिप्रेत आहे. म्हणजे नुसते साक्षर होऊ नका तर सज्जन व्हा अशी शिकवण या रचनेतून दिली आहे.



पुढील रचना आहे महाकवि कालिदासाची. कालिदासाच्या प्रतिभेबद्दल आम्ही काही बोलावे इतकी आमची लायकी नाही. पण त्याचे समस्यापूर्तीचे किस्से जगभर संस्कृत भाषेच्या अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. समस्यापूर्ति म्हणजे श्लोकाच्या चार खंडांपैकी फक्त शेवटचा खंड दिला जातो आणि कवीला त्याचे पहिले तीन खंड त्यानुसार रचायचे असतात. कालिदासाला एकदा समस्यापूर्तिसाठी खंड मिळाला तो असा:

ठंठंठठंठंठठठंठठंठः।

तुम्हाआम्हासारखे सामान्य लोक तर तिथंच बेशुद्ध होऊन पडलो असतो. याला सुसंगत काय रचना करणार या विचाराने? पण कालिदासाने मात्र या खंडासही सुसंगत असे पहिले तीन खंड रचले. खरंच धन्य तो कविराज कालिदास आणि धन्य त्याची प्रतिभा! कालिदासाने रचलेला श्लोक पुढीलप्रमाणे:

रामाभिषेके जलमाहरन्त्या: हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दं ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः॥
सर्वप्रथम कालिदासास एक साष्टांग दंडवत! मग अर्थ पाहू.
अर्थ तसा सरळसोपा आहे. 'रामाभिषेके जलं आहरन्त्या युवत्या: हस्ताच्च्युतो हेमघटः' - रामाच्या अभिषेकाकरिता, पाणी आणायला गेलेल्या युवतीच्या हातून सोन्याचा घडा पडला. आता पडला तो पडला थेट घाटावर. तो घाटाच्या पायर्‍यांवरून गडगडत गेला. 'सोपानमार्गेण करोति शब्दं' - पायर्‍यांवरून गडगडत जाणार्‍या त्या घड्याने आवाज केला. तो कसा? तर ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः!!

खरंच धन्य धन्य तो महाकवि कालिदास! धन्य त्याचं प्रसंगावधान आणि धन्य आपली संस्कृतभाषा. आपण सारेच अतिशय भाग्यवान आहोत, यासाठी की या संस्कृतभाषेच्या, सुभाषितांच्या, महाकवि कालिदासाच्या भारतभूमीत आपण जन्म घेतला!! अशा अनेक रचनांनी संस्कृतभाषेला समृद्ध केलेले आहे आणि अख्खं आयुष्य पुरायचं नाही रसग्रहणास इतक्या रचना आहेत! तुम्ही आम्ही 'मराठी भाषा आणि तीत असणारे निरनिराळे शब्द' 'ते शब्द किती शुद्ध आणि किती अशुद्ध', 'मराठी भाषेचा अभिमान बाळगा' असल्या वायफळ चर्चा करण्यात आपला वेळ, तोंडाची वाफ दवडतो. त्यापेक्षा मराठीची आई असलेल्या संस्कृत भाषेतील अशा रचनांचा अभ्यास करण्यात वेळ घालवलेला बरा! त्यातून आपल्याला रसास्वाद घेता येईलच, पण डोकंही उठणार नाही आणि ज्ञानात भर पडेल ती अनमोल असेल.. चिरंजीव असेल!!

'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा'

(अर्थात क्रमशः)

-- मेघवेडा.

Monday 3 May 2010

॥सिडनीपुराणम्॥

श्री गणेशाय नमः। सचिनं वन्दे।
अथ सिडनीपुराणम।

२००३-२००४ चा ऑस्ट्रेलियन समर, बोर्डर-गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा सामना. ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार स्टीव्ह वॉचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला शेवटचा सामना त्यामुळे या सामन्याकडे अख्ख्या जगाची नजर वेधलेली होती. एकीकडे मागल्या खेपेला भारतात झालेल्या मानहानीकारक पराभवाची सव्याज परतफेड करून त्यांच्या कप्तानास सन्मानपूर्वक निरोप देण्यास उत्सुक ऑस्ट्रेलियन संघ. तर समोर विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील अपमानकारक पराभवाने चवताळलेला, बेंगाल टायगर च्या नेतृत्वाखालील भारतीय संघ. मालिका १-१ बरोबरीत. एकीकडे अनिल कुंबळे भयंकर फॉर्मात तर दुसरीकडे ब्रेट ली सपशेल अपयशी! रिकी पॉण्टींगच्या नावावर दोन, तर राहुल द्रवीडच्या नावावर एक द्विशतक लागू. गांगुली, लक्ष्मण, सेहवाग सर्वांच्या नावावर एकेक शतक लागू. एकूण काय तर सिडनी कसोटी रंजक ठरणार याबाबत जराही शंका नव्हती. ऑस्ट्रेलियन मीडियाने स्टीव्ह वॉला तर अक्षरशः डोक्यावर घेतले होते. या सर्व गोंधळात साहेबांचं कुठेच नाव नव्हतं! सचिनच्या त्या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांतल्या धावा होत्या:
ब्रिस्बेनः ०(३) आणि खेळला नाही.
अ‍ॅडलेडः १(६) आणि ३७(५९) आणि
मेलबर्नः ०(१) आणि ४४(७९).
पण तरी मैलोन् मैल प्रवास करून केवळ त्याला बघण्यासाठी येणारे ऑस्ट्रेलियन चाहतेही होते. कारकीर्दीचा आलेख घसरत जात असल्यामुळे टीकाकारांना आयतंच मोकळं मैदान मिळालं होतं. पण सामन्याच्या पहिल्या दिवशी ड्रेसिंग रूम मध्ये बसलेल्या सचिनचा चेहरा निर्विकार होता. त्या निर्विकार चेहर्‍यामागे एक वादळ दडलं होतं हे पुढल्या दोन दिवसात जगानं पाहिलं!

सचिनने ५ डावांमध्ये केवळ ८२ धाव्या जमवाव्यात हे चाहत्यांच्या दृष्टीने अपयशच! पण केवळ त्या मालिकेतच नव्हे तर भारताच्या २००३ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर तो एकूणच थोडा डाऊन झाला होता. तो पराभव त्याच्या जिव्हारी लागला होता. पूर्ण वर्ल्डकप त्यानं जवळजवळ एकहाती खेचलाच होता. पण अंतिम सामन्यात संघ कसोटीस न उतरल्यानं भारताचा पराभव झाला आणि सचिनचं एक स्वप्न अपूर्णच राहिलं.. १९९६ सालीही असंच घडलं होतं पण तेव्हा नसता माज नडला होता.. वर्ल्ड कप जिंकायची सुवर्णसंधी केवळ 'लाहोरला फायनल खेळायची नाही' या अट्टाहासापायी सोडून दिली होती भारतीय संघाने(नक्की? की मॅनेजमेंटने? आणि कंट्रोल बोर्डाने की आणि कुणी??) असो. २००३ वर्ल्डकप नंतर सचिनचा खरंच बॅडपॅच सुरू झाला. वर्ल्डकपनंतर न्यूझीलंड भारतात आली दोन कसोटी सामने खेळायला. त्या दोन सामन्यांत द्रवीडने एक द्विशतक आणि सेहवाग, गांगुली, लक्ष्मण, अ‍ॅस्टलच काय तर रिचर्डसन, विन्सेंट, मॅकमिलन, स्टायरीस या सगळ्या पहिली दुसरीतल्या पोरांनीही एकेक शतके लावली! तर सचिनच्या त्या दोन सामन्यांतल्या धावा होत्या ८,७,५५ आणि १!! तो नुसता धावांच्या बाबतीतच बॅडपॅच मध्ये नव्हता तर त्याची ताकद असणारे कव्हर ड्राईव्हज, स्क्वेअर ड्राईव्हज यांचं टायमिंग नीट बसत नव्हतं. हातातील कामे सोडून बघत बसावे असे त्याचे ऑफसाईडची भक्कम तटबंदी चिरत जाणारे नेत्रदीपक फटके निष्प्रभ ठरत होते. चेंडूच्या टप्प्यावरून त्याच्या ट्रॅजेक्टरीचा अचूक वेध घेणारी ती गरूडाची तीक्ष्ण नजर जणू धोका देत होती त्याला. चेंडू थोडा 'आऊटसाईड दी ऑफ' पडला की त्याच्या वेगाची जराही तमा न बाळगता मारलेले, पॉईंट आणि कव्हरला जरी जॉण्टी आणि गिब्ब्स उभे राहिले तरी त्यांना हताशपणे बघत बसावं लागेल असे ते त्याचे ते प्रेक्षणीय स्क्वेअर ड्राईव्हज जणू इतिहासजमा झाले होते! चेंडू थोडा फुललेन्ग्थ पडणार असा अंदाज आला की क्षणार्धात पुढला पाय थोडा पुढे सरसावून त्यावर अख्ख्या शरीराचा तोल सांभाळत मारलेले, अंबरात सौदामिनी कडाडल्याचा आभास निर्माण करणारे, अंगावर काटा आणणारे त्याचे कव्हर ड्राईव्हज आता मात्र अलगद त्याच्या बॅटची कड घेऊन स्लिप किंवा गलीतील क्षेत्ररक्षकाच्या हाती विसावत होते. हातहातभर चेंडू वळवणार्‍या शेन वॉर्नला सेटल होण्यापुरताही वेळ न देणार्‍या त्याला, स्टुअर्ट मॅकगिल (त्याचेही लेगस्पिन दर्जेदारच म्हणा..) ट्रबलवत होता! एकूण ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूंनी सचिनची विकेट सहजरित्या मिळत होती. आणि त्यात भरीस भर म्हणून काय तर त्याच्याविरूद्धची पायचितची अपील्स उचलून धरली जात होती तर कधी सरळ चेंडूंना पॅडींग करण्याची दुर्बुद्धी त्याला होत होती.

अशा सगळ्या परिस्थितीत सिडनी कसोटी ही सचिनची खरीच कसोटी होती. मागल्या खेपेस (१९९१-९२ साली) याच मैदानावर १४८ धावा काढून त्याने टीकाकारांची थोबाडे बंड केली होती. यावेळेस मात्र त्याला आल्याआल्याच लीने दोन वेळा दोन अप्रतिम आऊटस्विंगर्सवर गंडवले. दोन-तीन षटकांनतर मॅकगिलचा एक अप्रतिम वळलेला - जवळजवळ काटकोनात वळलेला - चेंडू सचिनला बीट करून गेला! सचिनला इतका गंडताना मी पहिल्यांदाच पाहत होतो. इतर वेळी हाच चेंडू त्याने 'डान्सिंग डाऊन द ट्रॅक' करून, टप्प्यावर उचलून लाँगऑफच्या वरून स्टॅण्ड्समध्ये भिरकावून दिला असता. पण हाच असतो बॅडपॅचचा परिणाम. इतर वेळी कॉन्फिडण्टली मारले जाणारे फटके अशा वेळी रिस्की वाटू लागतात. मॅकगिलचा तो चेंडू अप्रतिमच होता. एखाद्या कुंभारानं फिरत्या चाकावर मडके अलगद हाताने फिरवावे तसा मला भास झाला अगदी त्याचा तो हातभर वळलेला चेंडू पाहून. (आणि त्याक्षणीच मी मॅकगिलचा फॅन झालो. असो.) त्याक्षणी तो चेंडू जर सचिनच्या बॅटची कड घेऊन गेला असता तर आज कदाचित चित्र वेगळेच असते. कधीकधी अशा लहानसहान गोष्टीच कारकीर्दीची दिशा ठरवू शकतात. खेळांमध्ये नशीबपालट हा अशाच बॅटची कड आणि तिची विड्थ, गोलपोस्ट आणि त्याचा थिकनेस, रेसट्रॅकचा एखादा कॉर्नर आणि त्याचा अँगल यावर अवलंबून असतात. इथंही तसंच घडलं खरं. देवाचे आपण आभार मानायला हवेत की त्या मॅकगिलने त्याला त्या अप्रतिम लेगस्पिनवर बीट केलं. त्यावेळी सचिनच्या चेहर्‍यावरचे भावही बोलके होते. स्वतःवर थोडासा नाराज झाल्यासारखा वाटला तो तेव्हा. कदाचित त्यानं मॅकगिलच्या या चेंडूवर बीट होणं हे कारण ठरलं आणि त्याच्या करिअरची दिशाच बदलली! माझ्यामते, या मॅकगिलच्या चेंडूपासूनच "ऑफसाईडबाहेरच्या चेंडूला स्पर्शच करायचा नाही! ऑफबाहेरचे चेंडू आपल्याला धोका देतायत सध्या, तर आपण त्यांपासून दूरच राहिलेले बरे" असं त्यानं मनास समजावलं आणि आपली कारकीर्दीतील सर्वोच्च खेळी - २४१* - बांधली, उभारली, साकारली. कसोटीच्या दुसर्‍या दिवशी, भारताच्या डावाच्या १७०व्या षटकात, ३९५ व्या चेंडूचा सामना करत जेव्हा त्याने २००वी धाव घेतली, तेव्हा जवळजवळ ४०,००० लोक एससीजीवर (आणि मी माझ्या घरात) उभे राहून एका महान खेळियाला आणि त्याच्या तितक्याच महान खेळीला मानवंदना देत होते. ही खेळी म्हणजे ९ तासांच्या अथक परिश्रमांचे फलित होते. त्याची एक तपश्चर्या पूर्ण झाली होती. तो तब्बल ५३२ मिनीटे खेळपट्टीवर तळ ठोकून होता. या नऊ तासात सार्‍या जगाला दिसलेला सचिन म्हणजे नेहमीचा 'दे दणादण' फटकेबाजी करणारा सचिन नव्हता. तर सावकाशपणे अतिशय संयमाने एक एक धाव जोडत हे द्विशतक त्यानं पूर्ण केलं होतं. मुळात हे शतकच त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं! सचिन संपल्याच्या टीका करणार्‍यांना त्याचं सडेतोड उत्तर होतं ते. त्यानं शतक पूर्ण झाल्यावर असा काही पंच मारला हवेत, जणू तो त्याच्या टीकाकारांना सांगत असावा, की आजही मी फक्त मला हवेत तेच शॉट्स खेळून शतक लावू शकतो! हे पहा सचिनचं सेलिब्रेशन, अनुक्रमे शतक आणि द्विशतक पूर्ण झाल्यावर:

वरकरणी, स्कोअरबोर्डवरून आपल्याला कल्पना नाही येणार त्याने त्या मॅरेथॉन खेळीत घेतलेल्या अथक परिश्रमांची. ब्रेट ली, नेथन ब्रॅकन, जेसन गिलेस्पी, स्टुअर्ट मॅकगिल सर्वांनी आपला गृहपाठ व्यवस्थित केला होता. ऑफस्टंपच्या बाहेरच्या चेंडूंची नुसती खैरात वाटली जात होती. या अपेक्षेने, की सचिन काहीतरी छेडछाड करायला जाईल आणि आपली विकेट देऊन बसेल! पण त्यांना बिचार्‍यांना काय कल्पना आपण कुठल्या निश्चयाच्या महामेरूसमोर उभे आहोत! कांगारूंनी रचलेल्या या सापळ्यात आपण फसायचे नाहीच असं ठरवूनच तो जणू खेळत होता. त्याने इतके चेंडू सोडलेले मी आयुष्यात प्रथमच पाहत होतो! सुरूवातीला थोडं विचित्र वाटलं पण तो ३०-४० च्या आसपास पोहोचेपर्यंत अंदाज येऊ लागला होता की पुढं काय वाढून ठेवलंय या कांगारूंच्या ताटात आणि मी टीव्हीसमोरून अजिबात हललो नाही मग! सचिनला असं कठोर मनोनिग्रहाने ऑफसाईडबाहेरचे चेंडू सोडताना पाहून मला अतिशय आनंद होत होता. यासाठी की आपला सचिन धावांमध्ये पुन्हा परततोय. नेहमी ज्या मार्गाने तो सहजरित्या धावा जमवी, तोच मार्ग धावा जमवण्यासाठी आज तो टाळत होता. आणि माझं असं प्रामाणिक मत आहे, की तो सचिन होता म्हणूनच त्याला हे जमलं. बाकी ऐर्‍यागैर्‍याचं काम नव्हे ते! अगदी याच कारणासाठी मी त्याला माझ्या मागच्या लेखात 'निश्चयाचा महामेरू' म्हटलं होतं. आता त्यानं फॉर्म मध्ये परत येण्यासाठी स्वीकारलेला हा मार्ग योग्य होता की नाही हा वादाचा विषय ठरू शकेल. अगदी बॉयकॉटपासून बेनॉपर्यंत सर्वच यावर चर्चा करत होते. पण मला त्याच्याशी काहीही देणंघेणं नव्हतं. त्या दिवशी एक वेगळाच सचिन जगाला दिसला. अतिशय मनोनिग्रही, आपल्या निर्णयावर ठाम! प्रसंगी लीचे बाऊन्सर्स अंगावर घेणारा. प्रसंगी अगदी ज्युसी टेम्प्टिंग हाफ व्हॉलीज् केवळ ड्राईव्हज् मारायचे नाहीत म्हणून दुर्लक्ष करून सोडून देणारा. आणि अशा सचिनला बघायला मिळालं याचा अपार आनंद मला झाला होता! मी आनंदाच्या भरात बाबांना म्हटलं, "बाबा, आपला सचिन आता कोण्णाला ऐकत नाही.." त्याने सोडलेल्या प्रत्येक चेंडूत मला बॅडपॅचमधून बाहेर पडलेला सचिन डोळ्यांसमोर दिसत होता अगदी! लोक वाट्टेल ते बडबडतात अगदी. पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर "पार बोअर केलान सचिनने आज.. अरे सोडतो कसले हाणायचे सोडून.. या सचिनला पण काय झालंय ना.. अरे काय ते.. किती कूर्मगति" असल्या कमेंट्स पास होत होत्या. पण त्या खुळयांना काय कळतंय, टाकीचे घाव सोसल्याशिवाय दगडाला देवपण येत नाही!

ऑफसाईडचे चेंडू वर्ज्य म्हणून मग त्याने नवनवीन इनोवेशन्स वापरले. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिडल स्टंपचा गार्ड घेतला. दोन तीनदा त्याला मोह आवरता आला नाही ऑफबाहेरचे चेंडू स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा पण तेवढंच. मग मात्र त्यानं कुण्णाला ऐकलं नाही. चेंडू ड्राईव्ह करण्याऐवजी कट करण्यावर त्यानं भर दिला. पेडल स्वीप्स, रिव्हर्स स्वीप्स, लेट लेट कट्स वापरले. (इथं 'लेट' चुकून दोनदा टाईप झालेला नाही हे लक्षात घ्या!) त्याचा भर मात्र लेगसाईडला स्कोअर करण्यावरच होता. स्टीव्ह वॉने सचिनसाठी नेहमीच ७-२ फील्ड लावली आणि सचिनने त्याचा पुरेपूर फायदा उठवला! मॅकगिलने जरा म्हणून शॉर्टलेन्ग्थ दिली की साहेब बॅकफूटवर गेलेच आणि एखाद्या बापाने आपल्या पोरीला छेडणार्‍या टपोरी पोराच्या कानाखाली साण्णकन् हाणावी तशा आवेशात हाणलाच एक जोरदार पुल!! ब्रॅकन मुळात लेफ्ट आर्म टाकत असल्याने त्याचे चेंडू अ‍ॅक्रॉस येत होते आणि त्यामुळे जरा का फुललेन्ग्थ दिली की थोडं 'शफल अक्रॉस' करून हलकेच चेंडूला दिशा देत मारलाच एक नितांतसुंदर फ्लिक!! अगदी मिडल-ऑफचे चेंडू - मिडल-ऑफ हां, मिडल-लेगही नाही - तो शेवटच्या क्षणी 'शफल अक्रॉस' करून, मनगट वळवून फ्लिक करत होता. सगळ कसं.. अंडर टोटल कंट्रोल!! ब्रॅकनविरुद्ध फ्लिक्स, ऑन ड्राईव्हज तर मॅकगिलविरूद्ध पुल आणि स्वीप या फटक्यांचा त्यानं सढळहस्ते वापर केला! त्यात अखंड पृथ्वीतलावर फक्त त्यानेच मारावेत असे त्याचे ते पेटंटस्ट्रेटड्राईव्हज् सुद्धा दिमतीला होतेच! एकूण काय तर ऑफसाईड म्हणजे स्कोअरींगसाठी वर्ज्य एरिया! नाही म्हणजे ऑफला एकही फटका तो खेळला नाही असं नाही. पण शक्यतो ड्राईव्हज वर्ज्य! आणि त्यामुळेच ही खेळी ग्रेट ठरली! म्हणजे लूज बॉल मिळेपर्यंत वाट बघायची आणि त्यातही ऑफस्टंपच्या बाहेर लूज बॉल मिळाले तरी त्यांच्या नादाला जायचं नाही! केवढा तो मनोनिग्रह, केवढा तो संयम! पुढील तक्ता पाहिल्यास आपल्याला याचा बरोब्बर अंदाज येईल. (आकडे पहिल्या दिवसअखेरचे आहेत. सचिन त्यावेळी १५६ चेंडूत ७३ धावांवर नाबाद होता. पण हे आकडे त्याच्या मनोनिग्रहाचा अंदाज देण्यास पुरेसे आहेत!)

Total balls faced - 156
Balls outside off stump - 101
Runs scored - off side - 19
Runs scored - leg side - 54
Boundaries - off side - 3
Boundaries - leg side - 9

(ऑफस्टंपबाहेर टाकलेल्या १०१ चेंडूंपैकी त्याने सोडले किती हेही दिले असते तर आणखी चांगला अंदाज बांधता आला असता त्याच्या मनोनिग्रहाचा! माझ्या मते यातले कमीत कमी ५० तरी सोडले असावेत त्याने.)

अर्थात सचिन एका बाजूला आपला पूर्ण वेळ घेत फॉर्म मध्ये परतत असताना, दुसर्‍या बाजूने तितकाच जबाबदारीचा खेळ करणार्‍या खेळाडूची गरज होती. सचिनचा स्ट्राईकरेट कमी होता आणि त्यात भारताला वेगाने धावा काढणेही तितकेच आवश्यक होते. मालिका जिंकण्यासाठी ही कसोटी जिंकणे अत्यंत गरजेचे होते आणि कसोटी जिंकायची तर लवकरात लवकर जास्तीत जास्त धावा जमवून डाव घोषित करायचा होता. त्यात चोप्रा, सेहवाग, द्रवीड तिघे ७० धावांच्या अंतरात तंबूत परतले! भारत तीन बाद १९४. त्यावेळी एका मजबूत आधारस्तांभाची गरज होती भारतीय संघाला. सचिनने एक बाजू लावून धरली असताना समोरून पडझड थांबवणे अत्यावश्यक होते आणि तितकेच आवश्यक होते वेगाने धावा जमवणे. अशावेळी गांगुलीने स्वतःऐवजी लक्ष्मणला ५व्या क्रमांकावर फलंदाजीस पाठवले. आणि तिथून पुढे अख्खा एक दिवस जे दृष्य पाहायला मिळालं त्याची गोडी खरंच अवीट होती. सचिन एकाबाजूला रामायण महाकाव्य रचत होता तर दुसर्‍या बाजूला लक्ष्मणाने महाभारत रचलं! रामाची धीरगंभीरता, संयम आणि कठोर मनोनिग्रह सचिन क्षणोक्षणी दाखवत असताना, दुसर्‍या बाजूस लक्ष्मण कुरूक्षेत्रावर रणात उतरलेल्या पार्थासारखा तेजस्वी, आक्रमक पण तितकाच संयमी भासत होता. एकाच दिवशी एकाच सामन्यात एकाच वेळी दोन एपिक इनिंग्ज पाहायला मिळणं म्हणजे 'अहो भाग्यम्!' आपली विकेट घालवायची नाही अशा निश्चयाने खेळतानाच ब्रेट ली या प्रतिस्पर्ध्यांच्या हुकुमी एक्क्यावरच लक्ष्मणने आक्रमण केले! अक्षरशः ८ च्या अ‍ॅव्हरेजने लीला फोडून काढत होता लक्ष्मण. सचिनला त्याची मोलाची साथ लाभली म्हणूनच सचिन ही महान खेळी रचू शकला! आणि सचिन खुल्या दिलानं ते मान्यही करतो. लक्ष्मण एका बाजूला ८ च्या अ‍ॅव्हरेजने फोडत असल्यामुळे सचिनला दुसर्‍या बाजूस सावकाश खेळण्याची संधी मिळाली. ती लढत मैदानापुरती मर्यादित उरली नव्हती तर तो एक उच्च दर्जाचा माईंडगेम झाला होता. स्टीव्ह वॉने या दोघांची भागीदारी मोडण्यासाठी हरतर्‍हेचे प्रयत्न केले. सातत्याने बॉलर्स बदलत राहिला, अ‍ॅटॅकिंग फील्डींग लावली, स्लेजिंग वापरलं काय काय नि काय काय! पण दोघांनी ऑस्ट्रेलियन अ‍ॅटॅक कुटला अगदी. सचिनच्या शतकापाठोपाठ लक्ष्मणनेही शतक झळकावले. त्याचे पेटंट फ्लिक्स, इनसाईड आउट कवर ड्राईव्हज पुनःपुनः पाहून डोळ्यांचे पारणे फिटत होते! शेवट १७८ धावांची आणखी एक 'व्हेरी व्हेरी स्पेशल' खेळी रचून तो बाद झाला. पण तोपर्यंत त्यानं आपलं काम व्यवस्थित केलं होतं. सचिनला सपोर्टिंग इनिंग्ज असं आज त्या इनिंग्जबद्दल म्हटलं जात असलं तरीही लक्ष्मणची ती खेळी त्याच्या इतर खेळींइतकीच स्पेशल, स्वतःचा ठसा उमटवणारी होती. दोघांनी चौथ्या विकेटसाठी ३५३ धावांची भागीदारी करत नवा इतिहास रचला आणि भारत तोपर्यंत सुस्थितीत पोचलेला होता.

दीडशतक पूर्ण झाल्यावर सचिनला आपला हरवलेला आत्मविश्वास परत गवसल्याची चिन्हे दिसू लागली. एखाद दुसरे ड्राईव्हज दिसू लागले! त्यानं ब्रॅकनला मारलेला एक अप्रतिम लीनिंग कव्हर ड्राईव्ह म्हणजे 'तो' सचिन परत फॉर्मात आल्याची पावती होती! सचिनच्या बॅटमधून तेच बहारदार फटके परत वाहू लागले आणि माझ्यासारख्या सचिनभक्तांच्या डोळ्यांतून अश्रू!! सर्व प्रयत्न करून थकलेल्या बिचार्‍या कांगारूंकडे हताशपणे बघण्याशिवाय काहिएक पर्याय उरला नव्हता. स्टिव्ह वॉ तर म्हणत असेल, हीच मॅच मिळाली का रे तुला, माझी शेवटची मॅच? का सगळा प्रसिद्धीचा झोत आपल्याकडे घेतोयस वळवून? माझ्यासाठी राख काहीतरी? तीच गत ली गिलेस्पी, मॅकगिल, गिलख्रिस्ट, पॉण्टिंग सार्‍यांचीच! सारेच ऑस्ट्रेलियन खंदे वीर निष्प्रभ झाले होते एका भारतीय तार्‍यापुढे! त्यांनी अक्षरशः हात टेकले, गुडघे टेकले! ते तरी बिचारे काय करणार म्हणा.. जेव्हा सचिन पूर्ण भरात खेळत असतो तेव्हा तुमच्या हातात काहीच नसतं.. हताशपणे बघण्याशिवाय!

तिसर्‍या दिवशी सकाळी ७०५/७ या धावसंख्येवर भारताने डाव घोषित केला तेव्हा सचिन २४१ धावांवर नाबाद होता! तब्बल ६१३ मिनीटे, ४३६ चेंडूत २४१ धावा, ३३ चौकार आणि एकही षटकार नाही! पुढे भारताने ऑस्ट्रेलियाला ४७४ धावांत गुंडाळून फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजी स्वीकारली. सचिनने पुन्हा ६० धावा काढल्या तर राहुल द्रवीडने ९१ धावांची एक अविस्मरणीय खेळी करत भारताला ४३ षटकांत २११ धावांचा पल्ला गाठून दिला. द्रवीड शतकाच्या उंबरठ्यावर असताना ब्रेट लीच्या एका तेज तर्रार बाऊन्सरने त्याच्या कानाचा वेध घेतल्याने भारताने डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियासमोर सुमारे १०० षटकांत ४४३ धावांच आव्हान ठेवलं. पण शेवट स्टीव्ह वॉने ८० धावांची झुंझार खेळी करून सामना वाचवलाच! शेवटच्या दिवसाचा तर क्षणन् क्षण थरारक होता. कुंबळेचा खतरनाक स्पेल, पार्थिव पटेलचं स्टीव वॉ ला डिवचणं, गांगुलीची आक्रमकता, स्टीव्ह वॉने घेतलेल्या प्रत्येक धावेवर होणारा टाळ्यांचा कडकडाट सर्व काही विलक्षण! घरात टीव्हीवर बघताना सुद्धा थरार जाणवत होता! त्या क्षणी तिथं एससीजी वर उपस्थित प्रेक्षक तर भाग्यवंतच खरे! स्टीव्ह वॉच्या खेळीने ऑस्ट्रेलियानं सामना वाचवला खरा पण मालिका १-१ अशी बरोबरीत सुटल्यानं बोर्डर-गावस्कर ट्रॉफी भारताकडेच राहिली! स्टीव्हला मालिकाविजयानं निरोप द्यायचं कांगारूंचं स्वप्न सचिननं हाणून पाडलं होतं आणी स्टिव्हला स्वतःलाही ही जाण होती, त्यामुळेच तर त्यानं सचिनला उद्देशून 'यू आर अ‍ॅन इन्स्पिरेशन!' असे गौरवोद्गार काढले! सिडनी कसोटी खेळाडूंनी दाखवलेल्या फायटींग स्पिरीटमुळे गाजली. शेवटच्या क्षणापर्यंत लढला गेलेला सामना अनिर्णित राहिला खरा बट क्रिकेट वॉज द विनर देअर!!

असो. भारताने पहिला डाव घोषित केल्यावर सचिनला २४१* या धावसंख्येवर आनंदाने बॅट उंचावत पॅव्हेलियनमध्ये परतताना पाहून त्याच्याइतकाच आनंद त्या ४०,००० प्रेक्षकांना झाला होता, कारण एकही जण आपल्या खुर्चीत बसलेला नव्हता. हर्षा भोगले, शास्त्री, अक्रम, सिद्धू सगळेच उभे राहून त्याचं अभिनंदन करत होते. त्यां सर्वांनीच काय माझ्यासारख्या कित्येक जणांनीदेखील आपल्या घरात टिव्हीसमोर उभे राहून टाळ्या वाजवल्या असतील! स्टीव्ह वॉच्या शेवटच्या कसोटीवर आता फक्त त्याचंच नाव नव्हतं. ती कसोटी सुरू होण्यापूर्वी स्टीव्ह वॉचा एवढा उदो उदो झाला असताना, मात्र दोन दिवसात प्रसिद्धीचा प्रकाशझोत आपल्याकडे वळवून घेण्यात यशस्वी होणं म्हणजे घरातल्या दिव्याचा झोत वळवून घेण्याइतकं सोप्पंय होय म्हाराजा? जाईल तिथं इतकं प्रेम माझ्या माहितीत तरी आणखी कुठल्याच खेळाडूच्या नशिबात केव्हाच आलं नाही! आणि जगाने इतका उदो उदो करूनही या विनम्र माणसाचे पाय सदैव जमिनीवरच राहिले!! आणि म्हणूनच तो एक महान खेळाडू आहे. भलेही त्याची ही खेळी लक्ष्मणइतकी मॅजेस्टिक नव्हती. पण अपयशाच्या काट्याकुट्यातून जाणार्‍या वाटेवरून मार्गक्रमण करत असलेल्या नवशिक्या खेळांडूसाठी नक्कीच आदर्शवत होती. त्याच्या या एका खेळीनं कठीणसमयी खचून न जाण्याची मानसिकता आमच्या अंगी बाणवली! वेळ पडल्यास अंगावर संकटांचा मारा झेला पण प्रतिकार न करताच पराभूत होऊ नका ही शिकवण दिली. कठोर मनोनिग्रह, संयम आणि चिकाटी या गुणांची कास धरली असता मोठ्या दिव्यांतून सुखरूप बाहेर पडता येतं हेही आमच्या तरूण मनावर बिंबवलं! आणि त्याचबरोबर यशाची कितीही उत्तुंग शिखरे पादाक्रांत केलीत तरीही पाय होमक्रीजमध्ये फर्म असायला हवेत असा उपदेश आपल्या खेळातून आणि वागण्यातून तो नेहमीच देत आला आहे!

सचिन आजही त्याच्या या खेळीला आपल्या सर्वोत्तम खेळींपैकी एक मानतो. कालौघात अनेकांना त्याच्या या खेळीचा विसर पडेलही कदाचित. एका साधारण क्रिकेटरसिकासाठी शारजातल्या त्याच्या वादळी, झंझावाती १४३ धावांच्या खेळीइतकी ही २४१* धावांची खेळी संस्मरणीय नसेलही कदाचित. पण स्टीव्ह वॉला एकदा विचारा, सचिनची तुझ्या दृष्टिने सर्वोत्तम खेळी कोणती.. तो नक्कीच सांगेल.. जिथं मी संपलो तिथं नवा सचिन सुरू झाला.. नक्कीच सिडनी कसोटीतील २४१*!
आणि खरंच.. जिथं लारा, स्टीव वॉ सारखे दिग्गज संपतात.. तिथंच आपला सचिन सुरू होतो!!

॥इति सिडनीपुराणम्॥

(सर्व फोटो आणि आकडेवारी क्रिकइन्फोवरून साभार)

-- मेघवेडा

Thursday 15 April 2010

द नवाब ऑफ नजफ़गढ़!

"वीरेंदर सेहवाग सलग दुसर्‍या वर्षी 'विस्डेन क्रिकेटर ऑफ द ईयर' पुरस्काराचा मानकरी!"

पेपरात हा मथळा वाचला आणि का कोण जाणे मन तडक मेलबर्नला पोहोचलं. १९५ धावांची केवळ अप्रतिम अशी खेळून षटकारानं द्विशतक पूर्ण करण्याच्या हौसेपायी सायमन कॅटीच या एका टुकार पार्ट टाईम बॉलरच्या एका अतिटुकार चेंडूवर डीप मिडविकेटला ब्रॅकनच्या हाती एक साधासोपा कॅच देऊन बाद होणारा वीरू आठवला. आपले द्विशतक हुकले याचं खचितही दु:ख नव्हतं महाराजांच्या चेहर्‍यावर. पण आपल्या त्या एका सामान्य फटक्यामुळे भारताने सामना गमावला (आणि कदाचित ऑस्ट्रेलियाविरूद्ध ऑस्ट्रेलियात मालिकाविजयाची सुवर्णसंधीही!) याचं शल्य बोचत होतं त्याला. त्याला कारणही तसंच होतं. मागल्या बोर्डर-गावस्कर ट्रॉफीत भारतातल्या पराभवाचे उट्टे काढायला चवताळलेला ऑस्ट्रेलियन संघ! त्यात स्टीव वॉची अखेरची मालिका. त्यामुळे सर्वच ऑस्ट्रेलियन्स त्याला मालिकाविजयाने निरोप देण्यास आतुर! एकूण अतिशय रंजक मालिका होणार यात शंकाच नव्हती. एकेक क्षण महत्त्वाचा होता. ऑस्ट्रेलिया हा असा संघ आहे जो प्रतिस्पर्ध्याच्या एका चुकीवर आक्रमण करून नॉकआऊट पंच देऊ शकतो हे आपले महारथी जाणत होतेच. म्हणूनच संघाच्या अपेक्षेइतक्या धावा झाल्या नसताना आपण एक सामान्य फटका खेळून बाद झालो याचं वीरूला जास्त वाईट वाटलं होतं.

पहिली ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिली. गांगुलीने त्या सामन्यात १४४ धावांची एक अत्यंत उत्कृष्ट दर्जाची खेळी केली होती. (गांगुलीच्या कारकीर्दीतील तीन सर्वोत्तम खेळ्यांमधली एक, अर्थात माझ्या मते!) दुसर्‍या कसोटीत द्रवीडने अ‍ॅडलेड आपलं दुसरं घर असल्याच्या थाटात एक अतिशय संयमी खेळीचा नमुना पेश करत पहिल्या डावात २३३ धावा कुटल्या आणि दुसर्‍या डावात नाबाद ७२ धावा काढून भारताला सामना जिंकून दिला. भारताचा हा कसोटी विजय इतका गाजला की अ‍ॅडलेड कसोटी म्हटलं की डोळ्यांसमोर फक्त द्रवीडच दिसतो! पण त्याच सामन्यात "द्रवीड चिकटला की मीही चिकटणारच" अशी प्रतिज्ञा केल्याप्रमाणे लक्ष्मणनेही खास त्याची अदाकरी पेश करत १४८ धावा काढल्या होत्या. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना, भारत कठीण परिस्थितीत आणि लक्ष्मण आपला पेंटब्रश घेऊन मैदान रंगवायला धावून आला नाही असं झालंय का? तिसर्‍या मेलबर्न कसोटीत एक सेहवाग आणि थोडाफार द्रवीड (४९) चा अपवाद वगळता कुणीही तग धरू शकला नाही. आपले साहेब तर त्या सामन्यात 'गोल्डन डक' चे मानकरी ठरले होते! (कदाचित कारकीर्दितील एकमेव गोल्डन डक.. जाणकारांनी प्रकाश टाकावा!) सचिन तेव्हा बॅडपॅच मध्येच होता म्हणा. तो त्यातून कसा बाहेर निघाला याची कथा, अर्थात 'सिडनीपुराण' पुन्हा केव्हातरी! (२४१* आठवतात ना? हो हो बरोबर, याच दौर्‍यावरील शेवटची कसोटी.. तीच ती, पार्थिव पटेलने गाजवलेली...!!) संघाची धावसंख्या ३११ असताना त्यातल्या १९५ धावा काढून सेहवाग बाद झाला होता. नंतर बाकीचे "हरे राम हरे कृष्ण" करत हजेरी लावत तंबूत परतले! भारत १ बाद २७८ वरून सर्वबाद ३६६!! आपले पाच महारथी शून्यावर बाद! आणि अर्थात त्यातला एक होता आपला अजित आगरकर!! त्या धक्क्यातून आपला संघ सावरलाच नाही आणि त्यात रिकी पॉण्टिंगने आपल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी (२५७) केली आणि आपण ती कसोटी गमावली. (तब्बल १० विकेट्सनी हरलो होतो आपण!!) पुढे सिडनी कसोटीत पार्थिव पटेलने केलेली हाराकिरी सर्वज्ञातच आहे. स्टीव वॉची शेवटची कसोटी ती. ८० धावांची खेळी करत पठ्ठ्यानं सामना आणि मालिकाही वाचवली आणि आपल्य १९ वर्षांच्या दैदिप्यमान कारकीर्दीला यथोचित सन्मानाने पूर्णविराम दिला.

असो. अवांतर बरंच झालं. तर ती सेहवागची १९५ धावांची खेळी म्हणजे क्रिकेटरसिकांसाठी पर्वणीच होती! ५ खणखणीत (सणसणीत, धडाकेबाज, उत्तुंग, जब्बरदस्त, रापचिक, तोफचिक, राव्वस, खत्रुड, राम्पाट, फटँग, चाबूक, शॉल्लिट .. हवी ती विशेषणं लावा..!!) षटकार हाणले होते त्यानं. एमसीजी म्हणजे काही लहान ग्राऊंड नाही पण तिथंही साहेबांच टार्गेट षटकारच!! त्या पाचातले दोन त्याने स्टुअर्ट मॅकगिल या अतिशय गुणी, दर्जेदार लेगस्पिनरच्या क्लासिक लेगस्पिनला मिडविकेटच्या वरून फेकत हाणले होते! स्टुअर्ट मॅकगिल हा एक उत्कृष्ट लेगस्पिनर होता. हाताहाताएवढे चेंडू वळवायचा. त्याच्या दुर्देवाने त्याच्या ऐन उमेदीच्या काळात शेन वॉर्न द. आफ्रिका आणि इंग्लंडच्या फलंदाजांना अक्षरशः नाचवत होता. अवांतरः इंग्लंडच्या त्या वाकड्या खेळाडूंना 'फलंदाज' म्हणताना कसंसंच होतंय.. कसले ते त्यांचे स्टान्स.. शी.. कुले वाकडे करत कंबरडं मोडत अवघडल्यासारखे कसेतरी खेळतात! आणि म्हणे ती क्रिकेटची जन्मभूमी!! असो. तर योग्य संधी मिळाली असती तर आज वॉर्न आणि मुरली यांच्यासोबत नाव घेण्याची लायकी होती त्या मॅकगिलची. त्याच्या त्या दर्जेदार, मागल्या दारातून आत येणार्‍या लेगस्पिनला 'अगेन्स्ट द स्पिन' जाऊन मिडविकेटवरून फेकून देणं म्हणजे काय खाऊ नाही! पण सेहवागला कधी कुणाच बॉलरची फिकीर नव्हती. इतक्या सहज सुंदर त्यानं ते दोन षटकार हाणले की मॅकगिलसुद्धा म्हणाला असेल, "बाबारे, मी इतके कष्ट करतच नाही ना.. बॉल इंचभर वळला काय आणि हातभर वळला काय.. तू मारणारच!! मग कशाला तो बॉल वळवा इतका.."

तर असा हा आमचा सेहवाग. याच्यावर आमचा भारी जीव!! समोरचा बॉलर कोण आहे याची जराही तमा न बाळगता 'कुटण्यासाठी जन्म आपुला' म्हणत नुसती हाणामारी करणं याचं आवडतं काम!! आपल्या हातात ही बॅट दिली गेली आहे, तिचा वापर हा हाणण्यासाठीच आहे. चेंडू तटवला जात नाही. तेवढी त्याची लायकी नाही. समोर कुणीही असो. मॅक्ग्रा असो, अख्तर असो, ली असो, बॉण्ड असो, वॉर्न असो वा मुरली असो, "आम्हा काय त्याचे"* हेच भाव महाराजांच्या तोंडावर! (*संदर्भ: हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, जेपी मॉर्गन) आपल्या पदार्पणाच्या सामन्यात पोलॉक, हेवर्ड, एन्टिनी, कॅलिस, क्लूजनर अशा दर्जेदार द. आफ्रिकन गोलंदाजीसमोर शतक झळकावत त्यानं चुणूक दाखवून दिलीच होती. त्यावेळी, बॉयकॉट, बेनॉ, बॅरी रिचर्ड्स सगळ्या सगळ्यांनी " याचं फुटवर्क फार वीक आहे" वगैरे टीकेची झोड उठवली होती आमच्या वीरूभायवर.. पण या सगळ्याचा आपल्या खेळावर परिणाम होऊ देईल तर तो वीरू कसला.. त्यानं सचिनला नुसतं खेळाच्या बाबतीतच नाही तर एकूणच आपला आदर्श मानलं. आपल्यावर होणार्‍या टीकेला तो, सचिनप्रमाणंच, आपल्या बॅटनं वेळोवेळी चोख प्रत्युत्तर देत राहिला. तो आला तेव्हा त्याच्याकडे प्रतिसचिन म्हणून पाहिलं गेलं. त्याचा स्टान्स, स्टाईल, ऑन फील्ड अपीअरन्स सर्व काही सचिनची कॉपी असल्या सारखं वाटे! कित्येकांनी तर "असे किती येतात आणि किती जातात, सचिन सचिन आहे. कोण हा सेहवाग" अशा शब्दांत त्याची हेटाळणीही केली. पण आपल्या मेहनतीच्या आणि परफॉर्मन्सच्या बळावर त्यानं 'वीरेंदर सेहवाग' हा एक ब्रॅण्ड बनवला. आज सेहवाग हा जागतिक क्रिकेटमधला एक मापदंड बनलाय. सचिनच्या उपस्थितीत, त्याचीच कॉपी म्हणून सुरूवात करून स्वतःच्या नावाचा दबदबा वीरू निर्माण करू शकला यातच त्याचं यश सामावलेलं आहे.
एकतर "पाय हलवण्याचे कष्ट कोण घेईल ते.. जाऊ दे!" असा नवाबी थाट! त्यात 'आला चेंडू की हाण' ही प्रवृत्ती.. बरं कसोटी क्रिकेट खेळताना थोडा संयम दाखवावा.. तेही नाही.. 'अटॅक इज द बेस्ट डिफेन्स' हे याच्या खेळाचं सूत्र! सेहवाग जागतिक क्रिकेटमध्ये आला तेव्हा नुस्ता आक्रमकच खेळायचा. याचा आफ्रिदी होऊ नये असं सारखं वाटायचं तेव्हा. पण सचिन, द्रवीड, गांगुली अशा दिग्गजांसोबत राहून त्यानं आपला खेळ व्यवस्थित पॉलिश केला. सेहवाग स्वतः सांगतो, "सचिननं मला शिकवलं की आक्रमण हा एकच पैलू नाहीये फलंदाजीचा. प्रसंगी डोकं शांत ठेवून आपली तलवार म्यान करावी लागते. मी त्याच्याकडूनच शिकलोय प्रसंगानुरूप आपला खेळ कसा बदलावा." सचिननं त्याला वेळोवेळी योग्य सल्ले देत मार्गदर्शन केलंय आणि त्याची सेहवागला जाणीव आहे. सचिनला त्यानं नेहमीच आदर्श मानलंय आणि आज आपण जे काही आहोत ते सचिनमुळेच असं तो अतिशय विनम्रतेने मान्य करतोही. वीरू एक अतिशय रंजक आठवण सांगतो, पाकिस्तान विरूद्ध मुलतानाच्या त्याच्या त्रिशतकी खेळी दरम्यान (हो हो. तोच सामना, ज्यात गांगुलीने पडद्यामागून सूत्रं हलवत सचिन १९४ वर खेळत असताना डाव घोषित केला होता. सर्व करतूद गांगुली आणि चॅपलची आणि नाव मात्र आलं आमच्या राहुल्याचं. चॅपल कधीच आपला वाटला नाही हरामखोर साला.. पण निदान गांगुलीकडून ही अपेक्षा नव्हती. असो.) त्यानं आपलं पहिलं शतक शोएब अख्तर ला षटकार मारून पूर्ण केलं. त्यावेळेला त्याला सचिननं सांगितलं, तुझी विकेट महत्त्वाची आहे, ती असा काही आततायीपणा करून फेकू नकोस. मेलबर्न आठवतंय ना?? आपल्याला बराच मोठा स्कोर करायचा आहे. आता त्यासाठी तू जास्तीत जास्त वेळ राहायला हवास. तेव्हा पठ्ठ्यानं २९५ वर जाईपर्यंत फक्त एकच षटकार मारला. तोही १२० च्या आसपास असताना!! २९५ वर पोहोचल्यावर मात्र न राहवून त्यानं सचिनला सांगितलं आता मात्र मी षटकारच मारणार, आणि २९५ वरून सकलेनला खणखणीत षटकार हाणत साहेबांनी त्रिशतक साजरं केलं!!

इतर कुणी असता तर सावकाश आपला वेळ घेत त्रिशतक आधी पूर्ण केलं असतं. पण अशी फिकीर वीरूने कधीच केली नाही. म्हणूनच यंदा ब्रेबॉर्नवर तो श्रीलंकेविरुद्ध २९३ वर बाद झाला आणि क्रिकेट्च्या इतिहासातील तीन त्रिशतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू होता होता राहिला तेव्हाही त्याच्या चेहर्‍यावर जराही खंत नव्हती. "व्हायचंच आहे तर होईल अजून एक त्रिशतक माझं" हसत हसत वीरू म्हणत होता. त्याच्या याच अ‍ॅटिट्युडमुळे तो बिनधास्त, आत्मविश्वासाने खेळू शकतो. त्यानं अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहावे आणि आम्हां क्रिकेटरसिकांस मेजवानी देत राहावे हीच 'ईश्वर'चरणी प्रार्थना!!

(जाता जाता: किती किती मुद्दे लिहायचे राहिले असं वाटतंय.. पण लेख लांबला असं वाटल्यानं हात आवरता घेतोय. )