Friday 14 May 2010

॥ काव्यशास्त्रविनोदा: - १ ॥

भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाणभारती।
ततोऽपि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम्॥

भाषांमध्ये सर्वप्रमुख, सर्वात मधुर आणि दिव्य अशी भाषा म्हणजे संस्कृतभाषा (गीर्वाणभारती) अशा अर्थाचे हे सुभाषित आहे. जगातील सर्वात प्राचीन भाषा आणि अर्थात बर्‍याच भाषांची जननी म्हणजे संस्कृतभाषा. म्हणूनच तिला देववाणी, गीर्वाणवाणी असेही म्हटले जाते. संस्कृत भाषेतील साहित्यरचनांचे मूळ शोधणे हे ऋषींचं कुळ शोधण्याइतकंच महाकठीण काम आहे. जगातला सर्वात प्राचीन ग्रंथ अर्थात 'ऋग्वेद' संस्कृत भाषेत रचला गेला हे सर्वज्ञातच आहे. अशा या संपन्न भाषेत साहित्याची कमी नाही. सुभाषितेच इतकी आहेत की वाचता वाचता आणि ती समजता समजता जन्म सरावा. 'पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्। मूढै: पाषाणखंडेषु रत्नसंज्ञा प्रदीयते॥' असं सुभाषितांच्या बाबतीतच एक सुभाषित आहे! "या पृथ्वीवर तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते. मूर्ख लोक (मात्र) दगडाच्या तुकड्यांना 'रत्न' असे नाव देतात" असा याचा भावार्थ. आणि खरंच सुभाषिते ही रत्नेच आहेत, संस्कृतभाषेची भूषणे आहेत. ही सुभाषिते कधी साधी शिकवण देतात, कधी सखोल व्यावहारिक ज्ञान देतात. काही काही रचना तर अशा गूढ असतात की एकदा वाचून अर्थ लागला असे वाटले तरी पुन्हा वाचल्यावर एक वेगळाच अर्थ निघतो त्यांतून. पुन्हा पुन्हा वाचताना आपण नवनव्या गोष्टी शिकू लागतो आणि प्रत्येक सुभाषितातला गोडवा प्रत्येक वेळेस वाढतच जातो. तर अशा या सुभाषितांमध्ये 'काव्यशास्त्रविनोद' हा एक प्रकार आहे. काव्यशास्त्राच्या मदतीने विनोदनिर्मिती असा सरळसोपा अर्थ. पण हे केवळ विनोद नाहीत. काही उपदेशपर रचनाही काव्यशास्त्रविनोदात मोडतात. खरं सांगायचं तर काव्यशास्त्राचा अभ्यास या सरळसोप्या अर्थानेही काव्यशास्त्रविनोद हा शब्द वापरला जातो. काव्यशास्त्रविनोदात प्रहेलिका, अंतरालाप, अन्योक्ति, समस्यापूर्ति असे अनेक प्रकार आहेत. म्हणजे हे निव्वळ काव्यशास्त्राच्या आधारे निर्माण केलेले विनोद नसून काही रचना या कोड्यांच्या स्वरूपात आहेत तर काही लेकी बोले सुने लागे या उक्तीनुसार वरकरणी एक अर्थ दाखवणार्‍या पण गर्भितार्थ वेगळाच असणार्‍या रचना आहेत. काही रचना वरकरणी नुसता शब्दांचा खेळ वाटत असल्या तरीही त्यांतील गर्भितार्थ बरंच काही सांगून जाणारा असतो. काही रचनांत एकाच वाक्यातील शब्दांचे वेगवेगळ्या प्रकारे संधीविग्रह अथवा फोड करून दोन भिन्न अर्थ सूचित केलेले आहेत. तर चला दोस्तहो, अशा या रचनांचा रसास्वाद घेऊ:

पहिली रचना आहे:

यथा नयति कैलासं नगं गानसरस्वती।
तथा नयति कैलासं न गंगा न सरस्वती॥
काव्यशास्त्रविनोद म्हटल्यावर आठवलेली पहिली रचना. ज्याप्रकारे गानसरस्वती (संगीतविद्या) कैलास पर्वतावर (कैलासं नगं) नेते त्याप्रकारे कैलासावर ना गंगा नेते ना सरस्वती! असा याचा भावार्थ. एका ओळीतील शब्दांची दोन वेगळ्या प्रकारे फोड करून वेगळे अर्थ सूचित केले आहेत. येथे कैलास पर्वत परमोच्च आनंद या अर्थाने अभिप्रेत आहे. गंगा, सरस्वती या नद्या पवित्र मानल्या गेलेल्या नद्या आहेत. तर या नद्यांचं तीर्थप्राशन करणं म्हणजे परमोच्च आनंद म्हणजेच मोक्ष (कैलास) तर या नद्यांच्या तीर्थप्राशनापेक्षाही कैलासापर्यंत पोचण्याचा सुलभ मार्ग म्हणजे गानसरस्वतीची आराधना! संगीतविद्या हीच परमोच्च आनंद अर्थात मोक्षापर्यंत पोहोचण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असा अर्थ सूचित केला आहे.

अशीच आणखीही एक रचना आहे - पुढीलप्रमाणे:

तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम्।
तमाखुपत्रं राजेन्द्र भज माज्ञानदायकम्।।
वरकरणी दोन्ही ओळी सारख्याच वाटत असल्या तरी दोन्ही ओळींमध्ये संधीविग्रह/ शब्दांची फोड वेगळ्या प्रकारे केला/केली असता परस्परविरोधी अर्थ निर्माण होतात. कसे ते पहा.

पहिल्या ओळीत संधी सोडवल्यास 'तमाखुपत्रं राजेन्द्र भज मा अज्ञानदायकम्' अशी शब्दरचना होते. अर्थबोध होण्याकरता शब्दांची योग्य मांडणी केल्यावर 'राजेन्द्र, अज्ञानदायकं तमाखुपत्रं भज मा.' म्हणजेच 'हे राजेन्द्रा, अज्ञान(दुर्बुद्धी) देणार्‍या तंबाखुच्या पानाचे सेवन करू नकोस' असा अर्थ होतो.
याच ओळीचा दुसरा अर्थ अगदी विलक्षण आहे! येथे 'तमाखुपत्रम्' या शब्दाची फोड 'तं आखुपत्रं' म्हणजे 'त्या आखुपत्राला' अशी आहे. 'आखुपत्र' हा 'आखु:(उंदीर) इति पत्रं(वाहन) यस्य सः' असा बहुव्रीही समास आहे. (उंदीर आहे वाहन ज्याचे असा तो, अर्थात गजानन!) तसेच 'माज्ञानदायकम्' या शब्दाची फोड 'मा (म्हणजे लक्ष्मी/धन/संपत्ती) आणि ज्ञान देणार्‍या त्याला' अशी आहे. भज या शब्दाचा अर्थ आहे - पूजन्/भक्ती कर. तर या श्लोकाचा/रचनेचा अर्थ पुढीलप्रमाणे होतो:

हे राजेन्द्रा, अज्ञान(दुर्बुद्धी) देणार्‍या तंबाखुच्या पानाचे सेवन करू नकोस. (तर) संपत्ती आणि ज्ञान देणार्‍या त्या गजाननाचे पूजन/भक्ती कर!

एकाच वाक्यातून दोन निरनिराळे अर्थ! हीच तर काव्यशास्त्रविनोदातली खरी मजा!!


आता आपण पाहणार आहोत 'अंतरालाप'. हा एक काव्यप्रकार असून काव्यशास्त्रविनोदात त्याची गणना होते. येथे एकेका खंडात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तरही त्याच खंडात दडलेले आहे. अतिशय रोचक प्रकार आहे आहे. कसे ते पहा:

कं संजघान कृष्णः, का शीतलवाहिनी गङ्गा।
के दारपोषणरता:, कम् बलवन्तं न बाधते शीतम्॥
या रचनेच्या चार खंडांमध्ये चार प्रश्न विचारलेले आहेत.

कं संजघान कृष्णः? - कृष्ण कोणाला मारता झाला? ('संजघान' हे परोक्ष भूतकाळी रूप आहे (आपल्या परोक्ष घडलेल्या गोष्टी) - याचा अर्थ होतो 'मारता झाला.')
का शीतलवाहिनी गङ्गा? - संथपणे वाहणारी नदी कोणती? (गङ्गा हा शब्द नदी या अर्थी वापरलेला आहे.)
के दारपोषणरता:? - बायकापोरांच्या पोषणास पात्र कोण? (रत हा शब्द सामान्यपणे मग्न, व्यग्र अशा अर्थी वापरला जातो, येथे तोच शब्द पात्र, योग्य या अर्थी वापरला आहे)
कं बलवन्तं न बाधते शीतम्? - कोणत्या बलवानास थंडी बाधत नाही?

आता त्या त्या खंडांमध्ये त्या त्या प्रश्नांची उत्तरेही दडलेली आहेत. कशी ती पहा:

कंसं जघान कृष्णः - कृष्ण कंसाला मारता झाला. ('जघान' हेही परोक्ष भूतकाळी रूप आहे. याचाही अर्थ 'मारता झाला' असाच होतो.)
काशीतलवाहिनी गङ्गा - काशीस्थळी वाहणारी गंगा
केदारपोषणरता: - शेताची मशागत करण्यात गुंतलेले (केदार म्हणजे शेत)
कम्बलवन्तं न बाधते शीतम् - पांघरूणात असलेल्यास थंडी बाधत नाही (कम्बल = पांघरूण)

अशा एकेक रचनांचा आस्वाद लुटताना कल्पना येते आपली संस्कृतभाषा किती समृद्ध आहे याची.


साक्षरा: विपरीताश्चेद्राक्षसा: एव केवलम्।
सरसो विपरीतश्चेत्सरसत्वं न मुञ्चति॥
हे सुभाषित म्हणजे शब्दांचा सुरेख खेळ आहे अगदी. सर्वप्रथम संधीविग्रह जाणून घेऊ.

विपरीताशेद्राक्षसा: = विपरीता: + चेत् + राक्षसा:। (विपरीत या शब्दाचा 'उलट' असा तर चेत् या शब्दाचा 'केल्यास' किंवा 'झाल्यास' असा अर्थ अभिप्रेत आहे इथे)
विपरीतश्चेत्सरसत्वं = विपरीतः + चेत् + सरसत्वम्। (पुन्हा विपरीत = उलट आणि सरस हा शब्द 'सज्जन' या अर्थाने आहे इथे)

शब्दशः भाषांतर केल्यास - 'साक्षरा: हा शब्द उलटा लिहिल्यास राक्षसा: असा शब्द होतो, तर सरसः हा शब्द उलटा लिहिला तरीही तो सरसः असाच राहतो!' असं होतं. मात्र खोलवर विचार केल्यास वेगळाच अर्थ सूचित होतो. माणसं साक्षर झाली तरीही विपरीत परिस्थितीत राक्षसासारखी वागू शकतात. तर सज्जन मनुष्य विपरीत परिस्थितीतही आपला सज्जनपणा/ वागणूक सोडत नाही. (त्याचा सज्जनपणा सुटत नाही) असा अर्थ सुभाषितकाराला अभिप्रेत आहे. म्हणजे नुसते साक्षर होऊ नका तर सज्जन व्हा अशी शिकवण या रचनेतून दिली आहे.



पुढील रचना आहे महाकवि कालिदासाची. कालिदासाच्या प्रतिभेबद्दल आम्ही काही बोलावे इतकी आमची लायकी नाही. पण त्याचे समस्यापूर्तीचे किस्से जगभर संस्कृत भाषेच्या अभ्यासकांमध्ये प्रसिद्ध आहेत. समस्यापूर्ति म्हणजे श्लोकाच्या चार खंडांपैकी फक्त शेवटचा खंड दिला जातो आणि कवीला त्याचे पहिले तीन खंड त्यानुसार रचायचे असतात. कालिदासाला एकदा समस्यापूर्तिसाठी खंड मिळाला तो असा:

ठंठंठठंठंठठठंठठंठः।

तुम्हाआम्हासारखे सामान्य लोक तर तिथंच बेशुद्ध होऊन पडलो असतो. याला सुसंगत काय रचना करणार या विचाराने? पण कालिदासाने मात्र या खंडासही सुसंगत असे पहिले तीन खंड रचले. खरंच धन्य तो कविराज कालिदास आणि धन्य त्याची प्रतिभा! कालिदासाने रचलेला श्लोक पुढीलप्रमाणे:

रामाभिषेके जलमाहरन्त्या: हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दं ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः॥
सर्वप्रथम कालिदासास एक साष्टांग दंडवत! मग अर्थ पाहू.
अर्थ तसा सरळसोपा आहे. 'रामाभिषेके जलं आहरन्त्या युवत्या: हस्ताच्च्युतो हेमघटः' - रामाच्या अभिषेकाकरिता, पाणी आणायला गेलेल्या युवतीच्या हातून सोन्याचा घडा पडला. आता पडला तो पडला थेट घाटावर. तो घाटाच्या पायर्‍यांवरून गडगडत गेला. 'सोपानमार्गेण करोति शब्दं' - पायर्‍यांवरून गडगडत जाणार्‍या त्या घड्याने आवाज केला. तो कसा? तर ठंठं ठ ठंठं ठठ ठं ठठंठः!!

खरंच धन्य धन्य तो महाकवि कालिदास! धन्य त्याचं प्रसंगावधान आणि धन्य आपली संस्कृतभाषा. आपण सारेच अतिशय भाग्यवान आहोत, यासाठी की या संस्कृतभाषेच्या, सुभाषितांच्या, महाकवि कालिदासाच्या भारतभूमीत आपण जन्म घेतला!! अशा अनेक रचनांनी संस्कृतभाषेला समृद्ध केलेले आहे आणि अख्खं आयुष्य पुरायचं नाही रसग्रहणास इतक्या रचना आहेत! तुम्ही आम्ही 'मराठी भाषा आणि तीत असणारे निरनिराळे शब्द' 'ते शब्द किती शुद्ध आणि किती अशुद्ध', 'मराठी भाषेचा अभिमान बाळगा' असल्या वायफळ चर्चा करण्यात आपला वेळ, तोंडाची वाफ दवडतो. त्यापेक्षा मराठीची आई असलेल्या संस्कृत भाषेतील अशा रचनांचा अभ्यास करण्यात वेळ घालवलेला बरा! त्यातून आपल्याला रसास्वाद घेता येईलच, पण डोकंही उठणार नाही आणि ज्ञानात भर पडेल ती अनमोल असेल.. चिरंजीव असेल!!

'काव्यशास्त्रविनोदेन कालो गच्छति धीमताम्
व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा'

(अर्थात क्रमशः)

-- मेघवेडा.

No comments:

Post a Comment