मागील भागात कालिदासाच्या समस्यापूर्तीचं उदाहरण आपण पाहिलं. आता या भागाची सुरूवातही त्याच महान कविच्या आणखी एका रचनेनं करू.
भोज राजा हा अतिशय रसिक होता. अनेक कविंना त्याच्या दरबारी त्यांच्या रचनांसाठी इनाम मिळत असे. असाच एक कवी बक्षिसाच्या इच्छेने भोजाच्या दरबारी आपली एक रचना घेऊन आला. ती अशी,
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या: च खादन्ति, जलमध्ये डुबुक डुबुक॥
पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात आणि मासे ती फळे खातात, त्याने पाण्यात 'डुबुक डुबुक' असा आवाज होतो! असा सरळसोपा अर्थ. कवी आपल्या रचनेवर खूष होता. पण काही केल्या भोजास मात्र ती आवडेना. शेवट तो कवी कालिदासास शरण गेला. कालिदासाने त्या रचनेत थोडासा बदल केला.
जम्बुफलानि पक्वानि पतन्ति विमले जले।
तानि मत्स्या: न खादन्ति, जालगोलकशंकया॥
पिकलेली जांभळाची फळे पाण्यात पडतात, परंतु मासे ती फळे खात नाहीत. कशाला? तर आपल्याला पकडण्यासाठी टाकण्यात आलेल्या जाळ्याचे ते गोळे असावेत या शंकेने!
कालिदासाने बदललेली आपली रचना घेऊन तो कवि पुन्हा भोजाच्या दरबारी आला आणि या रचनेवर खूष होऊन भोजाने त्या कवीला इनाम दिले!!
मागल्या भागात आपण 'ठंठंठठंठंठठठंठठंठः' ही समस्यापूर्ती पाहिली. आता कालिदासाची* आणखी एक समस्यापूर्ति पाहू. यावेळी समस्येचा चरण होता - "मृगात सिंहः पलायते।" शब्दशः मराठीत भाषांतर केल्यास, "हरिणापासून सिंह पळतो." आता हे काही शक्य नाही. आणि म्हणूनच असा चरण मिळाल्यावर भल्याभल्या कवींची भंबेरी उडाली असणार. मात्र कविश्रेष्ठ कालिदासाने* त्यावरही काव्य रचलं ते असं:
कस्तूरि जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम्।
भीरू: कुर्वीत किं युद्धे, मृगात् सिंहः पलायते॥
यात पहिल्या तीन चरणात असे प्रश्न रचलेले आहेत, ज्यांची उत्तरे शेवटच्या चरणात एकेक शब्दाद्वारे अनुक्रमे मिळतात!
कस्तूरि जायते कस्मात् - कस्तुरी कोणापासून मिळते - हरिणापासून
को हन्ति करिणां शतम् - शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह
आणि
भीरू: कुर्वीत किं युद्धे - भित्रा मनुष्य युद्धात काय करतो? - पळतो.
अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत. त्या प्रतिभावंत कविवर्यास त्रिवार वंदन!!
(*वरील रचना कुणाची आहे हे मला ठाऊक नाही. माझ्या मते कालिदासाचीच असण्याची शक्यता आहे. जाणकारांनी प्रकाश टाकावा.)
समस्यापूर्तींवरून आणखी एक रचना आठवली, कवि भुक्त याची. भूरिवित्त नामक एका राजाने आपल्या दरबारी कविंना आमंत्रण दिले, स्वतःबद्दल स्तुतिपाठ रचण्यासाठी! अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांच्या रचना भूरिवित्तास न आवडल्याने त्याने त्या कविंना यमसदनी पाठवले. यमसदनी गेलेल्या कवींमध्ये भत्ति, भारवि, भिक्षु, भीमसेन यांचा समावेश होता. त्यांचप्रमाणे भुक्तानेही आपली रचना ऐकवली. भूरिवित्तास तीही पसंत पडली नाही म्हणून त्याने भुक्तासही यमसदनी धाडण्याची आज्ञा दिली. मात्र भुक्ताने त्यावेळी भूरिवित्तास जे सांगितले त्याने त्याचे प्राण वाचले! भुक्त म्हणाला,
भत्तिर्नष्टो भारविश्चाऽपि नष्टः
भिक्षुर्नष्टो भीमसेनोऽपि नष्ष्टः।
भुक्तश्चाऽहं भूरिवित्तस्तथा त्वम्
भादौ पन्क्तावन्तकः सनिविष्टः॥
तो म्हणाला, हे राजा, भत्ति नष्ट झाला आहे, भारविही नष्ट झाला आहे. भिक्षु नष्ट झाला आहे, भीमसेनही नष्ट झाला आहे. मी भुक्त आहे आणि तुम्ही भूरिवित्त आहात, 'भ' च्या बाराखडीत यम प्रवेश करता झाला आहे! (भादौ पन्क्तौ अन्तक: सन्निविष्टः।)
हे ऐकून भूरिवित्ताने त्याची शिक्षा रद्द केली आणि त्या चतुर कवीचे प्राण वाचले!
पिनाकफणिबालेन्दुभस्ममन्दाकिनीयुता।
पवर्गरचिता मूर्तिरपवर्गप्रदायिनी॥
येथे सुभाषितकाराने एक वेगळ्याच प्रकारे शंकराची स्तुती केली आहे.
पहिल्या ओळीचा अर्थ आहे:
पिनाक म्हणजे धनुष्य, फणि म्हणजे फणा काढलेला नाग, बालेन्दु म्हणजे चंद्राची कोर, भस्म, मन्दाकिनी म्हणजे अर्थात गंगा नदी यांनी युक्त अशी, 'प' वर्गाने रचलेली मूर्ति (शंकर) 'अपवर्ग' म्हणजे मोक्ष देणारी आहे!
पिनाक, फणि, बालेन्दु, भस्म आणि मन्दाकिनी या पाच गोष्टींचा क्रम लक्षात घेतल्यास असे लक्षात येते की या पाचही गोष्टी या 'प' वर्गातील आहेत, प-फ-ब-भ-म! हा 'प'वर्ग ज्याचं लक्षण आहे, तो शंभूमहादेव अपवर्ग देणारा आहे! अहाहा, सुंदर!!
रात्रिर्गमिष्यति भविष्यति सुप्रभातं
भास्वानुदेष्यति हसिष्यति पंकजश्रीः।
इत्थं विचिन्तयति कोषगते द्विरेफे
हा हन्त हन्त नलिनिं गज उज्जहार॥
समजण्यास सोपी अशी ही रचना आहे. एक भुंगा मधुरसपान करण्याच्या हेतूने कमळात शिरतो. मात्र रात्रीची वेळ झाल्याने कमळाच्या पाकळ्या मिटतात, तेव्हा रात्रि: गमिष्यति - रात्र जाईल (संपेल), भविष्यति सुप्रभातं - पहाट होईल, भासु अनुदेष्यति - सूर्य वर येईल (उगवेल), हसिष्यति पंकजश्रि: - कमळ हसू लागेल (फुलेल), इत्थं विचिन्तयति - असा विचार करीत आहे. कोण? तर - कोषगते द्विरेफे - कोषात गेलेला भुंगा(द्विरेफ) म्हणजेच रात्री पाकळ्या मिटल्याने त्यात अडकलेला भुंगा. पण इतक्यात - हा हन्त हन्त - अरेरे! काय हे दुर्दैव, नलिनिं गज उज्जहार - हत्तीने कमळाला तुडवले!
उष्ट्राणां च गृहे लग्नं गर्दभा: मंत्रपाठका:।
परस्परं प्रशसन्ति अहोरूपमहोध्वनि:॥
हा काव्यशास्त्रविनोदाचा एक दर्जेदार नमुना आहे. खरंच विनोदी रचना आहे! एखाद्या गोष्टीचं काडीचंही ज्ञान नसलेल्या माणसांनी जर त्यावर चर्चा करण्यास सुरूवात केली तर त्या चर्चेचं स्वरूप असं असेल याचं एक उत्तम उदाहरण आहे हे. या रचनेचा अर्थ असा:
'उष्ट्रांच्या' म्हणजे उंटांच्या घरी लग्नकार्य आहे. तिथं मंत्रांचं पठण करायला 'गर्दभ' म्हणजे गाढवं आहेत! ते काय करतात? तर नुसती एकमेकांची स्तुती करतात. कशी? तर "वा वा, काय तुमचं रूप" (अहो रूपम्) आणि "वा वा, काय तुमचा आवाज!!" (अहो ध्वनि:)
उंटांच्या लग्नात गाढवं मंत्रपठणाला आहेत म्हणजे सगळा आनंदी आनंदच!! सुज्ञास अधिक सांगणे न लगे!!
केशवं पतितं दृष्ट्वा पाण्डवा: हर्षनिर्भरा:।
रोदन्ति सर्वे कौरवा: हा हा केशव केशव ॥
हाही एक उत्तम काव्यशास्त्रविनोद आहे. शब्दशः केलेलं भाषांतर आणि थोडे संधीविग्रह , शब्दांची वेगळ्या प्रकारे फोड करून मिळणारा अर्थ हे सर्वस्वी भिन्न आहेत! शब्दशः भाषांतर केल्यास एक फसवी अर्थछटा दिसते:- केशवाला (कृष्णाला) पडलेला पाहून पांडव आनंदित झाले. (तर) सगळे कौरव "हे केशवा, हे केशवा" म्हणून आक्रोश करू लागले, रडू लागले.
विनोदी अर्थ निघतो नाही का? मात्र हा फसवा अर्थ आहे. रचनेत मूलतः अभिप्रेत असलेला अर्थ वेगळाच आहे. प्रथम संधीविग्रह आणि शब्दांची फोड जाणून घेऊ.
केशव = के शव, कुठलंतरी एक शव (प्रेत)
पांडव = पांढरे पक्षी, अर्थात बगळे.
कौरव = "कौ" असा रव करणारे, अर्थात कावळे.
आता वेगळीच अर्थछटा दिसू लागते. कुठलंतरी (प्राण्याचं) शव (पाण्यात) पडलेलं पाहून बगळे हर्षित झाले. (तर) कावळे मात्र दु:खाने 'अरेरे शव पडले' म्हणून आक्रोश करू लागले!
पुढल्या भागात आपण पाहू 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार!
(क्रमशः)
-- मेघवेडा.