Saturday, 11 September 2010

द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे माऊली..

"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली,

"श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!"

"माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटले.

"आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको."

"आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. सतत परोपकारासाठी झटत राहिलास. असा कसा रे तू निर्लोभी? सांग, तुझी एखादी इच्छा सांग पुत्रा."

"जीवनातलं सारं सुख तुझ्या कृपेने मला लाभलंय माऊली. मला आणखी काही नको. पण आज वर मागतोच. आज माझी माऊली माझ्यावर प्रसन्न झालीच आहे तर आज मागूनच घेतो! माते, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तुझी जात्रा भरते आहे. होतील पाचपन्नास डोकी गोळा. दोन तीन दिवस येतील एकत्र आणि जातील पुन्हा आपापल्या मार्गी परत! पोटापाण्यासाठी दूरदेशी गेलेली तुझीलेकरं अजूनही तुला विसरलेली नाहीत आणि मनोभावे एकत्र येऊन तुझी सेवा करीत आहेत हे पाहून ऊर दाटून येतो. पण पूर्वीसारखी जात्रा रंगत मात्र नाही. कुठेतरी काहीतरी उरतंय खरं. आजही पटांगणात माटव उभा राहतो पण तो उभारायला तिसरेच कामगार असतात. एखादा बाबलो गावकार वगैरे तंबाकू मळत लक्ष ठेवून असतो त्यांच्यावर. पण या माझ्या गावची पोरं पुन्हा एकदा या समोरच्या पटांगणात साफसफाई करत अंग धुळीने माखून घेताना पाह्यचं आहे गं मला. माझी ही लाल माती त्यांना बिलगू पाहतेय! तिला आहे अगं ओढ माणसांची. पण मोजक्याच काही पायांचा स्पर्श होतो हल्ली तिला. माझ्या पोरांनीच, सर्व गावकर्‍यांनीच एकत्र येऊन तुझ्या पटांगणात माटव उभारलेला पाह्यचाय मला आणि त्या माटवाला श्रीफळ बांधून सर्वांसाठी गार्‍हाणं करून आशीर्वाद मागताना, सर्वांच्या "व्हय म्हाराजा"च्या गजरात मलाही हळूच माझा आवाज मिसळायचाय. द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे गं आई..

माऊली, आज तू या महागड्या साड्यांनी दागिन्यांनी नटतेस, बघून फार बरं वाटतं मनाला. पण या चार महागड्या साड्या नि दागिन्यांपेक्षा, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार दिलेल्या साडीखणांनी तुला नटवायचा आनंद कैकपटीने श्रेष्ठ होता. देवळातली ही दानपेटी आज व्यवस्थित भरते खरी पण या पैशाच्या राशीपेक्षा तुझ्यासमोर पडणार्‍या त्या खणानारळातांदळाची रासच अधिक जवळची वाटायची. गावातल्या प्रत्येक घरातल्या लेकीसुना येऊन तुझी ओटी भरताना पाहून तुला 'माऊली' का म्हटलं जातं याचा प्रत्यय येत असे. गजरे, फळे, उदबत्त्या यांचा तर खच पडलेला असे पण हल्ली का कोण जाणे निस्तेच त्या पेटीत पैसे टाकून जातात गं लोक आणि पदरी दानाचं पुण्य पाडून घेतल्याचं मनाचं समाधान करून घेतात. पूर्वी दिवसभर लोक येत नि तुझं दर्शन घेऊन जात. तेही कसं सहकुटुंब सहपरिवार. त्या सगळ्या लोकांचे नवस सांगता सांगता मानकरी थकून जात असत दिवसभर. पण दिवसभराचा तो थकवा त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी करत नसे! सगळे रात्री दशावताराची वेळ झाली परत त्याच उत्साहाने गोळा होत अंगणात! या उत्साहाला सांप्रत ओहोटी लागली आहे गं. आधीसारखे जात्रा म्हणजे घरातलंच एखादं कार्य असल्यासारखे हल्ली लोक गोळा होत नाहीत. पाचपन्नास डोकी येतात, रीतीप्रमाणे तुझी पूजा करतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्या पूजेला आता केवळ रिवाजाचा चेहरा उरलाय असं सारखं वाटत राहतं. पण या गावातल्या प्रत्येकाने स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं येऊन उत्साहाने जात्रेत सामील झालेलं पाहायचंय. गावातल्या प्रत्येक सौभाग्यवतीने आपणहून येऊन तुझी खणानारळाने ओटी भरलेली पाहायचीय गं! असा एखादा वर देशील का गं माते?

अजूनही प्रथेप्रमाणे पालखी निघते पण चार गल्ल्यांतून फिरून सावकाश, शांतपणे परत येते. न्हावण घेऊन सगळे आपापल्या कामी जायला होतात रवाना पण त्या ताम्हनातला तो शाळिग्रामसुद्धा निरुत्साही भासतो अगं हल्ली. पुन्हा पूर्वीसारखाच गाजावाजा करत, आरोळ्या ठोकत तुझी पालखी तासनतास गावात मिरवायचीय आणि न्हावणासाठी पुढे पुढे करणार्‍या पोराटोरांना दामटवायचंय! भजनीमेळेसुद्धा हल्ली असेच अधूनमधून दिसतात कधीतरी. बाजापेटी आणि टाळमृदुंगाच्या तालावर आमचे कदमबुवा नि मिराशीबुवा रंगवायचे तशा भजनांच्या डब्बलबारी रंगत नाहीत हल्ली! रात्ररात्र भजनांत न्हाऊन निघायची. हल्ली लोक ऐकतात भजनं पण ते घरात शीडी नि क्यासेटी लावून. अन देवळाकडेही माटवात ते 'पीकर' मात्र हमखास लागतात. ते लागले जाल्या कळतं गावात जात्रा भरली आहे म्हणून. देवळाकडून थेट खालच्या आळीतल्या घरांकडे ऐकू येणारे भजनांचे स्वर पुन्हा एकदा कानांत भरून घ्यायचे आहेत माते. आमच्या कदम, मिराशी, जोशीबुवांच्या बाजापेटीतलं अन् त्यांच्या त्या टाळमृदुंगाच्या गजरातलं माधुर्य या 'पीकरा'वर वाजणार्‍या क्यासेटीतल्या न शीडीतल्या गाण्यांत शोधून सापडत नाही अगं. पुन्हा त्या मधुर भजनांच्या माध्यमातून तुझी स्तवनं गायची आहेत, पुन्हा रात्रभर भजनं गात या सभामंडपात सार्‍या गावकर्‍यांसोबत जागरणं करायची आहेत. असा एखादा वर देशील का गं माऊली?

नाही म्हणायला दशावतार तेवढे होतात अजूनही जोमाने! पण जमलेली डोकी खेळ संपल्यावर मुकाटपणे निघून जातात. खेळाला मनमुराद दाद देतात, टाळ्या पिटतात, मनसोक्त हसतातही पण पूर्वीसारखा गोंधळ मात्र होत नाही. खरंच तो गोंधळच जास्त प्रिय होता. संकासुराला टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेणार्‍या त्या जनसागरात, राजा यायचा झाला की सुन्न शांतता पसरत असे! तिकडे नाटकात देवांचं नि राक्षसांचं युद्ध झालं की इकडे प्रेक्षकांतही पोरंटोरं आपल्या खेळण्यातल्या तलवारी घेऊन युद्ध सुरू करीत! मग त्यांच्या आईबापाची त्यांना आवरताना होणारी धांदल, त्यांची ती कसरत पाहून आणखी टाळ्या, आणखी हशा! या सगळ्याने दशावताराची रंगत आणखी वाढायची! या दशावतारांतल्या हनुमानास पाहूनसुद्धा आदराने वंदन करणारा आणि पार्वतीला मंचाच्या मागं विडी ओढताना पाहून अचंबित होऊन आरडाओरडा करणारा तो लहानगा श्रीपाद आता तुझ्याकडे त्या दिवसांतली तीच जात्रा मागतोय गं माऊली. हे सगळं हल्ली कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय! जात्रा भरते, पण एखाद्या न रंगवलेल्या चित्राप्रमाणे अपुरी भासते! तीत तेच पूर्वीचे जुने हसरे, उत्साहाचे, मौजमजेचे रंग भरून देशील का गं? द्यायचाच असला तर असा एखादा वर दे माऊली!

पूर्वीच्या जात्रेला केवळ आनंदाचा उत्सव इतकंच स्वरूप होतं. आज या जात्रेचा बाजार केलाय गं. कुणीतरी सरपंच किंवा इतर कुणी राजकारणी वगैरे येतो. तुझ्यासमोर उभा राहून पूजा करतो. नतमस्तक होऊन तुझ्याकडे काय मागतो ते तूच जाणसी. मग तो जमलेल्या गावकर्‍यांसमोर भाषणं करतो, त्यांना आपल्या मधाळ वाणीने, आश्वासनांनी भुलवतो. आपल्या वाटेला लागतो. निवडणुकांत भरभरून मतं घेतो! आणि गायब होतो. असे कित्येक सरपंच आले आणि गेले पण गावातला रस्ता दर पावसाळ्यात खचतोच. या माझ्या भाबड्या गावकर्‍यांची तुझ्याएवढीच त्या राजकारण्यांवरदेखील श्रद्धा आहे आणि अजूनही ती अढळ आहे. एकोप्याच्या या आनंदोत्सवाचं बाजारात कधी परिवर्तन झालं ते आठवत नाही. जात्रेला या विदुषकांनी असं बाजाराचं स्वरूप दिलेलं पाहवत नाही गं आई. यांच्या ढोल ताशांच्या कर्णकर्कश गदारोळापेक्षा आमच्या पिपाणीचे नि पळसाच्या शिट्ट्यांचे स्वर किती गोड होते! ते ऐकायला कान आतुर झालेत. द्यायचा तर असा एखादा वर दे गं माऊली! द्यायचा तर असा एखादा वर दे!"

श्रीपादपंतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. सदर्‍याच्या बाहीने डोळे टिपून त्यांनी वर पाहिलं तो उजाडू लागलं होतं. सुभद्राकाकू, श्रीपादरावांच्या सौभाग्यवती, दाराकडे उभ्या होत्या नि कुणाला तरी निरोप देत होत्या. आत येऊन त्या म्हणाल्या,

"चला आता, आटपा भराभर. बाबी आला होता सरपंचांचा निरोप घेऊन. आज जात्रेचा माटव उभा करायचा मुहूर्त काढून हवाय त्यांना, कामगारांना काण्ट्रॅक द्यायचंय म्हणे नि देवळात आज सरपंचांची पूजाही आहे. आवरा बघू भराभर.."

"हो. आवरतो गं माऊली" म्हणत त्यांनी सुभद्राकाकूंनाच एक नमस्कार केला. आणि न्हाणीकडे निघाले. सुभद्राकाकू अचंबित होऊन स्वतःशीच पुटपुटल्या "काय हे सुचतंय यांना भल्या पहाटे? बायकोला नमस्कार करताहेत. लेकराला सांभाळून घे गं माऊली!" म्हणत त्यांनी श्री देवी माऊलीस नमस्कार केला!

***** हे लिखाण प्रातिनिधिक नसून संपूर्ण काल्पनिक लिखाण आहे. आजही कोकणातल्या बर्‍याच गावांतील जात्रांमध्ये पूर्वीसारखंच अखंड उत्साहाचं वातावरण असतं. मात्र काही ठिकाणी वर नमूद केल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तेव्हा सगळ्याच गावच्या जात्रांचे आनंदोत्सवाचे स्वरूप टिकान उरो दे रे म्हाराजा! (म्हणा - व्हंय म्हाराजा!) *****

॥ काव्यशास्त्रविनोदा: - ३ ॥

मागील भागात म्हटल्याप्रमाणे या भागात आपण 'अन्योक्ति' आणि 'प्रहेलिका' हे काव्यप्रकार पाहू.

अन्योक्ति मराठीतही वापरली जाते. संस्कृत काव्यशास्त्रविनोदात असलेली अन्योक्तिची उदाहरणे एक निराळाच आनंद देऊन जातात. मूळ तत्व तेच. 'अन्य' वस्तू/गोष्टीच्या उक्तीने आपल्याला केलेला उपदेश किंवा 'लेकी बोले सुने लागे' असं वर्णन. प्रत्यक्ष मनुष्याचा उल्लेखही न करता, मनुष्यस्वभावाचे समर्पक विवचन करणार्‍या सुभाषितांचा रसास्वाद लुटणे किती आनंददायी आहे. काही सुभाषितांत तर केवळ चार चरणात आयुष्याचे तत्वज्ञान सामावलेले असते. खरंच हा सुभाषितांचा साठा म्हणजे एक अमूल्य ठेवा आहे. चला तर अशा काही 'अन्योक्ति' पाहूया.

अपसर मधुकर दूरं परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे।
इह न हि मधुलवलाभो भवति परं धूलिधूसरं वदनम्॥

येथे भुंगा आणि केतकीच्या फुलाच्या उदाहरणातून मनुष्यस्वभावाचं चित्रण केलेलं आहे. आधी सुभाषिताची समजण्यास सोपी अशी सुटसुटीत मांडणी करून भाषांतर करून घेऊ. 'मधुकर, दूरं अपसर, परिमलबहुलेऽपि केतकीकुसुमे' - हे भुंग्या, पुष्कळ सुगंध असणार्‍या केतकीच्या फुलापासून दूर जा. (केतकीच्या फुलात पुष्कळ सुगंध असला तरी त्यापासून दूर जा) का? तर 'इह न हि मधुलवलाभः' - खरोखर इथे मध मिळायचा नाही, 'भवति परं धूलिधूसरं वदनम्' - पण (तुझे) तोंड मात्र धुळीने माखून जाईल.
अर्थात केतकी इतकी सुगंधी की एखाद्याला भुरळ पडावी, पण मधाचा मागमूसही नाही तिच्यात. उलट जी पांढरट भुकटी* केवड्यावर असते त्याला कवि धुळीची उपमा देतो. आणि भुंग्याला उपदेश करतो की, 'हे भुंग्या तू या केतकीच्या सुगंधाला भुलू नकोस. इथे तुझा कार्यभाग तर साधला जाणार नाहीच, उलट तुझं तोंडच धुलिमय होईल!' या ठिकाणी केतकीच्या रूपकातून गुणी पण गर्विष्ठ, कद्रू स्वभावाच्या मनुष्याचे चित्रण केले आहे. ज्याप्रमाणे केतकीकडे सुगंध मुबलक आहे त्याचप्रमाणे एखाद्याकडे एखादा गुण जरी मुबलक असला, तरी त्याच्याकडे औदार्य असल्याशिवाय त्या गुणांना शोभा येत नाही. अमक्याकडे मुबलक धन आहे पण त्या धनाचा त्याला गर्व झाला आहे, अशा माणसाकडे मदत मागण्यास आलेल्या गरजूंना त्याच्याकडून काही मिळणार नाहीच उलट त्यांचा अपमान होऊ शकतो. तर अशा मनुष्याच्या श्रीमंतीची महती का बरं वर्णावी? तसेच एखादा मनुष्य विद्वान आहे पण त्याने त्याच्याकडे मोठ्या अपेक्षेने काही शिकण्यासाठी आलेल्याला आपले ज्ञान दिलेच नाही तर अशा ज्ञानाचा तरी काय उपयोग? तर नुसते गुण असून भागत नाही तर गरजूंना त्या गुणांचा फायदा होत नसेल तर त्या गुणांना शोभा येत नाही. तेव्हा सामान्य मनुष्याला भुंग्याची उपमा देऊन कवि म्हणतो, "अरे भाबड्या, अशा गुणी पण गर्विष्ठ, कद्रू मनुष्यांपासून दूर राहा रे बाबा. तू ज्या इच्छेने त्याच्याकडे चालला आहेस ती पुरी व्हायची नाहीच, पण तूच पोळून निघशील."
खरंच 'औदार्याशिवाय गुणांना शोभा नाही' हे किती समर्पकपणे भुंगा आणि केवड्याच्या उदाहरणातून सांगितले आहे.

*त्या पांढरट भुकटीला काय म्हणतात ते मला ठाऊक नाही.

अञ्जलिस्थानि पुष्पाणि वासयन्ति करद्वयम्।
अहो सुमनसां प्रीतिर्वामदक्षिणयोः समा॥

या सुभाषितात फुलांचं अतिशय सुरेख उदाहरण देवून संतांच्या 'सर्वे मानवा: समा:' या भावाचं चित्रण केलं आहे. पुन्हा, आधी सुलभ भाषांतर करून घेऊ. 'अञ्जलिस्थानि पुष्पाणि' - ओंजळीत असलेली फुले, 'वासयन्ति करद्वयम्' - दोन्ही हातांना सुगंधित करतात. 'अहो सुमनसां प्रीति:' - फुलांचं प्रेम, 'वामदक्षिणयो: समा' - डाव्या आणि उजव्या, दोन्ही हातांवर सारखंच असतं. किती सुरेख उदाहरण आहे. ओंजळीत फुलं धरली तर त्यांचा गंध दोन्ही हातांना लाभतो. फुले काही 'डावा-उजवा' असा भेद करत नाहीत, ती दोन्ही हातांना सारखीच सुगंधित करतात. येथे 'सुमनसां' या शब्दावर श्लेष आहे. सुमन म्हणजे अर्थात फूल तर 'सुमनसां' म्हणजे षष्ठी बहुवचन - फुलांचे/च्या/ची. तर दुसरा अर्थ आहे 'सु-मनसां' म्हणजेच चांगल्या मनाच्या माणसांचे/च्या/ची, अर्थात संतसज्जनांचे. अशाप्रकारे संतांना फुलांची उपमा देऊन त्यांच्या मनात असलेल्या 'सर्वजण सारखेच' या भावाचे येथे चित्रण केले आहे. येथे 'वाम' हे दुर्जनांचे तर 'दक्षिण' हे सुजनांचे रूपक आहे. संतजन डावा-उजवा असा भेदभाव करत नाहीत तर त्यांचे सज्जनांवर आणि दुर्जनांवरदेखील सारखेच प्रेम असते.

रे रे चातक सावधानमनसा मित्र क्षणं श्रूयतां
अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने सर्वेऽपि नैतादृशा:।
केचिद्वृष्टिभिरार्द्रयन्ति धरणीं गर्जन्ति केचिद्वृथा
यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो मा ब्रूहि दीनं वच:॥

चातकाला केलेला हा उपदेश माणसांनाही तंतोतंत लागू होतो. आधी भाषांतर करू. 'रे रे मित्र चातक, क्षणं सावधानमनसा श्रूयतां' - अरे मित्रा चातका, क्षणभर सावधपणे ऐक. 'अम्भोदा: बहवो हि सन्ति गगने' - आकाशात ढग बरेच आहेत. 'सर्वेऽपि नैतादृशा' - पण सगळेच काही सारखे नाहीत. 'केचिद् वृष्टिभि: आर्द्रयन्ति धरणीं' - त्यातील काहीच ढग पावसाने जमीन भिजवतात, 'गर्जन्ति केचिद् वृथा' - तर काही उगीच गर्जना करतात. 'यं यं पश्यसि तस्य तस्य पुरतो' - ज्याला ज्याला पाहतोस त्याच्या पुढ्यात, 'मा ब्रूहि दीनं वचः' - दीनस्वरात याचना करू नकोस. इथं कवी चातकाला उपदेश करत आहे की प्रत्येक ढगासमोर पाण्यासाठी याचना करू नकोस सगळेच काही खरेच बरसणारे नाहीत. येथे मनुष्याला चातकाचे रूपक योजून कवि उपदेश करत आहे, की 'अरे मित्रा, या समाजात तुला मदत करणारी माणसं कोण आणि उगीच वल्गना करणारी माणसं कोण ते नीट ओळख. उगाच ज्याच्या त्याच्या समोर दीनवाणा होऊन हात पसरू नकोस.'

विधिरेव विशेष गर्हणीय: करट त्वं रट कस्तवापराध:।
सहकारतरौ चकार यस्ते सहवासं सरलेन कोकिलेन॥

कावळा आणि कोकिळपक्ष्याच्या उदाहरणातून मनुष्याला उपदेश. कावळ्या, सुरेल आवाजाच्या कोकिळपक्ष्याबरोबर तू आंब्याच्या झाडावर सहवास केलेला आहेस, (तरी) तू (वाईट आवाजातच) ओरड (रेक), (यात) तुझा अपराध काय? 'विधि: एव विशेष गर्हणीयः' - याला नियतीच पूर्णपणे कारणीभूत आहे. हे कावळ्याला उद्देशून केलेलं थोडंसं उपहासात्मक वचन असलं तरी मनुष्याला केलेला हा उपदेश आहे की जर एखादा गुण किंवा कला मुळातच तुमच्या अंगी नसेल तर ज्याच्याकडे ती कला आहे त्याच्या केवळ सहवासाने काही ती कला साध्य होत नाही.

आता आपण पाहू 'प्रहेलिका' हा काव्यप्रकार, अर्थात पहेली किंवा कोडी. कधीकधी साधी कोडी असतात, ज्यात प्रस्तुत स्वभाव अथवा गुणधर्मावरून ती गोष्ट कोणती हे ओळखायचे असते किंवा कधी कधी प्रहेलिकेतच उत्तर दडलेले असते. काही काही प्रहेलिका फसव्या असतात. वरकरणी दिसणार्‍या अर्थातून काहीच निष्पन्न होत नाही मात्र एक गूढ अर्थ त्यात दडलेला असतो जो उत्तराकडे निर्देश करतो. एक अत्यंत उत्कृष्ट प्रहेलिका पुढीलप्रमाणे :

य एवादि: स एवान्तः मध्ये भवतिमध्यमा।
य एतन्नाभिजानाति तृणमात्रं न वेत्ति सः॥

सर्वप्रथम नेहमीप्रमाणे सुलभ भाषांतर करू. 'य एव आदि: स एव अन्तः' - जो प्रारंभ आहे तोच अंतदेखील आहे, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये मध्यम आहे. 'य एतद् न अभिजानाति' - जो हेदेखील जाणत नाही, 'तृणमात्रं न वेत्ति सः' - त्याला काडीचीही जाण नाही. या भाषांतराप्रमाणे या कोड्याचं उत्तर एखादा 'देव' असं देईल. वरकरणी तसंच वाटतं देखील. पण हे अत्यंत फसवं भाषांतर आहे. वास्तविक या कोड्याचं उत्तर कोड्यातच दडलेलं आहे. पहिल्या ओळीचं नीट विचार करून भाषांतर केल्यास उत्तर पटकन कळून येईल. 'य एव आदि: - सुरूवात 'य' ने होते, 'स एव अन्तः' - आणि शेवट 'स' ने होतो, 'मध्ये भवतिमध्यमा' - मध्ये 'भवति'ची मध्यमा - अर्थात 'व' आहे. आता कळलं उत्तर? 'यवस' अर्थात गवत! पुढल्या ओळीत उत्तर दिलेलं आहे हे लक्षात आलं असेलच!

हे होतं प्रहेलिकेचं एक अत्यंत उत्कृष्ट उदाहरण! आता कोडी म्हटल्यावर कोडी घालणार्‍यानेच उत्तर दिलं तर कसं चालेल. थोडा तुम्हीही आस्वाद घ्या प्रहेलिकांचा. तेव्हा प्रस्तुत आहे एक प्रहेलिका..

अपदो दूरगामी च साक्षरो न च पण्डितः।
अमुखः स्फुटवक्ता च यो जानाति स पण्डितः॥

प्रहेलिका अशी आहे - 'अपदो दूरगामी च' - पाय नाहीत पण दूरपर्यंत जाणारा आहे, 'साक्षरो न च पण्डितः' - साक्षर आहे पण पंडित नाही, 'अमुखः स्फुटवक्ता च' - तोंड नाही पण स्फुटवक्ता आहे, 'यो जानाति स पण्डितः' - जो हे जाणतो तो विद्वान!

याचं उत्तर देता येईल? माझ्या मते फारच प्रसिद्ध प्रहेलिका असल्याने फार जड जाऊ नये.
तरीसुद्धा एक सल्ला : इथे 'साक्षर' हा शब्द येथे 'अक्षरासह' असा अभिप्रेत असू शकतो. Smile

उत्तर : पत्र/खलिता/व्यनि. बरोबर उत्तर देणार्‍या श्री. नंदन यांस 'पण्डित' किताब जाहीर! Wink

(मिपा/मीम वर पूर्वप्रकाशित)