शुचिताईंचा हा गंमतीशीर धागा वाचला आणि तुम्हासर्वांप्रमाणेच मीही माझ्या राशीबद्दलची निरीक्षणे पाहिली. यावरून विचारांची गाडी तडक आमच्या ऐतिहासिक प्रेमकहाणी कडे वळली! (प्रत्येकालाच आपली/आपल्या प्रेमकहाणी/प्रेमकहाण्या ऐतिहासिक वाटते/ वाटतात राव! एखादा प्रेमवीरांचा चित्रपट पाहताना प्रत्येकजण त्यात स्वतःची प्रेमकहाणी बघतच असतो! )
अर्थातच आम्हाला आम्ही साजरा केलेला ऐतिहासिक व्हॅलेंटाईन डे, ज्या दिवशी (नि)धडधडत्या छातीने, थरथर कापणार्या हातात गुलाब घेऊन आम्ही आयुष्यात पहिल्यांदा एका मुलीला 'इलू' चा अर्थ समजावला होता, तो दिवस आठवला. खरंच तो दिवस ऐतिहासिक ठरला होता आमच्यासाठी. सुवर्णाक्षरात नाव लिहिलं गेलं होतं आमचं कॉलेजात! डायरेक प्रिन्सिपलच्या पोरीलाच टार्गेट केलं होतं!!
आमच्यासाठी त्यावेळी सुंदरतेची व्याख्या, परिमाण आणि मर्यादा ती म्हणजे तीच होती. आणि त्यात ती केमिस्ट्री प्रॅक्टीकलला माझी पार्टनर! त्यावेळि तिचं आडनाव आणि माझं आडनाव इंग्रजी भाषेत इतकं जवळ आहे यासाठी देवाचे मी किती आभार मानले होते काय सांगू! इतकी रसायनं आम्ही दोघांनी मिळून मिसळली पण आमची केमिकल रिअॅक्शन होतंच नव्हती! ही माझी पार्टनर, पण दुसर्यांसोबत गप्पा मारायची आणि माझ्याकडे अभ्यासाशिवाय दुसर्या विषयावर बोलायचीही नाही! टाळक्यात अमोनिआ गेल्यागत व्हायचं तेव्हा! पण तरी ती आवडायची! तिच्याकडे बघत बसणं हा मनाला जडलेला छंद होता. एकदा तिच्याकडे टक लावून बघत राहिलो असताना हातावर सल्फ्युरिक अॅसिड सुद्धा ओतून घेतलं होतं मी! नशीब डायल्युट अॅसिड होतं!! पण तरी अख्ख्या वर्गाने पुढचा निदान महिनाभर मला "दिलजले के हात जले" म्हणून हिणवलं होतं! पुढे पुढे त्याच केमिस्ट्री लॅब मधे चेष्टामस्कर्या सुरू झाल्या. मग लेक्चर्स ना एकत्र बसू लागलो. मला वाटायला लागलं होतं - ते शिणेमात सांगतात तसं - "यही लडकी है जिस्की मुझे तलाश थी" वगैरे वगैरे!!
डिसेंबर मधे क्रिकेटच्या टूर्नामेंटला ती तीनही दिवस ग्राउंडवर आली होती. माझं प्रेरणास्थान आलं होतं मला चीअर करायला! तेव्हा मोठ्या फुशारक्या मी मारल्या हे सांगायची गरज नसावी! सेमी फायनल मॅचच्या वेळी मी बॅटिंग करत असताना ती बरोब्बर समोर उभी होती! पिवळाधम्मक फुलाफुलांचा पंजाबी ड्रेस, खांद्यावरून सरकणारी ओढणी सावरत उभी असलेली ती पाहून मी आधीच आऊट झालो होतो!! अहो असली मादक 'साईट स्क्रीन' लावल्यावर कसला स्कोर करणार~? बॅटिंग करताना सारखं वाटत होतं त्या अंपायरला जाऊन हाणावं आधी. उगाच मधे अडथळा आणत होता! पण तिनंच जरा बाजूला सरकून माझ्या कडे बघून 'थम्ब्स अप' केल्यावर तर माझ्या अंगात काय संचारलं कोण जाणे? केवळ तिसर्या चेंडूवर - आता हा बाहेर मारायचाच असं ठरवूनच - फुल ताकद काढून बॅट फिरवली तो नेमका स्लोवरवन निघाला आणि सरळ उंच मनोरा हवेत!! शेंबड्या पोराने सुद्धा घेतला असता इतका शिंपल कॅच डायरेक बॉलरच्या हातात!! आयुष्यात पहिल्यांदा मी इतका वाईट बाद झालो होतो! पण काय करणार राव! समोरचा नजाराच इतका सुंदर होता की विकेट केव्हाच पडली होती!! सगळ्यांनी शिव्यांची लाखोली वाहिली, पण त्या सगळ्या 'मा-भे-य-चु' च्या गदारोळात मला फक्त ती "डोण्ट वरी, पुढल्या वेळी नीट खेळ" असं बोलल्याचा भास होत होता! तिच्याकडे एकदा बघितलं तेव्हा तिने एकदा गोड हसून, डोळ्यांनीच "जाऊदे" अशी खूण केली आणि कट्यार काळजात पुरती घुसली!
अॅन्युअलला आम्ही 'सरफरोश' मधलं "जो हाल दिल का" हे द्वंद्वगीत गायलो आणि वार आणखी गहिरा झाला.. अगदी तल्लीन होऊन गात होती हो! म्हणजे मला वाटलं होतं ही माझ्यासाठीच गातेय की काय.. मला इतका आनंद झाला की "जानेजां दिलों पे प्यार का.." ला मी तिचा हात धरला आणि "अजबसा असर हो रहा है.." म्हणता म्हणता तिला जवळ घेतलं! लगेच पुढल्या कीबोर्डच्या पीसवर तिनं माझा हात धरून डान्स चालू केला म्हणून वेळ निघाली! अजिबात अनकम्फर्टेबल न होता तिनं प्रसंगावधान राखलं होतं! तेव्हा वाटलं होतं तिथं स्टेजवरच एकदा "आय जस्ट वॉण्ट टू से आय लव्ह यू" म्हणून घ्यावं पण पहिल्या रांगेत बसलेल्या आमच्या प्रिन्सिपल बाई माझ्याकडे आक्रमण करण्याच्या मूडमधे असलेल्या म्हशीसारख्या बघत होत्या. त्यांना बघितल्यावर माझ्या चेहर्याकडे जर 'मराठी वाक्प्रचार' पुस्तकाच्या रचनाकारांनी पाहिलं असतं तर कदाचित 'पाचावर धारण बसणे' या वाक्प्रचाराचं उदाहरण देण्यासाठी या प्रसंगाचा उल्लेख त्यांनी केला असता! दोन मिनिटांपूर्वी गब्बरच्या आवेशात असणार्या माझा आमच्या मॅमना पाहिल्यावर असहाय्य इमाम साहब झाला होता!! बस्स तेव्हाच ठरवलं दिड महिन्याने व्हॅलेन्टाईन डे ला काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया!
आणि परिक्षेचा दिवस उजाडला.. शैक्षणिक परिक्षांना कधीही न घाबरणारा, नेहमी आत्मविश्वासाने जाणारा 'मार्कस चाटे' (मला चांगले मार्क्स मिळायचे आणि मी चाटे क्लासेस ला जायचो म्हणून.. ) असणारा मी आज फुल्टू 'टर्कन फाटे' झालो होतो!! त्यात सम्या आणि दिन्या मला झाडावर चढवत होते, "रस्त्यावर प्रपोज कर रे .. त्यात खरी मजा आहे! बघ, असा विचार कर .. रस्त्यावर सगळ्यांसमोर तिने गुलाब घेतला आणि हो म्हणून मिठी मारली!! चायला काय इज्जत होईल तुझी कॉलेजमध्ये!! ते च्च्यायचं हलकट माजुर्डं कलिंगड, ते बघ त्यानं पण केल्लं रस्त्यावर प्रपोज त्याच्या त्या टरबूजाला.. तू पण कर एक दम इष्टायील मधे!!" (इथे कलिंगड आणि टरबूज म्हणजे सुमित आणि स्वाती .. आम्च्या क्लास मधलं एकमेकांना पूरक असं 'हेवी ड्युटी', 'रोडरोलर्स' कपल!)
रोडरोलर्स पासून प्रेरणा घेऊन मीही "आता अजिबात घाबरायचं नाही" असं मनाला समजावून कॉलेजबाहेर रस्त्यावरच प्रपोज करायचं असं ठरवलं! त्या दिवसाला साजेलसा फिक्कट गुलाबी रंगाचा ड्रेस तिनं घातला होता!! दैवी सौंदर्याचा तो आविष्कार या पृथ्वीतलावर कसा काय घडला असा मला प्रश्न त्यावेळी पडला होता! व्हॅलेन्टाईन डे असल्याने, आणि त्यात मी प्रपोज करण्याच्या फूल मूड मधे असल्याने ती माझ्या मानवी नजरेला स्वर्गातली अप्सराच वाटत होती! मी काही तिला पहिल्यांदा भेटत नव्हतो, पण आमच्या या भेटीचं वर्णन 'ती आली, तिनं बघितलं, ती हसली आणि तिनं जिंकलं!' या शब्दांतच होऊ शकेल. वास्तविक, त्यापूर्वीच्या बर्याच दिवसांतील तिच्या माझ्या भेटींचं वर्णन नेमक्या याच शब्दांत करता येईल, पण तो दिवस खास होता म्हणून त्याचा मान.. एक हात मागे घेऊन देवानंद श्टाईल मधे वाकून, मी तिला 'हाय' केलं. पुन्हा एकदा ती गोड हसली. झालं.. परत विकेट पडली! मी नुसता तिच्याकडे बघून हसतच होतो! मागून दिन्या आणि सम्या ओरडत होते, चिडवत होते..
"हातात काय आहे त्याच्या विचार त्याला..." इति दिन्या.
"काय रे? काय म्हणतोय तो दिन्या??" तिनं अगदी लाडिकपणे विचारलं!
"काही नाही अगं ते .. ते.. " - मी!
"गुलाब आहे .. लाल" सम्या ओरडला..
आता ती लाजेल, तिनं घातलेल्या गुलाबी ड्रेसपेक्षा आणि माझ्या हातातल्या गुलाबपेक्षा सुंदर रंग तिच्या गालांवर चढेल अशा अपेक्षेत असलेला मी तिचं उत्तर ऐकून भांबवलोच ..
"ग्राऊंड फ्लोअर क्लासरूम १७ मधे ये. मला असल्या गोष्टी रस्त्यावर बोलायच्या नाहियेत." इति ती.
असं रागीट बोलणं तिच्याकडून अनपेक्षित होतं मला.. ती निघून गेली.. माझं पुरतं अवसान गळालं .. सम्याला त्याने आयुष्यात ऐकल्या नसतील असल्या शिव्यांचा प्रसाद देऊन मी तडक १७ कडे निघालो.. आत ती एकटी होती.. रागाने बघत होती.. माझी नजर थेट स्वतःच्या पायांकडे..
"प्रेमवीर! प्रिन्सिपलच्या मुलीला गुलाब द्यायचंय? तेही रस्त्यावर? थांब आई येतेय खाली!"
मी डोळे मिटलेच! मला माझे आईबाबा प्रिन्सिपल मॅमच्या केबिन मधे बसलेले दिसले. हा प्रसंग मी स्वप्नांत कित्येकदा पाहिला होता. पण तेव्हा (स्वप्नात) ते आमच्या लग्नाबाबत बोलत होते.. मी काही बोलणार म्हणून मान वर केली तर एक सुंदर लाल गुलाबाचं फूल माझ्याकडे बघत होतं आणि ते फूल हातात धरणारी ती नेहमीसारखी गोड हसत होती.. मला कळेचना काय चाललंय.. तेवढ्यात हळू आवाजात ती म्हणाली..
"अरे अशा गोष्टी कॉलेजबाहेर रस्त्यावर बोलायच्या असतात का? वेडा.. आता बोल काय सांगायचं होतं तुला?".. मला खरोखर वेड लागणं तेवढं बाकी होतं..
यापुढचं वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. पहिल्यांदाच कुणा मुलीला 'इलू'चा अर्थ समजावण्याचा प्रयत्न करत होतो मी आणि माझी तिने नेहमीप्रमाणे विकेट काढली होती! शेवटी आमची केमिकल रिअॅक्शन घडली! आजही ती तितकीच गोड हसते, आजही तिला पाहताच माझी विकेट पडते. लवकरच 'ती'ला 'ही' करायचा विचार आहे, म्हणतोय या व्हॅलेन्टाईन डे ला विचारतोच.. पण रस्त्यावर मात्र नक्कीच नाही !!!
No comments:
Post a Comment