म्हणतात ना, वेळ खराब असेल तर उंटावर बसलेल्यालादेखील कुत्रं चावतं. तसंच काहीसं झालं होतं त्या तीन दिवसांत डरहम कौंटीच्या क्रिकेट संघासोबत. जून १९९४ मधली गोष्ट. एजबॅस्टनला वॉरिकशायर संघासोबतचा त्यांचा चार दिवसांचा सामना गुरूवारी सुरू झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत डरहमने जॉन मॉरीसच्या नाबाद २०४ धावा नि त्याला कर्णधार फिल बेनब्रिजने ६७ धावा काढून दिलेली साथ यांच्या जोरावर ३ बाद ३६५ धावा जमवल्या!
दुसर्या दिवशी मॉरिस झटपट बाद झाला मात्र डरहमची टांकसाळ चालूच होती. डेव्हिड ग्रेव्हनी आणि अँडरसन कमिन्स यांनी आठव्या विकेटसाठी १३४ धावांची विक्रमी भागीदारी करून संघाच्या ५०० धावा फलकावर लावल्या. ही जोडी फुटल्यावर कर्णधार बेनब्रिजने डरहमचा पहिला डाव ८ बाद ५५६ धावसंख्येवर घोषित केला तेव्हा पॅव्हेलियनकडे खुषीत चालणार्या कमिन्स व ग्रेव्हनीला आणि ड्रेसिंगरूम मध्ये बसलेल्या डरहमच्या खेळाडूंना कल्पना नव्हती, की पुढचे तीन दिवस त्यांच्या नशीबात आराम नव्हता!
वॉरिकशरच्या ८ धावा झालेल्या असताना कमिन्सने डॉमिनिक ऑस्टलर ला यष्टीरक्षक ख्रिस स्कॉट करवी झेलबाद केलं तेव्हा खुषीत नाचणार्या ख्रिस स्कॉटला याची तसूभरही कल्पना नव्हती पुढल्या काही मिनिटांत आपण सर्वात महाग चूक करणार आहोत! त्यावेळी १ बाद अशा धावसंख्येवर मैदानात उतरला, तो २५ वर्षांचा तरूण खेळाडू. त्या खेळाडूच्या कारकीर्दीतलं ते सर्वार्थाने ग्लोरीयस वर्ष होतं. (आणि आजपावेतो तेच वर्षं कोणाही खेळाडूच्या कारकीर्दीतल्या कोणत्याही एका ग्लोरीयस वर्षापेक्षा अधिक ग्लोरीयस वर्ष ठरावे. का ते पुढे कळेलच. नाही हा खेळाडू अर्थातच सचिन तेंडुलकर नाही.) महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे वर्ष त्याचं वॉरिकशर काऊंटीसोबतचं पहिलंच वर्ष होतं. त्याने पहिल्या सहा डावात पाच शतकं ठोकत त्याच्या काऊंटी करियरला जोरदार सुरूवात केली होती. ग्लॅमॉर्गनविरूद्ध १४७, लेस्टरशरविरूद्ध १०६ आणि नाबाद १२०, सॉमरसेटविरूद्ध १३६ आणि मिडलसेक्सविरूद्ध २६ आणि १४०. आता डरहमविरूद्धच्या या सामन्यात जर तो पहिल्या डावात शतक करतो तर आठ डावांत सात शतकं ठोकण्याचा विश्वविक्रम - अर्थात सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर असलेला - त्याच्या नावावर होणार होता. वॉरिकशर काऊंटीकडून खेळायला सुरूवात करण्यापूर्वी आधीच्याच सामन्यातील एकमेव डावात त्याने आपल्या राष्ट्रीय संघाकरिता - वेस्ट इंडीजकरता - साधंसुधं शतक नाही तर त्रिशतक ठोकलं होतं. आणि तेही साधंसुधं त्रिशतक नव्हे, तर ३७५ धावा करून सर गारफील्ड सोबर्स यांचा ३६५ धावांचा विश्वविक्रम त्यानं मोडला होता. होय, तोच तो महान खेळाडू - ब्रायन चार्ल्स लारा!
लारा त्या वर्षी इतका फॉर्मात होता की आल्या आल्याच त्याला फुटबॉल दिसत असावा! कदाचित लाराला आल्या आल्या हुकच्या जाळ्यात ओढण्यासाठी अॅण्डरसन कमिन्सने पहिलाच चेंडू शॉर्ट टाकला. कमिन्स त्याचा राष्ट्रीय संघातील साथीदार असल्याने असेल कदाचित, कमिन्स शॉर्ट टाकणार अशी शंका येऊन लारा हुक मारण्याच्या तयारीतच होता. दोघेही खरे ठरले! पण लाराचा हुक हुकलाच! चेंडू बॅटच्या टोकाला लागून वर उडाला, कमिन्सने जोरदार धाव घेत कॅचसाठी डाईव्ह मारली. पण शेवट तो चेंडूपर्यंत पोहोचलाच नाही!
लारा दहावर असताना, कमिन्सने एक प्रेक्षणीय इन्स्विंगिग यॉर्कर टाकला. लाराला गतिचा नि टप्प्याचा अंदाजच आला नाही नि त्याच्या बॅटने चेंडूपासून फारकत घेतली. लाराचा लेगस्टंप रोल होत होत पंधरा एक फूट मागं गेला! लाराने सामन्यानंतर कबूल केलं की अंपायरचे "नो-बॉल" हे शब्द त्याला ऐकू आले नव्हते.
लारा १८ वर असताना, सायमन ब्राऊनच्या गोलंदाजीवर एक सरळसोपा कॅच घेण्याची संधी यष्टीरक्षक ख्रिस स्कॉटने दवडली. "Jeez, I hope he doesn't go on and get a hundred" स्कॉट पुटपुटला होता असं लारा सांगतो. स्कॉटला बिचार्याला काय माहिती, त्याची ही चू़क, क्रिकेटच्या इतिहासातली सर्वात महागडी चूक ठरणार होती ते!
आपल्या "बीटिंग द फील्ड" या आत्मचरित्रात लाराने आपल्या या डळमळीत सुरूवातीचं वर्णन पुढीलप्रमाणे केलं आहे.
"The period before Tea was one of my sketchiest at the crease in my year with Warwickshire. My feet simply would not go to the right places."
टी इंटर्व्हल मध्ये लारानं यष्टीरक्षक कीथ पायपर सोबत नेट्समध्ये जाऊन आपल्या फुटवर्कमध्ये काय चुकतंय याचा अभ्यास केला. टीटाईमनंतर हळूहळू लारा सावरला. फटके लागू लागले. डरहमनं लाराला त्याच्या खेळीच्या सुरूवातीला व्यवस्थित रोखला होता मात्र आता त्यांचं काही खरं नव्हतं. शुक्रवारी संध्याकाळी दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लारानं आपलं शतक झळकावून एक विश्वविक्रम - अन या सामन्यातला पहिला - आपल्या नावावर करून घेतला होता. पुढे दोन दिवसांत त्याने अनेक विश्वविक्रम काबीज केले. त्या वर्षातलं त्याचं ते ११वं शतक होतं!
शनिवारचा पूर्ण दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला. रविवारी डरहमचा तेज गोलंदाज डेव्हिड ग्रेव्हनी यानं लाराने केवळ सहा धावा काढल्यावर त्याला बाद केलं होतं. मात्र तो सामना संडे लीगचा होता! 'नॅटवेस्ट प्रो-४० लीग' १९९९ मध्ये सुरू होण्या आधीपर्यंत ४० षटकांचे सामने 'संडे लीग' अंतर्गत खेळवले जात. काऊंटी चॅम्पियनशीपच्या चार दिवसांच्या सामन्यातून मग रविवारचा दिवस वगळला जाई. त्यामुळे त्या ४० षटकांच्या संडे लीगच्या सामन्यात लारा बाद झाला असला तरी चार दिवसांच्या काऊंटी चॅम्पियनशिपच्या सामन्यात तो टेकनिकली नाबादच होता!
सोमवारी सकाळी वॉरिकशरनं डबल डिक्लरेशनचा एक विलक्षण प्रस्ताव डरहमसमोर ठेवला! म्हणजे वॉरिकशर आहे त्या धावसंख्येवर आपला पहिला डाव घोषित करणार, मग डरहमनं आपला दुसरा डाव डाव शून्यावर घोषित करायचा नि वॉरिकशरसाठी जो उरलेला मार्जिन असेल ते टारगेट ठरेल! पण डरहमचा कर्णधार बेनब्रिजनं तो प्रस्ताव फेटाळून लावला. कदाचित, विकेट बॅटिंगसाठी उत्तम असल्याने, तसेच लारा उत्तम फॉर्मात असल्याने त्यानं 'रादर अनस्पोर्टी' निर्णय घेतला. त्यात त्यांच्या गोलंदाजीचा आधारस्तंभ डेव्हिड ग्रेव्हनीच्या मांडीचा स्नायू फाटल्याने तो उपलब्ध नव्हता. अशा वेळी सामना हरण्यापेक्षा अनिर्णीत राखलेला बरा, अशा विचारानं त्यानं घेतलेला निर्णय योग्यच होता!
लारानं सोमवारी सकाळी १११ धावांवर आपली खेळी पुन्हा सुरू केली तोवर सामना संपल्यातच जमा होता. त्याने त्या मृत सामन्यात जान भरत लंचपर्यंत केवळ एका सेशन मध्ये तब्बल १७४ धावा ठोकल्या (विक्रम क्र. २)! मग लंचब्रेकमध्ये वॉरिकशरचा कर्णधार डरमॉट रीव्हनं लाराला आणखी एक विक्रम मोडण्याची संधी द्यायची म्हणून आपला डाव घोषित करण्याचा निर्णय लांबणीवर टाकला. वॉरिकशर काऊंटीतर्फे सर्वोच्च खेळीचा १९१४ पासून फ्रँक फोस्टर यांच्या नावे असलेला ३०५ धावांचा हा विश्वविक्रम मोडण्यास लाराने जास्त वेळ घेतला नाही. त्याचं तिसरं शतक केवळ ५८ चेंडूत त्यानं पूर्ण केलं मात्र या दरम्यान २३८ वर त्याला अॅण्डरसन कमिन्सनं मिडऑफला सरळसोपा झेल सोडत आणखी एक जीवदान दिलं होतं! मग लारानं ३२५ चा पल्ला गाठला तेव्हा त्यानं केवळ सातव्या डावात त्या वर्षातल्या १००० धावा (२००च्या अजस्र सरासरीनं!) पूर्ण करत सर डॉन ब्रॅडमनच्या १९३८ सालच्या विक्रमाची बरोबरी केली. (विक्रम क्र. ४) त्यानं आपलं चौथं शतक चार धावा धावून पूर्ण केलं! पुढं तो ४१३ वर असताना, स्क्वेअरलेगला एका बदली खेळाडूनं त्याचा आणखी एक कॅच टाकत त्याला त्या डावातलं पाचवं जीवदान दिलं! चहापानाच्या वेळेस लारा ४१८ धावांवर नाबाद होता!
दरम्यान डरमॉट रीव्हनं आपला डाव घोषित करण्याचा निर्णय आणखी लांबणीवर टाकला! कारण पुढचं लक्ष्य होतं ४२४. आर्ची मॅक्लॅरेनचा 'इंग्लंडमधील सर्वोच्च खेळी'चा विक्रम! (विक्रम क्र. ५) लारानं तोही मोडला आणि मग मात्र डरमॉट रीव्हनं लारा खेळतो आहे तोवर डाव घोषित न करण्याचं जाहीर करून टाकलं! लारा ४५७ वर पोहोचला तेव्हा आणखी एक विश्वविक्रम (क्र. ६) कोलमडला! चार्ली मॅककार्टनी यांचा एका दिवसात ३४५ धावांचा विश्वविक्रम आता त्या स्थानी नव्हता! तिथून प्रतिस्पर्धी कर्णधार बेनब्रिजला सलग चार चौकार हाणत लारानं ४७१ वर झेप घेतली.
लारा दमला होता मात्र कीथ पायपरसोबत त्याची भागीदारी ३०० कडे घोडदौड करत होती नि बातमी पसरताच स्टेडियमला गर्दी वाढू लागली होती! ४९० वरून आपल्या त्या खेळीतला ६९ वा चौकार हाणत लारानं पर्सी पेरिनचा १९०४ सालचा एका डावातील सर्वाधिक चौकारांचा विश्विक्रम (क्र. ७) रचला! आता केवळ एकच लक्ष्य उरलं होतं! प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या - हनीफ मोहम्मद यांचा ४९९ धावांचा विश्वविक्रम!
खेळ ५.३० ला संपायचा होता नि दिवसाचं शेवटचं षटक टाकण्याकरिता बेनब्रिजनं जॉन मॉरिसकडे चेंडू सोपवला. तिसर्या चेंडूवर लारा बीट झाला तेव्हा तो ४९७ वर होता! मॉरिसचा चौथा चेंडू - एक सुंदर बाऊन्सर - तडक लाराच्या हेल्मेटवर जाऊन आदळला! कीथ पायपरनं जाऊन लाराला कळवलं की कदाचित ही सामन्यातली शेवटची ओव्हर आहे! दोन चेंडूत तीन धावा! वर्ल्डकपच्या सामन्यासारखंच टेन्स्ड वातावरण होतं!
पुढल्या चेंडूवर लारानं चौकार हाणला!
नाबाद ५०१!
४७४ मिनिटांत, ४२७ चेंडूत त्यानं ५०१ धावा तडकावल्या! दरम्यान वरील आठ वैयक्तिक विक्रम काबीज करतानाच त्यानं आणखी तीन विक्रम मोडण्यास हातभार लावला होता! ख्रिस स्कॉटने लाराला दिलेलं १८ वर दिलेलं जीवदान डरहमला तब्बल ४८३ धावांनी महाग पडलं! हे आजवरचं क्रिकेटमधील सर्वात महागडं जीवदान! तसंच पाचव्या विकेटसाठीची नाबाद ३२२ धावांची भागीदारी अन वॉरिकशरची ४ बाद ८१० ही धावसंख्या हे काऊंटी विक्रम होते! लारानं या एका सामन्यात, वास्तविक एका डावात, तब्बल दहा विक्रम मोडले!
ब्रायन लाराने १९९४ या वर्षात ७९.७५ च्या सरासरीने तब्बल ३८२८ धावा काढल्या! यात त्याने १४ शतकं झळकावली. यात १ द्विशतक, एक त्रिशतक आणि अर्थात एक पंचशतक समाविष्ट होतं! हे वर्ष सर्वार्थानं कोणत्याही खेळाडूच्या कारकीर्दीतल्या कोणत्या वर्षापेक्षा कैक अधिक ग्लोरीयस होतं!
वार्ताहर कळवतात डरहमचे खेळाडू "कशी नशिबानं थट्टा आज मांडली" हे गाणं सामना संपल्यावर गात होते!
-- सर्व माहिती अॅण्ड्र्यू वॉर्ड यांच्या "क्रिकेट्स स्ट्रेंजेस्ट मॅचेस" या पुस्तकातून साभार!
No comments:
Post a Comment