रामप्रहरी माय न्हाणी चेतवी, हो धूम्रसंधी
मायमायेनेच होई धूरही इतका सुगंधी!
गाय गोठ्यातून घाली साद, सत्वर माय धावे
वासरा गोंजारूनी मग कौतुकाने सोडी दावे
गोमयाने नटविते जमिनीस माय प्रेमभावे
स्पर्श तो मांगल्यदायी भूमिलाही ओढ लावे
देवचाफ़ा, मोगरा, जास्वंद, प्राजक्ता; अनंता
वाही सादर रोज माय, घे सुगंधा भाग्यवंता
माय घाली नित्य फ़ेरे अंगणी वॄंदावनाला
गंध मायेच्याच मायेचाच येतो मंजिरीला
परसदारी बांव निर्मळ, माय म्हणते माय तीतें
थेंबही त्या पाझराचा तृप्त करितो लेकरांतें
एक क्षणही माय नसता, पोरक्या त्या चार भिंती
गंध मायेचे, घराच्या घरपणाचे बंध होती
-- मेघवेडा.
बोरकरांच्या ’खूप या वाड्यास दारे’ या कवितेने आणखी नुकत्याच पाहिलेल्या ’गंध’ या मराठी चित्रपटाने हे लिहिण्याची प्रेरणा दिली. छंदबद्ध काव्य लिहिण्याचा माझा पहिलाच प्रयत्न आहे. हे लिहिण्यास मला सारखं प्रोत्साहित करणार्या आणि योग्य सूचना देऊन अनमोल सहकार्य करणार्या यशोधरा आणि नंदन यांचे खूप धन्यवाद. :)
No comments:
Post a Comment