"श्रीपाद.." आवाज ओळखीचा नव्हता. श्रीपादपंत डोळे चोळत उठून बसले. काळामिच्च अंधार. त्या अंधारात त्यांच्या समोर एक तेजस्वी आकृती उभी होती! ते काही बोलणार इतक्यात ती आकृतीच पुढे बोलू लागली,
"श्रीपाद, तू आयुष्यभर माझी नि:स्वार्थ सेवा करीत आला आहेस. तुझ्या या परार्थसिद्ध सेवेने मी प्रसन्न झाले आहे. माग, आज तुला हवा तो वर माग वत्सा!"
"माऊली! साक्षात श्री देवी माऊली! खरंच विश्वास बसत नाही!" म्हणत श्रीपादपंतांनी साष्टांग नमस्कार घातला. कृतकृत्य भाव त्यांच्या चेहर्यावर उमटले.
"आज तुझ्या दर्शनाने जन्माचे सार्थक झाले आहे माते. आता मला आणखी काही नको."
"आयुष्यभर स्वतःसाठी काही मागितलं नाहीस. सतत परोपकारासाठी झटत राहिलास. असा कसा रे तू निर्लोभी? सांग, तुझी एखादी इच्छा सांग पुत्रा."
"जीवनातलं सारं सुख तुझ्या कृपेने मला लाभलंय माऊली. मला आणखी काही नको. पण आज वर मागतोच. आज माझी माऊली माझ्यावर प्रसन्न झालीच आहे तर आज मागूनच घेतो! माते, प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तुझी जात्रा भरते आहे. होतील पाचपन्नास डोकी गोळा. दोन तीन दिवस येतील एकत्र आणि जातील पुन्हा आपापल्या मार्गी परत! पोटापाण्यासाठी दूरदेशी गेलेली तुझीलेकरं अजूनही तुला विसरलेली नाहीत आणि मनोभावे एकत्र येऊन तुझी सेवा करीत आहेत हे पाहून ऊर दाटून येतो. पण पूर्वीसारखी जात्रा रंगत मात्र नाही. कुठेतरी काहीतरी उरतंय खरं. आजही पटांगणात माटव उभा राहतो पण तो उभारायला तिसरेच कामगार असतात. एखादा बाबलो गावकार वगैरे तंबाकू मळत लक्ष ठेवून असतो त्यांच्यावर. पण या माझ्या गावची पोरं पुन्हा एकदा या समोरच्या पटांगणात साफसफाई करत अंग धुळीने माखून घेताना पाह्यचं आहे गं मला. माझी ही लाल माती त्यांना बिलगू पाहतेय! तिला आहे अगं ओढ माणसांची. पण मोजक्याच काही पायांचा स्पर्श होतो हल्ली तिला. माझ्या पोरांनीच, सर्व गावकर्यांनीच एकत्र येऊन तुझ्या पटांगणात माटव उभारलेला पाह्यचाय मला आणि त्या माटवाला श्रीफळ बांधून सर्वांसाठी गार्हाणं करून आशीर्वाद मागताना, सर्वांच्या "व्हय म्हाराजा"च्या गजरात मलाही हळूच माझा आवाज मिसळायचाय. द्यायचाच आहे तर असा एखादा वर दे गं आई..
माऊली, आज तू या महागड्या साड्यांनी दागिन्यांनी नटतेस, बघून फार बरं वाटतं मनाला. पण या चार महागड्या साड्या नि दागिन्यांपेक्षा, प्रत्येकाने आपापल्या ऐपतीनुसार दिलेल्या साडीखणांनी तुला नटवायचा आनंद कैकपटीने श्रेष्ठ होता. देवळातली ही दानपेटी आज व्यवस्थित भरते खरी पण या पैशाच्या राशीपेक्षा तुझ्यासमोर पडणार्या त्या खणानारळातांदळाची रासच अधिक जवळची वाटायची. गावातल्या प्रत्येक घरातल्या लेकीसुना येऊन तुझी ओटी भरताना पाहून तुला 'माऊली' का म्हटलं जातं याचा प्रत्यय येत असे. गजरे, फळे, उदबत्त्या यांचा तर खच पडलेला असे पण हल्ली का कोण जाणे निस्तेच त्या पेटीत पैसे टाकून जातात गं लोक आणि पदरी दानाचं पुण्य पाडून घेतल्याचं मनाचं समाधान करून घेतात. पूर्वी दिवसभर लोक येत नि तुझं दर्शन घेऊन जात. तेही कसं सहकुटुंब सहपरिवार. त्या सगळ्या लोकांचे नवस सांगता सांगता मानकरी थकून जात असत दिवसभर. पण दिवसभराचा तो थकवा त्यांचा उत्साह तसूभरदेखील कमी करत नसे! सगळे रात्री दशावताराची वेळ झाली परत त्याच उत्साहाने गोळा होत अंगणात! या उत्साहाला सांप्रत ओहोटी लागली आहे गं. आधीसारखे जात्रा म्हणजे घरातलंच एखादं कार्य असल्यासारखे हल्ली लोक गोळा होत नाहीत. पाचपन्नास डोकी येतात, रीतीप्रमाणे तुझी पूजा करतात आणि प्रसाद घेऊन निघून जातात. त्या पूजेला आता केवळ रिवाजाचा चेहरा उरलाय असं सारखं वाटत राहतं. पण या गावातल्या प्रत्येकाने स्वतःच्या घरचं कार्य असल्यासारखं येऊन उत्साहाने जात्रेत सामील झालेलं पाहायचंय. गावातल्या प्रत्येक सौभाग्यवतीने आपणहून येऊन तुझी खणानारळाने ओटी भरलेली पाहायचीय गं! असा एखादा वर देशील का गं माते?
अजूनही प्रथेप्रमाणे पालखी निघते पण चार गल्ल्यांतून फिरून सावकाश, शांतपणे परत येते. न्हावण घेऊन सगळे आपापल्या कामी जायला होतात रवाना पण त्या ताम्हनातला तो शाळिग्रामसुद्धा निरुत्साही भासतो अगं हल्ली. पुन्हा पूर्वीसारखाच गाजावाजा करत, आरोळ्या ठोकत तुझी पालखी तासनतास गावात मिरवायचीय आणि न्हावणासाठी पुढे पुढे करणार्या पोराटोरांना दामटवायचंय! भजनीमेळेसुद्धा हल्ली असेच अधूनमधून दिसतात कधीतरी. बाजापेटी आणि टाळमृदुंगाच्या तालावर आमचे कदमबुवा नि मिराशीबुवा रंगवायचे तशा भजनांच्या डब्बलबारी रंगत नाहीत हल्ली! रात्ररात्र भजनांत न्हाऊन निघायची. हल्ली लोक ऐकतात भजनं पण ते घरात शीडी नि क्यासेटी लावून. अन देवळाकडेही माटवात ते 'पीकर' मात्र हमखास लागतात. ते लागले जाल्या कळतं गावात जात्रा भरली आहे म्हणून. देवळाकडून थेट खालच्या आळीतल्या घरांकडे ऐकू येणारे भजनांचे स्वर पुन्हा एकदा कानांत भरून घ्यायचे आहेत माते. आमच्या कदम, मिराशी, जोशीबुवांच्या बाजापेटीतलं अन् त्यांच्या त्या टाळमृदुंगाच्या गजरातलं माधुर्य या 'पीकरा'वर वाजणार्या क्यासेटीतल्या न शीडीतल्या गाण्यांत शोधून सापडत नाही अगं. पुन्हा त्या मधुर भजनांच्या माध्यमातून तुझी स्तवनं गायची आहेत, पुन्हा रात्रभर भजनं गात या सभामंडपात सार्या गावकर्यांसोबत जागरणं करायची आहेत. असा एखादा वर देशील का गं माऊली?
नाही म्हणायला दशावतार तेवढे होतात अजूनही जोमाने! पण जमलेली डोकी खेळ संपल्यावर मुकाटपणे निघून जातात. खेळाला मनमुराद दाद देतात, टाळ्या पिटतात, मनसोक्त हसतातही पण पूर्वीसारखा गोंधळ मात्र होत नाही. खरंच तो गोंधळच जास्त प्रिय होता. संकासुराला टाळ्या शिट्ट्यांनी डोक्यावर घेणार्या त्या जनसागरात, राजा यायचा झाला की सुन्न शांतता पसरत असे! तिकडे नाटकात देवांचं नि राक्षसांचं युद्ध झालं की इकडे प्रेक्षकांतही पोरंटोरं आपल्या खेळण्यातल्या तलवारी घेऊन युद्ध सुरू करीत! मग त्यांच्या आईबापाची त्यांना आवरताना होणारी धांदल, त्यांची ती कसरत पाहून आणखी टाळ्या, आणखी हशा! या सगळ्याने दशावताराची रंगत आणखी वाढायची! या दशावतारांतल्या हनुमानास पाहूनसुद्धा आदराने वंदन करणारा आणि पार्वतीला मंचाच्या मागं विडी ओढताना पाहून अचंबित होऊन आरडाओरडा करणारा तो लहानगा श्रीपाद आता तुझ्याकडे त्या दिवसांतली तीच जात्रा मागतोय गं माऊली. हे सगळं हल्ली कुठेतरी हरवल्यासारखं वाटतंय! जात्रा भरते, पण एखाद्या न रंगवलेल्या चित्राप्रमाणे अपुरी भासते! तीत तेच पूर्वीचे जुने हसरे, उत्साहाचे, मौजमजेचे रंग भरून देशील का गं? द्यायचाच असला तर असा एखादा वर दे माऊली!
पूर्वीच्या जात्रेला केवळ आनंदाचा उत्सव इतकंच स्वरूप होतं. आज या जात्रेचा बाजार केलाय गं. कुणीतरी सरपंच किंवा इतर कुणी राजकारणी वगैरे येतो. तुझ्यासमोर उभा राहून पूजा करतो. नतमस्तक होऊन तुझ्याकडे काय मागतो ते तूच जाणसी. मग तो जमलेल्या गावकर्यांसमोर भाषणं करतो, त्यांना आपल्या मधाळ वाणीने, आश्वासनांनी भुलवतो. आपल्या वाटेला लागतो. निवडणुकांत भरभरून मतं घेतो! आणि गायब होतो. असे कित्येक सरपंच आले आणि गेले पण गावातला रस्ता दर पावसाळ्यात खचतोच. या माझ्या भाबड्या गावकर्यांची तुझ्याएवढीच त्या राजकारण्यांवरदेखील श्रद्धा आहे आणि अजूनही ती अढळ आहे. एकोप्याच्या या आनंदोत्सवाचं बाजारात कधी परिवर्तन झालं ते आठवत नाही. जात्रेला या विदुषकांनी असं बाजाराचं स्वरूप दिलेलं पाहवत नाही गं आई. यांच्या ढोल ताशांच्या कर्णकर्कश गदारोळापेक्षा आमच्या पिपाणीचे नि पळसाच्या शिट्ट्यांचे स्वर किती गोड होते! ते ऐकायला कान आतुर झालेत. द्यायचा तर असा एखादा वर दे गं माऊली! द्यायचा तर असा एखादा वर दे!"
श्रीपादपंतांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले होते. सदर्याच्या बाहीने डोळे टिपून त्यांनी वर पाहिलं तो उजाडू लागलं होतं. सुभद्राकाकू, श्रीपादरावांच्या सौभाग्यवती, दाराकडे उभ्या होत्या नि कुणाला तरी निरोप देत होत्या. आत येऊन त्या म्हणाल्या,
"चला आता, आटपा भराभर. बाबी आला होता सरपंचांचा निरोप घेऊन. आज जात्रेचा माटव उभा करायचा मुहूर्त काढून हवाय त्यांना, कामगारांना काण्ट्रॅक द्यायचंय म्हणे नि देवळात आज सरपंचांची पूजाही आहे. आवरा बघू भराभर.."
"हो. आवरतो गं माऊली" म्हणत त्यांनी सुभद्राकाकूंनाच एक नमस्कार केला. आणि न्हाणीकडे निघाले. सुभद्राकाकू अचंबित होऊन स्वतःशीच पुटपुटल्या "काय हे सुचतंय यांना भल्या पहाटे? बायकोला नमस्कार करताहेत. लेकराला सांभाळून घे गं माऊली!" म्हणत त्यांनी श्री देवी माऊलीस नमस्कार केला!
***** हे लिखाण प्रातिनिधिक नसून संपूर्ण काल्पनिक लिखाण आहे. आजही कोकणातल्या बर्याच गावांतील जात्रांमध्ये पूर्वीसारखंच अखंड उत्साहाचं वातावरण असतं. मात्र काही ठिकाणी वर नमूद केल्यासारखी परिस्थिती नक्कीच आहे. तेव्हा सगळ्याच गावच्या जात्रांचे आनंदोत्सवाचे स्वरूप टिकान उरो दे रे म्हाराजा! (म्हणा - व्हंय म्हाराजा!) *****